चित्रपट – मास्टर
भाषा – तमिळ
दिग्दर्शक – लोकेश कनगराज
कलाकार – विजय, मालविका मोहनन, विजय सेतुपती, नासर, अँन्ड्रिया जर्मिया, अर्जुन दास
संगीत – अनिरुद्ध रविचंदर

२०२० हे वर्ष प्रत्येक व्यवसायासाठी फार भयंकर वर्ष ठरले. सगळीकडे लॉकडाऊनचा माहोल असल्यामुळे सिनेसृष्टीवरही त्याचा परिणाम झालाच. चित्रीकरण बंद पडल्यामुळे सिनेमे येऊ शकले नाहीत. जे बनून तयार झाले होते ते सिनेमागृहे बंद असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. थोडक्यात सिनेरसिकांसाठी ही निराशाजनक बाब होती. परंतु, २०२० सरता सरता सिनेमागृहात एक जागा सोडून लोक बसता येतील, अशी परवानगी दिली गेली आणि माझ्यासारख्या सिनेमावेड्या असलेल्याला आभाळ ठेंगणे झाल्यासारखा भास झाला. लॉकडाऊन नसतं, तर मागच्या वर्षी मे महिन्यातच सिनेमा आला असता. सिनेमा म्हणजे साक्षात दोन सुपरस्टार्सची टक्कर होती. “तलपति” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय आणि “मकल सेल्वन” म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजय सेतुपती यांच्या तगड्या आणि कसदार अभिनयाची जुगलबंदी होती ती!

सिनेमाची सुरुवात होते ती एका युवकावर होणाऱ्या अन्यायापासून! भवानी (विजय सेतुपती) या तरुणाला लहान वयातच खोटा आरोप लावून त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो. वय कमी असल्यामुळे बालसुधारगृहात त्याची रवानगी होते. तिथे केल्या गेलेल्या शारीरिक छळामुळे त्याच्यात खराखुरा गुन्हेगार तयार होत जातो. हाच भवानी एक दिवस बालसुधारगृहातून पळून जातो आणि गुन्हेगार म्हणून आपले अवैध धंदे तो सुरु करतो.

इकडे चेन्नईमध्ये स्थित एका कॉलेजमध्ये प्रोफेसर “जे. डी.” (तलपति विजय), कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि सध्या त्याच कॉलेजमध्ये शिकवत असतो, जो विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे, कारण तो विद्यार्थ्यांच्या बाजूने नेहमी उभा राहतो, कॉलेज व्यवस्थापनाला ही गोष्ट नेहमी खटकत असल्यामुळे त्याचे इतर प्रोफेसर्सशी खटके उडत राहतात. एक दिवस कॉलेजमध्ये निवडणुका घ्याव्यात, असं मत जेडी व्यक्त करतो. परंतु, विद्यार्थी आणि राजकारण यांचा संबंध नको म्हणून प्राचार्य नकार देतात. लोकशाहीचे महत्व मुलांना कॉलेजजीवनातच कळू शकेल, असा जेडीला विश्वास असतो, त्यामुळे काही नुकसान झाल्यास मी राजीनामा देईन, अशी ग्वाही जेडी लिखित स्वरुपात देतो. निवडणूकीनंतर झालेल्या गोंधळात काही विद्यार्थी जखमी होतात आणि जेडीला राजीनामा द्यावा लागतो.

तिथून निघून जेडीची रवानगी त्याच बालसुधारगृहात होते, जो भवानीचा अड्डा बनलेला आहे. स्वत: गुन्हे करून बालसुधारगृहातल्या मुलांना बळजबरी पोलिसांकडे सरेंडर करायला सांगणे, हि त्याची पद्धत आहे. कारण कायद्याने लहान मुलांना तुरुंगात टाकता येऊ शकत नाही, हे त्याला माहीत आहे. मुलांना नशेचे व्यसन लावून त्यांच्याकडून तो वाटेल ते करून घेत असतो. जेडीला सुरुवातीला काम करण्यात रस नसल्यामुळे तो या सगळ्याकडे लक्ष देत नाही. परंतु, एके दिवशी दोन लहान मुलांनी सरेंडर करायला नकार दिल्यामुळे त्यांची हत्या होते आणि जेडी त्यामुळे व्यथित होतो. आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होऊन तो त्या जागेला खऱ्या अर्थाने “सुधारगृह” बनवायचं ठरवतो.

दरम्यानच्या काळात काही पोलिस अधिकाऱ्यांचेही यात हात गुंतलेले असल्यामुळे त्याला सहकार्य मिळत नाही. परंतु, तुम्ही केलेल्या नशेमुळे तुम्ही इथेच आहात आणि गुन्हे करत आहात, तुमचा पहिला गुन्हा सोडला तर तुम्ही प्रत्येक गुन्हा नशेत केलेला आहे, हे जेडी सगळ्या मुलांना पटवून देण्यात यशस्वी होतो आणि शेवटी हीरो आणि व्हिलनमध्ये होणाऱ्या संघर्षात जेडी भवानीचा बीमोड करण्यात यशस्वी होतो.

सिनेमाची ताकद ही त्याची कथा असते, हे मी आधीही म्हटलोय. लोकेश कनगराजने बरोबर प्रेक्षकांच्या मनाचा धागा पकडलाय असं वाटतं. मास्टर जर एक दुचाकी वाहन असेल तर विजय आणि विजय सेतुपती ही त्याची दोन चाकं आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विजय सेतुपतीने साकारलेला भवानी खराखुरा वाटतो, ही त्याच्या अभिनयाची पावतीच म्हणावी लागेल. दिवसेंदिवस हा माणूस आणि याचा अभिनय बहरत चाललाय. विजयचा जलवा बघायला मिळतो तो मध्यंतराच्या वेळी होणाऱ्या फाईटमध्ये आणि दुसऱ्या हाफमध्ये! सहकलाकार म्हणून मालविका आणि अँन्ड्रिया जर्मिया ठीक आहेत, त्यांच्या वाट्याला जास्त काम आलेलं नाही. दुसऱ्या हाफमध्ये काही दृश्ये वगळता येऊ शकत होती जेणेकरून १७९ मिनिटे चालणाऱ्या सिनेमाची लांबी थोडीशी कमी झाली असती. जेडी आणि चारू (मालविका मोहनन) यांच्यातला ‘लव्ह एन्गल’ याचा तसा कथेशी काही संबंध वाटत नाही. भवानीच्या भूतकाळाविषयी थोडासा भाग दाखवता आला असता, किमान तसा प्रयत्न तरी व्हायला पहिजे होता.

संगीत म्हणायचं झालं, तर विजयने गायलेलं “कुट्टी स्टोरी” हे अगदी श्रवणीय आहे. शिवाय जेडी कॉलेजमध्ये एन्ट्री करताना असलेलं “वात्ती कमिंग” हे गाणं ऐकून नाचायची इच्छा न झाली तर नवलच! एका मास एन्टरटेनर सिनेमाला आवश्यक असणारं संगीत अनिरुद्धने बरोबर दिलं आहे.

का पाहावा – विजय आणि विजय सेतुपतीच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा म्हणजे नवीन वर्षाची भेटच आहे. दोघांनीही आपल्या अभिनयाने इतकी उंची गाठली आहे की, हे दोघेही एखाद्या धुमकेतूप्रमाणे आहेत आणि त्यांनी समोरासमोर उभं राहणं म्हणजे त्यांचा टकरावच म्हणावा लागेल. बाकी नशेच्या आहारी जाऊ नये, हा संदेश उत्तम!

का पाहू नये – जास्त लांबीचे सिनेमे बघायला आवडत नसतील तर!

2 Responses

  1. Apratim Lekh!!
    Agadi Mojkya Shabdat Mandlay Saar. Lekh wachtana purn chitrpat parat Pahtoy As Watal.
    Mast 👌👍

    1. धन्यवाद प्रशांत! आपल्या प्रतिक्रिया नेहमीच अनेक व उत्तम लेख लिहायची प्रेरणा देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *