१२ डिसेंबर. इतर ठिकाणी या दिवशी काही जरी असलं, तरी माझ्या लेखी मला हा दिवस सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस म्हणूनच लक्षात येतो. तसे त्यांचे जगभरात अब्जावधी चाहते असतील, मी सुद्धा त्यातलाच एक! “र-ज-नी-कां-त” ही पाच अक्षरे त्यांच्या चाहत्यांना अक्षरशः वेडी करायला पुरेशी आहेत. त्याच दृष्टीने पाहता, एक चाहता म्हणून हे वर्ष माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच लकी ठरलं. त्याचं कारण म्हणजे या एकाच वर्षात त्यांचे आलेले २-२ सिनेमे. एक होता जूनमध्ये आलेला “काला करिकालन” तर दुसरा बहुप्रतीक्षित “२.०”. सिनेमागृहात बसून तुमचा सिनेमा पाहतांना, जेव्हा पिक्चरच्याही आधी तुमचं नाव येतं, “S-U-P-E-R-S-T-A-R R-A-J-N-I” ही १४ अक्षरं येऊन जाईपर्यंत कानाच्या कानठळ्या बसण्याइतका आवाज (त्यात माझा घसा बसेपर्यंत मीही आरडाओरडा केलाय)….हा अनुभव, नव्हे आनंद शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. रजनी सर, वय म्हणजे केवळ एक संख्या म्हणून तुम्ही एकेक वर्ष मागे टाकत गेलात. तुमचे चाहते तुम्हाला देव मानतात तर ते का मानतात, हे मी स्वतः चेन्नई आणि मदुराई या शहरांतून फिरलो तेव्हा समजलं. आता हे माझं दुर्दैव की माझा मुक्काम तिथे खूप कमी राहिला. पिक्चर आपटला म्हणून वितरकांचे पैसे परत करणारे तुम्ही, सिनेसृष्टीत ४३ वर्षं काम करून लोकप्रियतेच्या शिखरावर तुम्ही वावरत असतांना तितकेच साध्या राहणीमानात कसे काय राहू शकता, हे एक कोडंच आहे. भारतासोबतच इतर अनेक देशांत चाहतावर्ग निर्माण केलेल्या, इतक्या उंचीवर वावरत असून कधीही कुठल्याच वादात न सापडलेल्या, जगभरात सर्वात जास्त विनोद आपल्यावर बनलेले असतांनाही त्याचा मनमुराद आनंद घेणाऱ्या, तमिळसोबत तेलुगु, कन्नडा आणि हिंदी सिनेमात आपला दबदबा ठेवणाऱ्या या महान कलाकारास देव दीर्घायुष्य देवो आणि तुम्ही उत्तरोत्तर रुपेरी पडद्यावरून आमच्यासमोर येत राहो ही कामना मनात ठेवत तुम्हाला ६८व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!