चित्रपट – कना
भाषा – तमिळ
दिग्दर्शक – अरुणराजा कामराज
कलाकार – ऐश्वर्या राजेश, सत्याराज, शिवाकार्तिकेयन, दर्शन
संगीत – डी. एन. थॉमस

“वूमेन सेन्ट्रीक फिल्म” म्हणून आपल्याकडे एक संकल्पना आहे. टिपिकल हीरोच्या भोवती फिरणारे आणि अशा प्रकारच्या कथानकाचे सिनेमे खूप बनले असतील आणि आजही बनत आहेत. त्याचप्रमाणे क्रीडा जगतावर आधारितही बरेच (चांगले) सिनेमे येऊन गेलेत. कौटुंबिक मूल्ये ही तर दक्षिणेकडच्या सिनेमांची खासियत! मूलत: गीतकार असणाऱ्या अरुणराजा कामराज यांनी स्वप्न, खेळ, कौटुंबिक भावना, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीविषयी प्रशासन आणि बँक यांची उदासीनता, आयुष्यातले चढ-उतार, थोडासा विनोद आणि क्वचित कुठेतरी प्रेमाचा कोपरा, अशा अनेक गोष्टींना एकत्र करून एक गोष्ट लिहिली. आता इतक्या सगळ्या गोष्टी अडीच-तीन तासांच्या आत बसवायच्या म्हणजे कसरतच झाली ती! शिवाय स्वत:च त्याचं दिग्दर्शकही व्हायचं, ही जोखीम कमी नाही.

Kanaa-1

सिनेमा सुरु होतो एका क्रिकेटच्या मैदानावर! दोन गट मैदानावरच आपापसांत बॅट, स्टम्प वगैरे जे हाती येईल ते घेऊन मारामारी करतात आणि पोलिसांना बोलावण्याची वेळ येते. दोन्हीही गटांना पोलिस स्टेशन मध्ये आणल्यानंतर त्याच सामन्याची कॉमेंट्री करणारे सचिन आणि तेंडुलकर (या दोन वेगवेगळ्या व्यक्ती दाखवल्या आहेत) ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला (रामदोस) काय काय झालं, ते सांगायला सुरुवात करतात.

Kanaa-2

मुरुगेसन (सत्याराज) हा एक मध्यमवर्गीय शेतकरी आहे. गावात असलेल्या स्थानिक नेत्याला मुरुगेसनची जमीन हवी असते. त्या जमिनीवर सरकार मेडिकल कॉलेज बांधेल तर तुझ्यामुळे लोकांचं कल्याण होईल, या मार्गाने तो मुरुगेसनला गळ घालत असतो. परंतु मुरुगेसन त्याला अजिबात दाद देत नाही, कारण जमीन माझ्या आईसमान आहे आणि आईला कोणी विकत नाही, अशी त्याची भावना असते. मुरुगेसनला एक कौसल्या नावाची लहान मुलगी आहे, एका कोणत्याही मुलीला आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडेल, त्याच वर्गात बसणारी ती मुलगी. शेतीबरोबरच मुरुगेसनला क्रिकेटचे वेड आहे. २००७ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमधून भारतीय संघ बाहेर पडल्यामुळे त्याला अश्रू अनावर होतात आणि पाचवी-सहावीत शिकत असलेली कौसल्या स्वत: क्रिकेट खेळून वडिलांना खूष करायचं ठरवते.

शाळेत इतर कुणाकडूनही सहकार्य न मिळाल्यामुळे आणि क्रिकेट मुलांचा खेळ आहे या मानसिकतेमुळे नाईलाजाने तिला मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा पर्याय निवडावा लागतो. कौसल्या मोठी होईपर्यंत खेळण्यामध्ये काहीही अडचण येत नाही. पण हळूहळू या गोष्टीची गावात चर्चा व्हायला लागते आणि त्याचं रुपांतर टोमणे आणि शेरेबाजीमध्ये होतं. याच अशा एका सामन्यात एका खेळाडूने बॅटिंग करताना कौसल्यावर (ऐश्वर्या राजेश) मैदानावरच शेरेबाजी केल्यामुळे वादाला तोंड फुटून मैदानावरच मारामारी होते आणि पोलिस दोन्हीही गटांना घेऊन जातात. हाच तो सुरुवातीला दाखवलेला प्रसंग! सगळ्यांना आणलेल्या लोकांमध्ये कौसल्यादेखील असते. मुरुगेसन पोलिस स्टेशनला पोचल्यानंतर “ती जर खेळली नसती तर काही घडलंच नसतं” या नावाखाली सगळे कौसल्यालाच दोषी ठरवतात. मुरुगेसन मात्र आपल्या मुलीची बाजू घेत ती एक दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळेल, असं सांगून निघून जातो.

कौसल्यादेखील प्रयत्न करत राज्यस्तरीय संघात स्थान मिळवायचा प्रयत्न करते परंतु पहिल्या प्रयत्नात यश येत नाही. इकडे मुरुगेसनच्या शेतातल्या विहिरी आटून भरपूर नुकसान होतं आणि घेतलेलं कर्ज फेडायचं कसं, हा प्रश्न समोर उभा राहतो. सरकारकडून पीक विमाच्या मिळणाऱ्या पैशांमधून कर्ज फेडायचा मुरुगेसनचा विचार असतो पण तिकडूनही मदत मिळत नाही आणि बँक त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात करते. इकडे दुसऱ्या प्रयत्नात कौसल्या यशस्वी होऊनही तिला शिबिरामध्ये तमिळ सोडून दुसरी भाषाच येत नसल्याने आणि वरिष्ठ खेळाडूंसकट प्रशिक्षकही त्रास देत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Kanaa-4

इकडे करियरच्या शेवटी शेवटी पराभव नको म्हणून प्रशिक्षक निवृत्ती घेतात आणि बीसीसीआय नेल्सन दिलीपकुमारला (शिवाकार्तिकेयन) प्रशिक्षक म्हणून नियुक्त करते. नेल्सन एकेकाळी भारतीय संघात असतो परंतु एका अपघातामुळे त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असते. कोच म्हणून आल्यावरही काही मुली त्याचं ऐकायला तयार होत नाहीत. हळूहळू प्रगती करत संघ महिला टी-२० वर्ल्डकप मध्ये उतरतो मात्र त्यात कौसल्याला बाहेर बसावं लागतं. वास्तविक तिच्यातले गुण हेरून तिला योग्य वेळी मैदानावर उतरवण्याचा नेल्सनचा डाव असतो. याआधी कधीच संधी न मिळालेली कौसल्या मैदानात येते ती थेट सेमी फायनललाच! इकडे सामन्याची वेळ झालेली असताना बँकेचे हफ्ते थकल्यामुळे मुरुगेसनच्या घरावर जप्ती येऊन त्याला घर सोडावं लागतं. या वेळेला आपण तिथे नाही, यामुळे कौसल्या खेळायचं नाही म्हणून नेल्सनला सांगते. “जे रडत बसतात, जग त्यांची नेहमी टिंगल करतं. तुझ्या वडिलांसाठी काही करायचं असेल तर मैदानात उतर.” असं सांगत नेल्सन तिला खेळायला पाठवतो. कौसल्याही संधीचा फायदा घेत एक हॅट्ट्रीक, बॅटिंगमध्ये सिक्सर आणि सुपर ओव्हरमध्ये २ विकेट घेत “प्लेअर ऑफ दि मॅच”चा मान मिळवते. मिळालेली रक्कम ती कर्ज फेडायला वापरणार असं जाहीर करत, ‘इथे तर देशाला जिंकून देण्यासाठी टीम आहे परंतु सगळ्या देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याची काळजी घ्यायला कुठली टीम आहे का?’ असा कौसल्या सवाल करते. शेवटच्या टायटल कार्डमध्ये भारतीय संघ महिला टी-२० आपल्या नावावर करतो.

इतके सगळे पैलू अडीच तासाच्या सिनेमात बसवले हेच एक मोठं यश म्हणावं लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये मुरली (दर्शन), त्याचे मित्र सचिन आणि तेंडुलकर, मुरलीचे कौसल्यावर असलेले एकतर्फी प्रेम, त्यातून निर्माण होणारे काही विनोदात्मक प्रसंग सिनेमाची एक बाजू सांभाळून ठेवतात. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत शिवाकार्तिकेयन अगदी चपखल. सत्याराजच्या भूमिकेला तर तोड नाही. त्याच्याशिवाय कदाचित ती कोणाला जमलीही नसती, असं वाटतं. दर्शनच्याही वाट्याला आलेल्या छोट्याशा भूमिकेत सुद्धा तो लक्षात राहतो. संगीताच्या बाबतीत बोलायचं झालं तर पारंपारिक वाद्यांचा वापर करत बनलेलं अनिरुद्धच्या आवाजातलं “ओत्तयडी पादयिल” गाणं परत परत ऐकावंसं वाटेल, असं आहे. तसेच शिवाकार्तिकेयनच्या मुलीच्या आवाजात असलेलं आणि तिच्यासोबत स्वत: शिवाकार्तिकेयनने म्हटलेलं “वायाडी पेत्त” याच्यात वेगळीच गोडी आहे.

सिनेमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण वगैरेची खूप चर्चा होत असते. हल्ली तर आता वेब सिरीजचा जमाना आलाय. पण ‘वीरे दी वेडिंग’ सारखे सिनेमे, किंवा ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सारख्या वेब सिरीजमधून खरंच आपण ते साधतो का? किंवा अजून काही साधत असू तर ते काय आहे, याचं उत्तर आजपर्यंत तरी सापडलेलं नाही.

का पाहावा – एक परफेक्ट स्पोर्ट्स ड्रामा बघायचा असेल तर!

का पाहू नये – भावनिक सिनेमे आवडत नसतील तर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *