वेळ सकाळी ८-८:३० ची असावी. सकाळचा चहा रेल्वेतच झाला. स्टेशनला पोहोचण्यासाठी किमान पाऊण तास किंवा एक तास लागणार होता. तुम्ही जर रामेश्वरम् ला जातांना रेल्वेने जात असाल किंवा गाडीने/ बसने (म्हणजे रोडने) जात असाल, तर तुम्हाला पाम्बन पूल ओलांडल्याशिवाय जाता येतच नाही. या रेल्वेपपूलाची विशेषता म्हणजे हा पूल खूप जुना आणि समुद्रात बांधलेला आहे. ब्रिटीशकाळात बांधलेला हा पूल आता भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत येतो. या पुलाचं बांधकाम १९११ मध्ये सुरु होऊन १९१४-१५ मध्ये हा वाहतुकीसाठी सुरु झाला. समुद्रात पूल बांधणे हे तसं अवघड असल्यामुळे कदाचित या रेल्वेपुलावर एकच ट्रॅक ज्यावरून जातांना रेल्वेची गती अगदी कमी झालेली असते. याची लांबी ६,७७६ फूट (सुमारे दोन किंवा सव्वादोन किमी) असून या पुलाच्या खालून छोटी जहाजे जाऊ शकतील एवढी या पुलाची उंची ठेवण्यात आलेली आहे.

असो. रेल्वेतून मी जमेल तसे फोटो काढत होतो. ऊन पडलेलं असलं तरी अजून गारवा जाणवत होता. पुलाच्या दोन्हीही बाजूंनी कठडा नसल्यामुळे खिडकीतून किंवा दारातून थेट खाली फक्त समुद्राचं पाणी दिसतं! सुमारे एक तासाच्या विलंबाने रेल्वे रामेश्वरम् ला येऊन पोचली. स्टेशन तसं लहानच आहे. फक्त ४ ते ५ प्लॅटफॉर्म्स असलेल्या या स्टेशनवर जास्त धावपळ दिसून येत नाही. शहर छोटं असलं तरी रस्ते वगैरे कशातच काही बोलायला जागा नाही हो! क्वचित कुठे पारंपारिक पद्धतीने बांधलेली घरं दिसून येतात. आधी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले आणि आता राजकारणात सक्रिय असलेले विजयकांत यांचे पोस्टर्स बऱ्याच ठिकाणी दिसले. भारतात कदाचित कुठेही बघायला मिळणार नाही, असं बिभीषण मंदिर इथे आहे. रामायणामध्ये बिभीषण रावणाला सोडून जेव्हा श्रीराम यांच्याकडे येतात, तेव्हा ते या ठिकाणी आले होते, अशी इथे मान्यता आहे. दोन्ही बाजूला असलेला समुद्र आणि मधून जाणारा रस्ता, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणाच्या सौंदर्यात अधिक भर घालतात.

परत थोडं मागे येऊन मुख्य रस्त्याला लागल्यावर किंचित दक्षिण दिशेला गेल्यावर आहे धनुषकोडी! या ठिकाणापासून श्रीलंका अगदी जवळ म्हणजे १८ मैलावर (सुमारे २८ ते ३० किमी) आहे. त्या बीचवर गेल्या गेल्या मोबाईलवर “Idea wishes you a pleasent stay in Sri Lanka.” असा एसएमएस आला, तेही मी भारत देशाच्या हद्दीत असताना! असं सांगितलं जातं की, एका शहरात असतील, त्या सर्व सुविधा आधी धनुषकोडीमध्ये उपलब्ध होत्या. धनुषकोडीपासून ते श्रीलंकेच्या तलईमन्नारपर्यंत सुरळीत वाहतूक चालायची. प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी आणि मालवाहतुकीसाठी कितीतरी साप्ताहिक फेऱ्या चालत असत. एवढेच नाही, तर सध्या जी रेल्वे मंडपम् पासून रामेश्वरम् ला जाते ती पूर्वी धनुषकोडीपर्यंत जात असे. परंतु, २२ डिसेंबर, १९६४ ते २५ डिसेंबर, १९६४ या चार दिवसांमध्ये या ठिकाणाला जबरदस्त वादळाचा तडाखा बसला.

हा तडाखा इतका भयंकर होता की, त्या वादळामुळे सुमारे २० फूट उंचीपर्यंतच्या लाटा उसळून भारत ते श्रीलंका असलेला सेतू (पूल) पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या वादळामुळे झालेलं नुकसान इतकं प्रचंड होतं की, त्या एका रात्रीत धनुषकोडीमध्ये असलेलं रेल्वे स्टेशन, त्याच्यालगत असलेलं एक इस्पितळ, पोस्ट ऑफिस आणि इतर अनेक सरकारी कार्यालये नेस्तनाबूत झाली. हे नुकसान अर्थातच भरून न निघण्यासारखं होतं. तेव्हाच्या मद्रास सरकारने या ठिकाणाला “न राहण्यायोग्य ठिकाण” म्हणून घोषित केले. आता केवळ काही स्थानिक मच्छीमार इथे समुद्रकिनारी राहतात.

हे भारताचं असं एक टोक आहे जिथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे मिळालेले दिसून येतात. अगदी दोन्ही समुद्रांचे रंग देखील वेगळे आणि ओळखू येण्याइतके स्पष्ट दिसतात. स्थानिक लोकांच्या सल्ल्यानुसार हे ठिकाण दिवसा बघितलं गेलेलं जास्त चांगलं आहे. शिवाय धनुषकोडी बीचवर दुपारी ४ नंतर कुठल्याही व्यक्ती, समूहाला आणि वाहनाला जाण्यासाठी मनाई आहे. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि संध्याकाळी समुद्राच्या स्थितीचा भरवसा देता येत नसल्यामुळे स्थानिक पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे.

समुद्रकिनारा तसा अगदी प्रेक्षणीय! फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांना हे ठिकाण म्हणजे खजिनाच! हा समुद्र दिवसा इतका शांत भासतो की, या ठिकाणी इतकं मोठं वादळ येऊन गेलं होतं, असं वाटतही नाही. जरा एकदा त्या किनाऱ्यावरून वाळूत चालून बघा. अजिबात काहीही न बोलता एक फेरफटका मारून या. या अनुभवाला तोड नाही. किमान मी तरी त्या अनुभवाला शब्दांत लिहू शकत नाही. किनाऱ्यावर कुठल्याही एका ठिकाणी थांबून एक दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटून घ्या. याच्यापुढे काहीही लिहिण्याची आणि सांगण्याची गरज नाही.

(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *