चित्रपट – ओडियन
भाषा – मल्याळम
दिग्दर्शक – व्ही. ए. श्रीकुमार मेनन
कलाकार – मोहनलाल, मंजू वारियार, प्रकाश राज
संगीत – एम. जयचंद्रन, सॅम सी. एस.
एक हीरो, एक हिरोईन, त्याच हिरोईनवर नजर ठेवणारा व्हिलन, या धर्तीवर शेकडो सिनेमे अनेक भाषांमध्ये बनत आले आहेत, हिंदी चित्रपटसृष्टीत आजही बनत आहेत. स्वत:च्या पदार्पणातच श्रीकुमार मेनन यांनी हाच विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते अपयशी होता होता वाचले. सामान्यत: सध्या चालू असलेली गोष्ट आणि होऊन गेलेली गोष्ट (फ्लॅशबॅक) असा पॅटर्न बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. परंतु, त्याला नीट हाताळता आलं नाही तर सगळाच बट्ट्याबोळ होतो, हे निश्चित!
कलात्मक सिनेमा म्हणून आपल्याकडे एक संकल्पना आहे. काही लोक त्याची टिंगल करायच्या हेतूने त्याला ‘डोक्यावरून जाणारे सिनेमे’ म्हणून त्याला हिणवतात. मेनन यांनी ‘ओडियन’ला कलात्मक आणि व्यावसायिक अशी दोन्हीही रूपे देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
असं म्हणतात की, केरळमधल्या मालाबार हिल्स भागात ओडियन राहात असत. त्यांना तंत्रविद्या अवगत होती. त्याच्या जोरावर ते कुठलेही रूप धारण करू शकत असत, विशेषत: प्राण्यांचे! कधी बैल, कधी हरिण, तर कधी अजून काही. रात्रीच्या अंधारात त्यांचे हे काम चालत असे. हे नेमके कुठून येत आणि कुठे जात याबाबत बरेच तर्कवितर्क आहेत. आपल्या देशात वीज येण्यापूर्वी यांची संख्या जास्त होती असं म्हणतात. पुढे मग विजेचा वापर सुरु झाल्यानंतर मात्र यांची संख्या कमी होत गेली.

सिनेमाची गोष्ट ही ओडियन मणिक्यन (मोहनलाल) भोवती फिरते. ओडियन म्हणजे कशाचंही रूप धारण करू शकणारा, अशी मान्यता आहे. मणिक्यन हा वाराणसीमध्ये साधू बनून राहत आहे. साधू असल्यामुळे अर्थातच त्याचे भले मोठे केस आणि दाढी आहे. त्यामुळे तो नेमका कसा दिसतो हे कोणाला समजत नाही. एके दिवशी मणिक्यन एका महिलेला नदीत बुडण्यापासून वाचवतो आणि ती त्याला तू ओडियन आहेस म्हणून ओळखते. मणिक्यनला आपली ओळख दाखवायची नसते. तो त्या महिलेला काहीच म्हणू शकत नाही.

मणिक्यन हा त्याच्या आजोबांसोबत (मनोज जोशी) वाढलेला मुलगा. आपल्याला येत असलेली विद्या नातवाला देऊन आजोबा देवाघरी जातात आणि मणिक्यन एका घरी नोकर बनून आणि रात्री जादूटोणा करून आपला चरितार्थ चालवायला सुरुवात करतो. त्याची असलेली मालकीण प्रभा (मंजू वारियार) आणि तिच्यावर लहानपणापासून वाईट नजर ठेवून असलेला रावुनी नायर (प्रकाश राज) याचा प्रभा आणि मणिक्यन या दोघांवरही राग असतो. प्रभाने त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे आणि दरवेळी मणिक्यन तिचं संरक्षण करत असल्यामुळे त्याच्या मनात बदल्याची भावना घर करून राहते. पुढे प्रभा प्रकाश नावाच्या माणसाशी लग्न करून तिच्या घरी जाते. मणिक्यन तिथेही नोकर म्हणून राहात असतो.

संधी साधून एक दिवस रावुनी नायर प्रकाश आणि प्रभाच्या लहान बहिणीच्या नवऱ्याचा दोघांचाही खून करतो. खून करण्याची पद्धत आणि इतर गोष्टी यावरून या सगळ्यामागे मणिक्यन आहे, या निष्कर्षाला गावकरी येऊन ते त्याला गावातून हाकलून देतात. इतर कुठलाही पर्याय नसल्याने मणिक्यन वाराणसीला निघून जातो.
गोष्ट पुन्हा वर्तमानात येऊन मणिक्यनला ओळखणारी महिला ही रावुनी नायरची बायको आहे हे उघड होतं. तिला आपल्या नवऱ्याच्या कृत्याविषयी घृणा वाटून ती त्याला सोडून वाराणसीला निघून येते, मात्र ते सगळं ती प्रभालाही सांगून निघून आलेली असते त्यामुळे आपण उगाच मणिक्यनवर आरोप केले, याचा प्रभाला पश्चात्ताप होतो. मणिक्यन गावात परत येऊन स्वत:ला कसा निरपराध सिद्ध करतो आणि रावुनीला धडा शिकवतो, अशी एक साधारण गोष्ट आहे.

गोष्टीत जास्त असं काही नाविन्य नसल्यामुळे शेवट काय असेल याविषयी मध्यांतरापर्यंत कल्पना येते. मोहनलाल आणि प्रकाश राज यांनी आपल्या आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे. काही वेळ वर्तमान, तर काही वेळ भूतकाळ अशी मिसळ केल्यामुळे त्याचा सिनेमाला फटका बसल्यासारखं वाटतं. या दोघांसोबत मंजू वारियारचे देखील कौतुक व्हायला पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या एखाद्या गावातील दृश्ये चांगल्या रीतीने टिपल्या गेलेली आहेत. घरे, रस्ते, शाळा, छोटेखानी हॉटेल, तिथे असलेला चहाचा कट्टा या सगळ्या गोष्टी एका खेडेगावाची सफर घडवून आणतात. सिनेमातली काही दृश्ये अनावश्यक वाटतात किंवा लांबी वाढवण्यासाठी ती टाकल्या गेली आहेत, असे म्हणायला हरकत नाही. मिशी काढलेला मोहनलाल त्याच्या या लुकमध्ये चांगला दिसतो. अंतिमत:, ओडियन हे जवळजवळ बुडत असलेले जहाज आहे, त्याला मोहनलाल आणि प्रकाश राज यांनी तारून न्यायचा चांगला प्रयत्न केला आहे.
का पाहावा – मोहनलाल आणि प्रकाश राज यांच्या अभिनयासाठी.
का पाहू नये – गोष्ट सारखी पुढे मागे जात असल्यामुळे लिंक बऱ्याच वेळा तुटते, जे बऱ्याच लोकांना आवडणार नाही.
कुठे पाहता येईल – युट्यूब (youtube) वरती मूळ मल्याळम आणि हिंदी दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध.