दुसऱ्या दिवसाची ती सकाळ अतिशय प्रसन्न होती. सकाळी मारलेला तो फेरफटका, हॉटेलच्या खिडकीमधून दिसणारी ती सकाळ, लोकांची दिवसासोबत सुरु होणारी नित्याची कामे आणि आजचं टारगेट- रामनाथस्वामी मंदिर, आपल्या भाषेत अर्थात रामेश्वरम्!

यादीत तशी अजूनही बरीच नावं आहेत. पण एकानंतर एक! बाहेर निघायचं राहू द्या आधी ही या पद्धतीने दिली जाणारी कॉफी तर बघा! तेवढी कॉफी घेऊन सकाळचा आळस नाही गेला तर सांगावं कुणी. सकाळचं आवरून झाल्यावर गेलो ते रामनाथस्वामीलाच. इथे मात्र बाहेर फोटो काढता येतील तितकेच. आतमध्ये फोन किंवा कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही. मंदिराची सध्या असलेली रचना ही १२ व्या शतकातील पांड्य राजवंशाने त्यांच्या काळात केलेली आहे. शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा हा अतिशय सुंदर नमुना असावा! प्रवेशद्वाराचीच उंची सुमारे ४० फूट आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्हीही बाजूंनी खांबांचं बांधकाम केलेलं आहे. या रस्त्याची रुंदी सुमारे १७ ते २१ फूट आहे, तर दोन्ही बाजूंनी असलेल्या खांबांची उंची सुमारे २५ फूट आहे. दुरून बघताना प्रत्येक स्तंभ सारखा वाटतो. परंतु, जवळ जाऊन पाहिल्यास प्रत्येक स्तंभावर काही ना काही वेगळ्या प्रकारचं कोरीव काम केलेलं आढळतं. जे काही आहे ते सगळं मोठं आणि भव्य!

इतक्या मोठ्या प्रमाणात पाषाण वापरल्या गेलेलं हे मंदिर म्हणजे एक आश्चर्य असल्यासारखंच आहे. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणाच्या आसपास कुठेही डोंगर किंवा पर्वत नाही, जिथून मोठमोठ्या शिला (दगड) आणता येतील. केवळ गंधमादन नावाचा एक डोंगर आहे. (डोंगर किंवा टेकडी याविषयी खात्री देता येत नाही) पण तिथूनही बांधकामासाठी मिळणारा दगड मिळणे अशक्य आहे. कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीचं तंत्र नसतांना हे सगळं लंकेतून (श्रीलंका) आणलं होतं, असं सांगितलं जातं. रामेश्वरम् मध्ये अशी भरपूर ठिकाणे आहेत, जिथे जाऊन रामायणामध्ये घडलेल्या घटनांच्या काही खुणा अजूनही आहेत, याची खात्री पटते.

धार्मिक गोष्टींप्रमाणे इथली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञान क्षेत्रात भारताला एका वेगळ्या उंचीवर नेणारे, विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले भारताचे “मिसाईल मॅन” आणि माजी राष्ट्रपती अर्थात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांचं हे गाव! त्यांच्या स्मरणार्थ इथे “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल मेमोरिअल”ची स्थापना केलेली आहे, ज्यात कलाम यांचा जीवनप्रवास वेगवेगळ्या फोटो आणि पुतळ्यांसह दाखवलेला आहे. शिवाय त्यांनी वापरलेल्या त्यांच्या काही वस्तू, उदाहरणार्थ त्यांची डायरी, काही पुस्तकं, लॅपटॉप इ. ठेवलेल्या आहेत. रोज मोठ्या संख्येने लोक भेट देत असले तरी कुठेही गडबड, गोंधळ, गोंगाट नाही. सगळं कसं व्यवस्थित!

फिरता फिरता वेळेचा अजिबात अंदाज आला नाही. सगळं पटापट संपवून परत स्टेशन गाठायचं होतं! तमिळनाडूमधलं एक खूप मोठं आणि जुनं शहर. भरपूर तमिळ सिनेमांमध्ये याचं नाव घेतलं गेलेलं आहे. वेळ खूपच कमी होता म्हणजे फक्त २४ तास! पण जे नियोजित होतं त्यानुसार जाणं भाग होतं. रात्रीचे साडेआठ वाजलेले होते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तयार होती. अंतर आधीच्या तुलनेत थोडंसं कमी- जवळपास पावणेदोनशे किमी म्हणजे जवळजवळ चार तास!
(क्रमश:)