चित्रपट – दृश्यम: २
भाषा – मल्याळम
दिग्दर्शक – जितू जोसेफ
कलाकार – मोहनलाल, मीना, अन्सीबा हासन, एस्थर अनिल, मुरली गोपी, आशा सरत, सिद्दीक
संगीत – अनिल जॉन्सन

एक सिनेमा येणं, तो अगदी सुपरहिट होणं आणि त्याचा दुसरा भाग म्हणून अजून एक सिनेमा येणं, हा प्रकार आजकाल नवीन राहिलेला नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, कन्नडा अशा कितीतरी भाषांची उदाहरणे देता येतील. ‘दृश्यम्’ हा त्यातलाच एक! २०१३ मध्ये मोहनलालचा मल्याळम भाषेत दृश्यम् आला आणि त्याने बरेच रेकॉर्ड प्रस्थापित केले आणि बरेच मोडले देखील. त्यानंतर त्या त्या भाषेतल्या प्रस्थ असलेल्या नटांना घेऊन त्याचे बरेच रिमेक बनवले गेले. जसे की, हिंदी – दृश्यम् – अजय देवगन, तेलुगू – दृश्यम् – व्यंकटेश, तमिळ – पापनासम् – कमल हासन, कन्नडा – दृश्या – वी. रविचंद्रन्. इतकंच नाही, तर सिंहला भाषेत (श्रीलंकन) सुद्धा हा सिनेमा ‘धर्मयुद्धया’ नावाने बनवला गेला. तसेच हा पहिला भारतीय सिनेमा होता ज्याचा रिमेक चायनीज भाषेतही ‘Sheep without a Shepherd’ या नावाने बनवला गेला.

बाकीच्या भाषांचं माहीत नाही परंतु हिंदीमधला अजय देवगनचा दृश्यम् भरपूर लोकांनी एकदा तरी पाहिलाच असेल. सिनेमाच्या शेवटी जे रहस्य उलगडलेलं आहे, तिथून पुढची ही गोष्ट आहे. जॉर्ज कुट्टी (मोहनलाल) हा वरुण प्रभाकर या खून झालेल्या तरुणाचा मृतदेह बांधकाम चालू असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये पुरतो, पण हे सगळं करत असताना एका माणसाने त्याला बघितलेलं असतं.

इकडे ६ वर्षानंतर जॉर्ज कुट्टी, त्याची बायको राणी (मीना) आणि दोन्हीही मुली अंजू आणि अनु (अन्सीबा हासन आणि एस्थर अनिल) एक सधन घर जगेल, सामान्य आयुष्य जगत आहेत. मुली मोठ्या झालेल्या असून जॉर्ज कुट्टी केबलच्या व्यवसायासोबत सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. राणी आणि अंजू जुन्या गोष्टींमधून अजूनही बाहेर आलेल्या नाहीत. एक ना एक दिवस पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी त्या दोघींनाही भिती आहे. मोठ्या मुलीच्या – अंजूच्या लग्नाकडे जॉर्जनं लक्ष द्यावं, अशी राणीची इच्छा असते. त्या निमित्ताने का होईना, अंजू कदाचित भूतकाळ विसरेल, असं तिला वाटत असतं. शेजारचे लोक आपल्या नवऱ्याच्या आणि मुलीच्या बाबतीत जी चर्चा करतात, त्या गोष्टींमुळे ती दु:खी असते. आई म्हणून मुलीची काळजी असल्यामुळे ती अंजूसाठी एखादं चांगलं स्थळ शोधण्याची धडपड करत असते.

इकडे आयपीएस थॉमस बॅस्टीनने (मुरली गोपी) ‘वरुण मिसिंग केस’चा पुन्हा तपास सुरु केलेला आहे. या केसमुळे पोलिसांची जी नाचक्की झाली, ती पुसून टाकायचा त्याचा निर्धार असतो. कुठल्याही पुराव्याशिवाय जॉर्ज कुट्टीच्या कुटुंबाला विचारपूसच काय पण संपर्कही करू नये, असे कोर्टाचे आदेश असल्यामुळे तो पुरावे शोधायचा आटापिटा करत राहतो. दुसऱ्या बाजूला आय. जी. पदाचा राजीनामा दिलेली गीता (आशा सरत) आणि प्रभाकर (सिद्दीक) हे दाम्पत्य दरवर्षी मुलाचं श्राद्ध करत असले तरी त्याचं काय झालं याचं उत्तर त्यांना सापडलेलं नाही.

सुरुवातीला ज्याने जॉर्ज कुट्टीला मृतदेह पुरतांना पाहिलं, तो कोण आहे, आयपीएस थॉमसला वरुणचा मृतदेह सापडतो का, गीता आणि प्रभाकर आपल्या मुलाविषयी माहिती मिळवण्यात यशस्वी होतात की त्यांच्या पदरी निराशा येते, ज्याने जॉर्ज कुट्टीला पाहिलं होतं, तो इसम जॉर्जला ब्लॅकमेल करेल का, जॉर्ज कुट्टी पकडला जाईल की पुन्हा एकदा सहीसलामत सुटेल, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर सिनेमा पहायला हवा.

पहिला दृश्यम् जिथे संपला तिथे गोष्ट संपली, असं प्रत्येकाला वाटलं असेल किंवा पुढे गोष्ट लिहायची म्हटली तरी त्यात विशेष काय असणार, असं वाटणं सहाजिक आहे. जितू जोसेफनं कोणाला कल्पनाही करता येणार नाही, अशी पटकथा लिहिली आहे. असे कितीतरी प्रसंग आहेत, जे बघताना “अरे असं होईल हे वाटलंच नव्हतं” असं वाटत राहतं. कलाकार मंडळी तीच असल्यामुळे आपण खरंच पुढचा भाग बघत आहोत, असं वाटतं. एक सिक्वल बनवावा, तर तो कसा बनवावा, यासाठी एक मैलाचा दगड जितू जोसेफने रोवलाय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मोहनलालने साकारलेला जॉर्ज कुट्टी त्यानं अक्षरश: जगलाय! सिनेमातल्या सगळ्यांच्या भूमिका एकीकडे आणि जॉर्ज कुट्टी एकीकडे, त्यामुळे हा वन मॅन शो म्हणायला हवा.

सहकलाकारांच्या बाबतीत मीना आणि आशा सरत (राणी आणि माजी पोलिस अधिकारी) यांचा मोहनलालसोबतचा वावर म्हणजे तोडीस तोड! विशेष करून आशा सरत. तिचा तो खलनायकी स्वभाव, जॉर्ज कुट्टीवर असलेला राग, त्याला त्रास देण्याची धडपड, हे सगळं पाहून तिचा राग आल्याशिवाय राहत नाही. हीच तिच्या अभिनयाची पावती म्हणावी लागेल. मुरली गोपीने साकारलेला आयपीएस अधिकारी हा खराखुरा पोलिस वाटेल, इतके त्याने बारकावे टिपले आहेत. सिद्दीकसारख्या तगड्या नटाला फारसा वाव नसला तरी त्याने जे आहे ते नक्कीच चांगलं केलंय.

तांत्रिकदृष्ट्या कॅमेरावर्क अतिशय सुरेख आहे. जॉर्ज कुट्टीचं घर, त्याचे शेजारी, त्याची काम करण्याची जागा, आसपास असलेला हिरवळीने युक्त असा परिसर, या सगळ्या गोष्टींसोबत कुठलाही मध्यमवर्गीय, सामान्य माणूस पटकन ‘कनेक्ट’ करू शकेल. मल्याळम सिनेमा हा त्याच्या गोष्टीच्या नेमकेपणासाठी ओळखला जातो. अवास्तव खर्च करण्यापेक्षा साध्या पद्धतीने सगळं दाखवतात ही मंडळी! वायफळ बडबड नाही, अनावश्यक गाणी नाहीत की कुठे वाह्यातपणा नाही. मध्यांतरच्या मिनिटभर आधी उलगडलेलं एक रहस्य, सिनेमा संपेपर्यंत खिळवून ठेवतं. मला वाटतं एका रहस्यकथेला यापेक्षा अधिक कशाची गरज नसावी.

का पाहावा – मोहनलालच्या ‘मास’ आणि ‘क्लास’ अभिनयासाठी. ज्यांना अभिनय काय किंवा कशाशी खातात, हे किमान कळतं आणि जे लोक तीच गोष्ट सिनेमात शोधतात, ज्यांना रहस्यकथा वाचायला किंवा बघायला आवडतात, त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे भेटवस्तू समजावी. मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि हिंदी यामधला कुठला जरी दृश्यम् पाहिला असेल, तरी हा दृश्यम्-२ समजेल.

का पाहू नये – ‘दृश्यम्’चा पहिला भाग बघितला नसेल तर! थेट दुसरा भाग बघण्याची जोखीम न घेतलेली बरी.

कुठे पाहता येईल – अमेझॉन प्राईम (Amazon Prime) वरती मूळ मल्याळम भाषेत उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *