चित्रपट – वेलीपडीन्ते पुस्तकम्
भाषा – मल्याळम
दिग्दर्शक – लाल जोस
कलाकार – मोहनलाल, एना राजन, सलीम कुमार, सिद्दीक, अनूप मेनन, अरुण कुरियन, अप्पानी सरत
संगीत – शान रेहमान

भाषा कुठलीही असो, कॉलेज या विषयावर ढीगभर सिनेमे सापडतील. कॉलेजमधील मैत्री किंवा कॉलेजमधली प्रेमकथा, कधी क्वचित कॉलेजमधली कॉमेडी, तर कधी शिक्षणव्यवस्थेवर भाष्य किंवा अजून कितीतरी! कॉलेजवाले सिनेमे या गोष्टींशिवाय यशस्वी होत नाहीत, असं मानणारा एक निर्मातावर्ग आहे. परंतु, तुमच्याकडे चांगली कथा असेल, त्याला साजेसा अभिनय असेल आणि चांगली टीम असेल, तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, हे “Complete Actor” म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहनलाल आणि दिग्दर्शक लाल जोस यांनी दाखवून दिलं आहे.

सिनेमाची सुरुवात चुकवून चालणार नाही कारण ती नाही पहिलीत तर पुढची कथा कळणारच नाही. सुरुवातीलाच पावसात चाललेला एक फाईट सीन, ज्यात एका व्यक्तीचा खून होतो आणि पुढची कथा एका कॉलेजपासून सुरु होते.

फादर मायकल एडीकुला (मोहनलाल) हे एका समुद्रकिनारी असलेल्या आणि फारशा प्रसिद्ध नसलेल्या कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून रुजू होतात. कॉलेजमध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील मुले शिकत असल्यामुळे तसे दोन गट आहेत आणि त्यांच्यातली भांडणं हा कॉलेजमधला रोजचा दिनक्रम आहे. प्रोफेसर मायकल याच्यावर तोडगा काढण्यात यशस्वी होतात आणि दोन्ही गटात समेट घडवून आणण्यात सफल होतात. ही गोष्ट त्यांना अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय बनवते.

कॉलेजच्या लगत असलेली जमीन ही विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राखीव असते. परंतु, स्थानिक गुंड माथन तारकन (सिद्दीक) याचा डोळा त्या जमिनीवर आहे. कॉलेज हे फार काही प्रसिद्ध नसल्यामुळे वसतिगृह बांधायचं कसं, याची आर्थिक अडचण कॉलेजसमोर उभी राहते. या अडचणीवर तोडगा म्हणून प्रोफेसर मायकल हे कॉलेजचे संस्थापक विश्वनाथन यांच्या आयुष्यावर चित्रपट काढायची कल्पना मांडतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रपटात फक्त कॉलेजचेच विद्यार्थी किंवा कर्मचारी काम करतील, अशी अट प्रोफेसर मायकल ठेवतात. चित्रपट चालला तर त्याला मिळालेला नफा हा वसतिगृहाच्या बांधकामासाठी वापरता येईल, अशी त्यांची संकल्पना असते.

चित्रपटात असलेल्या सगळ्या पात्रांसाठी सगळ्यांची निवड झाल्यावर विश्वनाथनच्या भूमिकेसाठी पेच पडतो आणि प्रोफेसर मायकल स्वत: ही भूमिका करायला तयार होतात. चित्रपट बनवण्यासाठी आवश्यक ते संशोधन झाल्यावर माथन तारकनला खलनायक ठरवून कथा लिहिली जाते आणि चित्रीकरणाला सुरुवात होते. परंतु, या गोष्टीला तारकन विरोध करतो. त्याच्या विरोध करण्याचं कारण कळेपर्यंत तारकनलाच खुनी समजत असतात. परंतु, एक दिवस माथन तारकन प्रोफेसर मायकलला सगळं सत्य सांगतो आणि विश्वनाथनच्या बाबतीत सत्य समोर येतं. सिनेमाच्या सुरुवातीला ज्याचा खून झाला, तो विश्वनाथन आहे, याचाही उलगडा होतो.

वास्तविक विश्वनाथनचा खून हा तारकनचा हस्तक काका रमेशन (सी. विनोद जोस) याने केलेला असतो, जो तुरुंगातून बाहेर आल्यावर चित्रीकरण थांबवण्यासाठी कॉलेजच्या मुलांना आणि सिनेमात काम करणाऱ्या सगळ्या टीमला शूटिंग थांबवावी म्हणून धमकी देतो. परंतु, प्रोफेसर मायकल काका रमेशनचा बंदोबस्त करतात आणि कॉलेजचे लोक चित्रपट प्रदर्शित करण्यात यशस्वी होतात. चित्रपट सुपरहिट होऊन सगळी आर्थिक अडचण दूर होते आणि प्रोफेसर मायकल नवीन बनलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करतात.

सिनेमाची ताकद ही त्याची कथा असते, हे कुठल्याही सिनेमाला लागू पडतं. इथेही तेच आहे. नुसती कथा चांगली असून उपयोग नसतो, तर त्याला व्यवस्थित पडद्यावर मांडायची जबाबदारी ही दिग्दर्शकाची असते. लाल जोस यांनी ती लीलया पेलली आहे. प्रोफेसर मायकल आणि विश्वनाथन या दोन्हीही भूमिकेत मोहनलाल यांना बघणे हे एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. दोन्हीही भूमिकांना त्यांनी समान न्याय दिला आहे. सहकलाकार म्हणून एना राजन, सलीम कुमार, अनूप मेनन यांनी आपल्या भूमिका छान केल्या आहेत. दोन्हीही कॉलेज गॅंगचे लीडर म्हणून अरुण कुरियन आणि अप्पानी सरत हे शोभून दिसतात.

अभिनयाबरोबरच कॅमेरामन विष्णू सर्मा यांनी केरळमधील निसर्ग सौंदर्य टिपण्याचा पुरेपूर आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. समुद्र, तिथल्या किनाऱ्यावर असलेली घरे, हिंदी सिनेमांप्रमाणे न वाटणारं आणि वास्तववादी वाटेल असं कॉलेज अशा अनेक गोष्टींसाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

का पहावा – एक हलकीफुलकी आणि मनोरंजक कथा, तसेच अप्रतिम कॅमेरावर्क अनुभवण्यासाठी!

का पाहू नये – निश्चित असं कारण नाही, कारण सिनेमात उणीव काढण्यासारखं असं काही नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *