मदुराईवरून निघून दोन तासांच्या वर होऊन गेले होते. गेल्या वेळेसारखा याही वेळी कंटाळा येत होता. भाषेच्या अडचणीमुळे रेल्वेमध्ये सहप्रवाशांसोबत काही बोलणं सुद्धा अवघड होतं. जवळजवळ ४ तासांच्या प्रवासानंतर पोहोचलो ते नागरकोयिल स्टेशनवर. कन्याकुमारीपर्यंत पोचण्यासाठी आधी नागरकोयिल स्टेशनला उतरून मग रोडने तिथपर्यंत पोचण्याचं नियोजन केलेलं होतं. नागरकोयिल ते कन्याकुमारी अंतर सुमारे २० किमी आहे. तसंच कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनिक केंद्र देखील नागरकोयिल हेच आहे.
हॉटेलला पोचलो तेव्हा जास्त काही रात्र झाली नव्हती. हॉटेलच्या समोरच्या बाजूलाच समुद्र होता. पण रात्रीचा अंधार असल्यामुळे आणि रस्त्यांवर जास्त दिवे नसल्यामुळे तो दिसत नव्हता, फक्त लाटांचा आवाज येत होता. कन्याकुमारी हे ठिकाण असं आहे, जिथे सूर्य समुद्रातून उगवतांना दिसतो आणि मावळतानाही समुद्रात बुडी मारल्यासारखा वाटतो. या दोन्हीही वेळेला लोकांची तो क्षण टिपण्यासाठी खूप गर्दी होत असते.

कन्याकुमारी हे भारताचं शेवटचं टोक आहे, हे बहुतांश लोकांना माहीतच आहे. या ठिकाणाला ‘केप कॉमोरीन’ म्हणून सुद्धा ओळखतात. स्थानिक (तमिळ) भाषेत या शहराला ‘कन्नीकुमारी’ सुद्धा म्हटले जाते. बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तिन्ही समुद्र या ठिकाणी मिळतात. नुसते मिळत नाहीत, तर जमिनीच्या त्या शेवटच्या टोकावरून तिन्ही समुद्रांचे तीन वेगवेगळे रंग दिसतात.
मला सकाळी लवकर उठायचा कंटाळा असल्यामुळे मी ठरवलं की, सूर्योदय पाहण्याऐवजी सूर्यास्त पाहू. अर्थातच त्याला कमी मेहनत लागणार होती ना! पण का कोण जाणे, मला सकाळी लवकर जाग आली. मी उठून बसलेलो असतांना परत झोपण्याचा प्रयत्न केला. पण नाहीच! आता जाग आलेलीच आहे, तर जाऊन सूर्योदय बघावा म्हणून हॉटेलच्या बाहेर आलो. हॉटेल हे अगदी पूर्व दिशेला तोंड करून होतं. सूर्योदय असा लाईव्ह मॅच सारखा समोर दिसत होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सूर्य कसा उगवतो ते बघत होतो. आत्तापर्यंत अर्धवट उघडे असलेले डोळे, तो सूर्योदय बघून पूर्णपणे उघडले गेले.

सकाळच्या वेळी थोडं धुकंसुद्धा दिसत असल्यामुळे सूर्य उगवल्यानंतर सुद्धा तो थोडा वर येईपर्यंत वाट बघावी लागली. पण ते जे दृश्य दिसतं ना, ते असं सांगायचा प्रयत्न तर करीन, पण कितपत वर्णन होईल, सांगता येत नाही. त्यासाठी ते प्रत्यक्षच बघायला पाहिजे. हॉटेलच्या त्या प्रांगणात कदाचित मी एकटाच असा अर्धवट झोपेत असेल. सगळे लोक कॅमेरे हातात घेऊन फोटो काढत होते. कुणी समुद्र, स्मारक किंवा सूर्योदयाचे फोटो घेण्यात मग्न होते, तर काही मागे या तिन्ही गोष्टी येतील अशा पद्धतीने फोटो काढून घेत होते. ते बघून मीही मोबाईलमध्ये काही फोटो काढून घेतले.
शक्य होईल तितक्या लवकर आवरून घेऊन मी बोट निघण्याच्या जागी पोचलेलो होतो. एका वेळी जवळजवळ ५० ते ६० लोकांना घेऊन जाणारी ही बोट विवेकानंद स्मारकाकडे जाणार होती. हे स्मारक म्हणजे मुळात एक खडक आहे, ज्यावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती. १९७० मध्ये इथे या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधण्यात आलं. भारत भ्रमण करत असतांना स्वामी विवेकानंद प्रवास करत इथे आले. ती तारीख होती- २५ डिसेंबर, १८९२. त्यावेळी असलेल्या हवामानामुळे समुद्र अजिबात शांत नव्हता. समुद्राच्या या अवतारापुढे कुणाही मच्छिमार/ नावाडीची पाण्यात जाण्याची हिम्मत होईना. शेवटी जमिनीपासून ते त्या खडकापर्यंत असलेलं ते अंतर विवेकानंद यांनी स्वत: पोहत पार केलं आणि पुढे तीन दिवस- २५, २६, आणि २७ डिसेंबर ते तिथे ध्यानस्थ होते. या स्माराकाबरोबरच इथे ध्यान मंदिरही बनवलेलं आहे.

स्मारकाच्या मागच्या बाजूला जमिनीवर एक भलीमोठी आकृती काढण्यात आलेली आहे. त्यात कुठल्या महिन्यात कोणत्या रेषेत सूर्य उगवेल, हे दाखवलं गेलेलं आहे. असं म्हणतात, की हे इतकं अचूक आहे की, आज पर्यंत बरोब्बर त्याच रेषेत सूर्य उगवत आलाय. म्हणजे एक प्रकारे सूर्य उगवण्याचं कॅलेंडरच!
स्मारकाच्या समोरच्या बाजूला कन्याकुमारी मंदिर आहे ज्यात एका खडकावर एका पायाचा ठसा आहे. प्राचीन मान्यतेनुसार आणि स्थानिक लोकांनुसार इथे देवी कन्याकुमारीने तपस्या केली होती, असं सांगितलं जातं. त्याच जागेवर सध्या मंदिर असून आजही तो ठसा तसाच आहे. काही लोक हा पायाचा ठसा विवेकानंदांचा आहे, असं म्हणतात. परंतु, त्यात तथ्य नाही.

या दोन्हीही गोष्टींच्या किंचित दक्षिणेकडे महान तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा पुतळा आहे. याचा आधार हा ३८ फूट, तर पुतळा ९५ फूट उंच आहे. १३३ फूट उंच असलेल्या या पुतळ्याला बनवण्यासाठी तब्बल १,२८३ शिळांचे (दगड) तुकडे वापरण्यात आले. १ जानेवारी, २००० पासून ही जागा लोकांना बघायला खूळ करण्यात आली. २००४ च्या डिसेंबर महिन्यात आलेल्या त्सुनामीच्या लाटा थेट या पुतळ्यावर धडकल्या होत्या. त्या परिस्थितीतही याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. या जागेपासून १०० किमीच्या वर्तुळात जरी भूकंप झाला, तरी ६ रिश्टर स्केल पर्यंत हा पुतळा स्थिर राहील, अशा प्रकारे याची रचना केलेली आहे. आहे की नाही आश्चर्य! हवामानाच्या अंदाजानुसार समुद्र शांत नसल्याच्या स्थितीत मात्र व्यवस्थापनाकडून इथे पर्यटकांना जाण्यासाठी प्रवेश मर्यादित करण्यात येतो किंवा कधी नाकारलाही जातो.
विवेकानंद स्मारकाहून परत आल्यानंतर थोडं जास्त चालावं लागलं. खरं तर अजून फिरण्याचा कंटाळा आला होता. पण एकच ठिकाण राहिलेलं असल्यामुळे थांबत, गप्पा मारत मारत पोचलोच. ते होतं- कन्याकुमारी अम्मन मंदिर. हे मंदिर देवी पार्वतीला समर्पित आहे. तिन्ही समुद्रांचा संगम ज्या ठिकाणी होतो, बरोबर त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. या मंदिराचं पूर्वेकडील प्रवेशद्वार हे नेहमीकरता बंद केलं गेलेलं आहे. असं म्हणतात की, पूर्वेकडून येणारी सूर्याची किरणे देवीच्या आभूषणांवर पडतात तेव्हा जहाजांना तिथे ‘लाईट हाऊस’ असल्याचा भास होतो आणि ते जहाज किनाऱ्यावर लावायची तयारी करतात. परंतु तिथे किनारा नसून फक्त समुद्रच असल्याने दुर्घटना व्हायची दाट शक्यता असते. या कारणामुळे हा दरवाजा बंद ठेवलेला आहे.
सगळं फिरून परत येईपर्यंत दुपारचे दोन वाजून गेलेले होते. जेवणाची तर गरज होतीच, पण त्याहीपेक्षा झोपेची जास्त गरज होती. या सगळ्या गोष्टी हॉटेलच्या खूप जवळ होत्या तरीही इतका थकलेलो होतो की, काहीही करायची इच्छा नव्हती. अजून अर्ध्या दिवसाचा मुक्काम शिल्लक राहिलेला होता. मला कुठलाही अडथळा नको होता. मी मोबाईल ठेवून दिला. झोप कधी लागली ते कळलंही नाही.
(क्रमश:)