रेल्वेने वेग पकडलेला होता, तरीही मला प्रवास नको वाटत होता. त्याचं कारण म्हणजे येणारी झोप. बसल्या बसल्या झोपही येत नव्हती आणि आडवा होऊन थोडी झोप काढता येईल इतकी जागा करून घेण्याचाही कंटाळा आला होता. कधी नाही ते रेल्वे इतक्या वेळेवर निघालेली मी पाहिली असल्यामुळे वेळेवर पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मी दर तिसऱ्या किंवा चौथ्या मिनिटाला घड्याळ पाहत होतो. कितीही वेळा पाहिलं तरी ते बिचारं त्याच्या वेगानेच पळणार! असो.
रात्रीचे बरोब्बर बारा वाजायला आणि रेल्वे मदुराई जंक्शनला थांबायला एकच वेळ आली. ६ प्लॅटफॉर्म्स असलेल्या या स्टेशनवर मी उतरलो ते तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर. तिथून चालत येऊन पहिल्या प्लॅटफॉर्मला यायचं आणि मग बाहेर पडायचं! मला जितकी झोप आवश्यक वाटत होती, तितका जास्त उशीर होत होता. पण स्टेशनपासून हॉटेल अगदीच ४-५ मिनिटांच्या अंतरावर होतं. जास्त काही नाही, स्टेशन मधून बाहेर निघून, उजवीकडे, मग पहिलं डावं वळण आणि मग पहिलं उजवं वळण, आलं की हॉटेल! पोचल्यानंतर मात्र अजिबात वेळ न घालवता झोपी गेलो.
राजधानी चेन्नई इतकंच तमिळनाडूमधलं मदुराई हे महत्वाचं शहर! वैगई नदीच्या काठावर वसलेलं हे शहर भारतीय उपखंडामधील सर्वात जुनी मानवी वस्ती असलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. या शहराला अंदाजे २५०० वर्षांचा इतिहास आहे, असं सांगतात. शिवाय इ. स. पू. ५५० मध्ये देखील मदुराईचे प्राचीन युनान आणि रोम यांच्याशी व्यापारिक संबंध होते. या कारणांमुळे मदुराईला ‘पूर्वेकडील अथेन्स’ सुद्धा म्हणतात. तमिळनाडूची सांस्कृतिक राजधानी म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. तमिळनाडूमध्ये बोलल्या जाणाऱ्या नेल्लेई तमिळ, कोंग तमिळ, चेन्नई तमिळ आणि रामनाड तमिळ या चारही पद्धतींपेक्षा मदुराईमधील तमिळ ही विशेष आहे. कदाचित इथली तमिळ ही शुद्ध तमिळ आहे, असा समज इथे असावा. (अर्थात हा अंदाज आहे. याविषयी कुणाला काही माहीत असल्यास कृपया कमेंटमध्ये सांगावे.) काहीही असो. इथल्या तमिळ भाषेला उर्वरित राज्यापेक्षा जास्त महत्व प्राप्त झालेले आहे, एवढं नक्की!

आधी या शहराला मधुरा किंवा मधुरापुरी म्हणत. या ठिकाणावर कुठल्याही एकाजणाची सत्ता राहिली नाही. आधी पांड्य राजे (सुमारे ११ व्या शतकापर्यंत) आणि मग त्यानंतर चोल वंशाच्या राजांनी राज्य केलं. पुढे १३७२ मध्ये कंपन उदैय्याने हे शहर जिंकून ते विजयनगर साम्राज्यात समाविष्ट करून घेतले. यानंतर १५२९ मध्ये ‘नायक’ राजघराणे आले जे १७३६ पर्यंत मदुराईचे शासक राहिले. यापैकी तिरूमल नायक हा सर्वात पहिला शासक होता. यांच्या शासनकाळात राजधानीचं ठिकाण मदुराई किंवा तिरुचिरापल्ली, असं बदलत राहिलं. (१५२९-१६१६: मदुराई, १६१६-१६३४: तिरुचिरापल्ली, १६३४-१६९५: मदुराई, १६९५-१७१६: तिरुचिरापल्ली, १७१६-१७३६: मदुराई) या घराण्यानंतर मात्र इथे ब्रिटीशांची सत्ता आली.
पोचल्यानंतरचा दुसरा दिवस हा अतिशय व्यस्त असणार होता. कारण आमच्याकडे पूर्ण २४ तास सुद्धा नव्हते. पहिलं लक्ष्य होतं ते अर्थात मीनाक्षीअम्मन कोविल. सुदैवाने तेदेखील हॉटेलपासून सुमारे दीड ते दोन किमी होतं. हे ठिकाण इतकं सुंदर आहे की, कदाचित लिहिण्यासाठी शब्द कमी पडावेत. इथे आल्यानंतर मदुराईला “मंदिरांचं शहर” का म्हणतात, याची कल्पना येईल. एके काळी हे मंदिर म्हणजे शहराचा केंद्रबिंदू होते. या मंदिराला एकंदर १४ दरवाजे आहेत. त्याला ‘गोपुरम्’ म्हणतात. सगळेच इतके मोठे आणि उंच, की मान पूर्ण वर केल्याशिवाय वरचं टोक दिसणारच नाही. या सगळ्या गोपुरम् पैकी दक्षिण गोपुरम् हे सर्वात उंच आहे. (उंची- सुमारे १७० फूट) योगायोगाने मी याच गोपुरम् मधून आत गेलो आणि बाहेर आलो. आपली प्राचीन संस्कृती इथल्या लोकांनी अजूनही जपलेली आहे, हे मंदिर आतून बघताना लक्षात येतं. पण आत मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ देत नाहीत हो, काय करणार! एकेक जागा म्हणजे फोटोग्राफीसाठी खजिना आहे!

हे मंदिर नेमकं किती जुनं आहे, याबद्दल बरेच तर्क आहेत. इतकंच नाही, तर आधुनिक काळातही इथे काय काय झालं, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. तमिळ भाषेत लिहिल्या गेलेल्या साहित्यानुसार, हे बांधकाम सातव्या शतकात केलेलं आहे. १३१० मध्ये या मंदिरावर हल्ला होऊन बरीच लूट करण्यात आली. पुढे सुमारे २५० वर्षानंतर आर्य नाथ मुदलियार (इ. स. १५५९ – इ. स. १६००) यांनी या मंदिराच्या पुनर्निमाणाची जबाबदारी उचलली. हे आर्य नाथ मुदलियार म्हणजे ‘नायक’ घराण्यातल्या राजा विश्वनाथ नायक यांचे मंत्री होते.
हातात असलेला वेळ लक्षात घेता, हे ठिकाण पूर्ण फिरून बघणं अशक्य होतं. खूप घाई करून सुद्धा दीड तास लागलाच. नंतरचं महत्वाचं ठिकाण म्हणजे तिरूमल नायक पॅलेस. वर उल्लेख केलेले राजे. ते राहत असलेला महाल आजही लोकांना बघण्यासाठी खुला आहे. १७३६ मध्ये नायक घराण्याची सत्ता जाऊन जेव्हा ब्रिटीशांचं राज्य आलं, तेव्हा या महालाचा उपयोग सरकारी कार्यालय म्हणून केला जाऊ लागला. संध्याकाळी या महालाच्या प्रांगणात एक लाईट अँड साऊंड शो केला जातो, ज्यात इथले राजे आणि त्यांच्या कामाविषयी माहिती सांगण्यात येते. या ठिकाणाला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

कधी काळी हे शिक्षणाचं मुख्य केंद्र राहिल्यामुळे आजही इथे शिक्षण घेण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. धार्मिक केंद्राबरोबरच हे औद्योगिक केंद्र आहे. ज्यात सूत कातणे, रंगवणे, लाकडावरील कोरीवकाम ह्या आणि इतर अनेक लहान मोठ्या उद्योगांचा समावेश आहे.
मदुराईमध्ये गेल्यानंतर हेच खरं तमिळनाडू, असं वाटल्याशिवाय राहत नाही. आपण इतक्या सुंदर शहरात एका दिवसासाठी का होईना, पण आलो याचं समाधान वाटलं. इथले लोक, संस्कृती आणि शहराचं सौंदर्य साठवून घेत परत रेल्वे स्टेशनला पोचलो. गाडी येण्यासाठी आता थोडाच वेळ शिल्लक होता.
(क्रमशः)