चित्रपट – इरुवर
भाषा – तमिळ
दिग्दर्शक – मणी रत्नम्
कलाकार – प्रकाश राज, मोहनलाल, नासर, ऐश्वर्या रॉय, गौतमी, तब्बू, रेवती
संगीत – ए. आर. रहमान

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर सिनेमा येणे ही आजकाल नवीन गोष्ट राहिलेली नाही. कधी कधी त्या त्या व्यक्तींची परवानगी घेऊन सिनेमा बनवला जातो, तर काही वेळेस त्यात बदल करुन मग तो सिनेमा सत्य घटनांपासून प्रेरित (आधारित) आहे, असं सांगून तो बनवावा लागतो. अशा प्रकारचे अनेक सिनेमे आजवर येऊन गेले. काही अतिशय लोकप्रिय झाले, तर काही वादाच्या भोवऱ्यात अडकले, काहींना लोकांनी डोक्यावर घेतले तर काहींना सपशेल नाकारले.

२ जून हा दिग्दर्शक मणी रत्नम् यांचा वाढदिवस. त्याच दिवशी एक लेख वाचत असताना मणी रत्नम् यांनी बनवलेल्या पाच सर्वोत्कृष्ट सिनेमांची यादी होती. त्यात एक नाव दिसलं – इरुवर! तमिळ सिनेसृष्टीत या सिनेमाची “कल्ट क्लासिक” म्हणून ख्याती आहे. मी ठरवलं की, हा सिनेमा बघायचाच. एकेक फ्रेम म्हणजे आमच्यासारख्या सिनेमावेड्या लोकांसाठी पर्वणीच! खरं तर या सिनेमाविषयी इतकं काय काय लिहिण्यासारखं आहे, की ही पोस्ट कदाचित लांबू शकते.

गोष्ट १९४० च्या दशकापासून सुरु झालेली दाखवली आहे. आनंदन् (मोहनलाल) सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून धडपड करत असतो. एके दिवशी एका नातेवाईकाच्या मदतीने तो एका ऑडिशनसाठी तो प्रवेश मिळवतो. सराव करत असताना आनंदन् तलवारबाजी आणि इतर शस्त्र चालवायलाही शिकतो. सराव करत असताना त्याची तमिळसेल्वनशी (प्रकाश राज) भेट होते. तमिळसेल्वन हा एक फारसा प्रसिद्ध नसलेला एक लेखक आणि कवी आहे. सेटवरती भेटल्यानंतर दोघांचाही संवाद होऊन दोघांनाही एकमेकांप्रती आदर तयार होतो. ऑडिशनमध्ये सादर करण्यासाठी सेल्वनने आपल्यासाठी संवाद लिहावे, अशी आनंदन् त्याला विनंती करतो. स्वत:चा अभिनय आणि सेल्वनच्या लिहिलेल्या संवादाच्या जोरावर त्याला सिनेमात प्रमुख भूमिका मिळते.

तमिळसेल्वन हा साहित्याच्या क्षेत्राप्रमाणेच राजकारणातही सक्रिय असतो. आनंदन् आणि तमिळसेल्वन यांची मैत्री वाढत जाऊन ते एकमेकांचे जिवलग मित्र बनतात आणि एके दिवशी तमिळसेल्वन आनंदनला आपल्या पक्षाचे प्रमुख अय्या वेलुतंबी (नासर) यांच्यासोबत ओळख करून देतो. हळूहळू आनंदनला सेल्वनच्या पक्षाचे विचार पटू लागतात आणि तोही सेल्वनप्रमाणे त्याच पक्षात प्रवेश करतो. यथावकाश आनंदन् हा पुष्पवल्लीसोबत (ऐश्वर्या रॉय) विवाह करतो, तर तमिळसेल्वन त्याच्या गावातल्या मुलीशी (रेवती) विवाह करतो. सपत्नीक मद्रासला आल्यानंतर, ज्या सिनेमात आनंदनला प्रमुख भूमिका मिळाली होती तो सिनेमा डब्बाबंद होऊन त्याच्यासमोर आर्थिक अडचण उभी राहते. आपल्यामुळे पुष्पाला त्रास नको म्हणून तो तिला गावी परत पाठवतो आणि मिळेल त्या भूमिका (छोट्या असल्या तरी) करायला सुरुवात करतो. इकडे पुष्पाचा मात्र आजारपणामुळे मृत्यू होतो आणि आनंदन् आयुष्यात काहीही न उरल्याप्रमाणे वाटचाल करत राहतो.

काही दिवसानंतर आनंदनचा मित्र नम्बी त्याला एका दिग्दर्शकाकडे घेऊन जातो. (हे तेच दिग्दर्शक असतात ज्यांनी आनंदनला काम दिलेलं असतं पण सिनेमा बंद पडलेला असतो) डायरेक्टर जुनाच परंतु सिनेमा नवीन, तेही मुख्य भूमिका, यासाठी आनंदन् तयार होतो आणि शूटिंग सुरु होतं. सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळून आनंदन् एक स्टार म्हणून नावारुपाला येतो. या सगळ्यात तो रमणीसोबत (गौतमी) लग्न करून पुन्हा नवीन सुरुवात करतो. अय्या वेलुतंबी आनंदनला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिल्यावर इथूनच दोघांच्या मैत्रीमध्ये दरार पडते. कारण तमिळसेल्वनच्या मते आनंदन् केवळ एक फिल्मस्टार आहे ज्याची राजकारणात फारशी गरज नाही, तो तेवढा त्याप्रती समर्पित नाही, असं त्याला वाटत असतं.

निवडणुकीआधी एका सेटवर आनंदनला अपघात होतो. तसं असतानाही आनंदन् आणि तमिळसेल्वन आपापल्या मतदारसंघातून निवडून येतात, तसेच त्यांच्या पक्षाला एकहाती सत्ता मिळते. अय्या वेलुतंबीने मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिल्यामुळे तमिळसेल्वन तमिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो. सत्तेची खुर्ची मिळाल्यावर देखील आनंदन् हा आपल्या खुर्चीसाठी धोका आहे, अशी भीती तमिळसेल्वनला वाटत राहते. आपणही निवडणूक जिंकलेलो असल्यामुळे आपल्याला किमान आरोग्यमंत्री करावे, अशी आनंदन् मागणी करतो. परंतु, सिनेमा सोडशील तरच तुला पद मिळेल, अशी अट तमिळसेल्वन घालतो. आनंदन् सेल्वनला मित्र समजत असला तरीही या सगळ्यामुळे त्याला सेल्वनच्या हेतूविषयी शंका यायला लागते.

इकडे अय्या वेलुतंबी यांचे निधन झाल्यामुळे (आनंदनच्या पाठींब्याने) तमिळसेल्वन पक्षप्रमुख बनतो. दुसरीकडे एका सिनेमाच्या ऑडिशनसाठी आलेल्या कल्पनाला (ऐश्वर्या रॉय) बघून आनंदन् आश्चर्यचकित होतो कारण ती हुबेहूब त्याच्या पहिल्या पत्नीसारखी दिसत असते. तिच्या आठवणींनी परत दु:खी झाल्यामुळे आनंदन् अस्वस्थ होतो. कल्पनाने विचारले असता आनंदन् तिला सगळी हकीकत सांगतो. पक्षाच्या होणाऱ्या वार्षिक समारोहात आनंदन् पक्षांतर्गत भ्रष्टाचार असल्याचा गौप्यस्फोट करतो आणि त्याची पक्षातून हकालपट्टी होते.

आपल्या लोकप्रियतेचा उपयोग करत आनंदन् स्वत:चा नवीन पक्ष स्थापन करतो आणि तमिळसेल्वनच्या विरोधात निवडणुकीला उभा राहतो. त्यात यश मिळून आनंदन् नवा मुख्यमंत्री होतो. एकेकाळचे मित्र आता एकमेकांचे विरोधक बनल्यामुळे तमिळसेल्वन आनंदनचे सरकार पाडण्यासाठी बरेच प्रयत्न करुन पाहतो, पण सगळे प्रयत्न व्यर्थ जातात. त्यापैकीच एका घटनेमध्ये दंगल भडकावण्याचा आरोप सेल्वनवर ठेवला जाऊन त्याला तुरुंगवास होतो. आपला स्वत:चा पक्ष काढल्यानंतर आनंदनने कल्पनाला त्याच्या पक्षात काम करण्याची संधी दिलेली असते. तिचाही एका अपघातात मृत्यू होतो आणि आनंदन् त्याच्या जीवनातली सगळी उमेद घालवून बसतो. इकडे तुरुंगातून सुटल्यावर सेल्वनच्याही कारवाया थंडावतात. कारण दोघांचंही आता वय होत असल्यामुळे ती राजकारणामधली आक्रमकता कमी होत जाते. अय्या वेलुतंबी हे दोघांच्याही जवळचे असल्यामुळे त्यांच्या नातीच्या लग्नात दोघंही हजेरी लावतात आणि ते तरुणपणीच्या आणि मैत्रीच्या आठवणीत रमलेले असताना आपण कधीकाळी चांगले मित्र होतो आणि आता हे कुठे आलो, या विचाराने तमिळसेल्वन व्यथित होतो.

दुसऱ्याच दिवशी आनंदनचा झोपेत मृत्यू होतो. लोकप्रिय लोकांच्या बाबतीत अशा अफवा उठतच असतात, या धर्तीवर सेल्वनला ते खरं वाटत नाही. परंतु, आतल्या लोकांकडे विचारणा केल्यावर त्याला खात्री पटते. त्याच्या अंत्ययात्रेला जाण्यापासून तो स्वत:ला थांबवू शकत नाही. पण बाहेर चाललेल्या राजकारणामुळे लोक आता आपल्याला आनंदनचा शत्रू समजतील, ही खंत त्याला असते. शिवाय आधीच गर्दी असलेल्या ठिकाणी सेल्वन येणे म्हणजे त्याचे पडसाद राज्यभर उमटू शकतात, अशी भीती पोलिसांना असते. आपल्या जाण्याने काही अघटित घडू नये, यासाठी सेल्वन दोघांच्याही मैत्रीच्या चांगल्या आठवणी मनात घेऊन, नाईलाजाने तिथून निघून जातो.

तमिळनाडूमध्ये अण्णादुरई, एम. जी. रामचंद्रन अर्थात एम. जी. आर. आणि एम. करुणानिधी या तिघांचं आपापलं प्रस्थ होतं. अण्णादुरई हे एकेकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. सिनेमातलं अय्या वेलुतंबी हे पात्र त्यांच्यापासून प्रेरित आहे. आनंदन् हे पात्र एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून प्रेरित आहे. श्री. रामचंद्रन हे तमिळ सिनेमातले सुपरस्टार आणि “कल्चरल आयकॉन”. तमिळनाडूमधला क्रांतिकारी नेता, अशी त्यांची ओळख आजही आहे. तेदेखील सिनेमात काम केल्यानंतर राजकारणात येऊन दोन वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. तिसरे म्हणजेच एम. करुणानिधी हे उत्तम लेखक आणि कवी होते. कित्येक तमिळ सिनेमांसाठी त्यांनी कथा आणि गाणी लिहिली. साहित्य क्षेत्रानंतर त्यांनी राजकारणातदेखील छाप पाडली. या दोघांप्रमाणेच तेही पुढे मुख्यमंत्री झाले. तमिळसेल्वन आणि एम. करुणानिधी यांच्यामध्ये थोडी फार साम्यता वाटते.

सिनेमा आणि ही मंडळी यांच्यात आणखी एक साम्य म्हणजे एम. जी. आर. आणि करुणानिधी हे आधी एकाच पक्षात होते. शिवाय त्यांच्यात मैत्रीचे संबंधही होते. पुढे काही मतभेद झाल्यानंतर एम. जी. आर. बाहेर पडले आणि त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. हाच धागा सिनेमातदेखील बघायला मिळतो. सिनेमातली कल्पना, जिला आनंदन् आपल्या पक्षात स्थान देतो, ते बरंचसं जयललिता यांच्याशी साधर्म्य असल्यासारखं वाटतं. कारण जयललिता या एकेकाळी एम. जी. आर. यांच्या हिरोईन होत्या. काही वर्षांनी राजकारणात येऊन त्या देखील तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या.

पूर्ण सिनेमासाठी एकाच शब्द योग्य आहे, मा-स्ट-र-पी-स! मोहनलाल आणि प्रकाश राज यांच्या दोघांच्या अभिनयात वरचढ कोण हे सांगता येऊच शकत नाही. ‘जीव ओतून काम करणे’ म्हणजे काय हे बघायचे असल्यास हा सिनेमा पाहावा. या सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रकाश राज यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांची भूमिका एका कवीची असली तरी, त्यांच्यासाठी कविता लिहिणारे वैरमुथु यांच्या लेखणीची जितकी स्तुती करावी तितकी कमीच! त्यांच्या लेखणीतून साकारली गेलेली कविता, “उडल मण्णक्क, उयीर तमिळक्क” ही कविता अर्थपूर्ण आहे. तसेच शेवटचा सीन ज्यात दु:खी होऊन तमिळसेल्वन कविता करतो, त्याचाही अर्थ अतिशय भावूक आहे. अंत्ययात्रेला जाण्याची इच्छा असूनही न जाता येण्याची त्याची तगमग कवितेतून आणि अभिनयातून दिसून येते.

थोडंसं वळतो कलाकारांकडे. “इरुवर” या शब्दाचा अर्थ होतो “दोघं”. मोहनलाल आणि प्रकाश राज यांच्याशिवाय आणखी कोणाला जर घेतलं असतं, तर ती सगळ्यात मोठी चूक झाली असती. पक्षप्रमुखाच्या भूमिकेत नासर शोभून दिसतात. प्रकाश राज यांना विचारणा केली गेली तेव्हा त्यांनी या भूमिकेसाठी आपण योग्य नाही, असं सांगत असमर्थता दर्शवली होती. एका लेखामध्ये वाचल्यानुसार, सिनेमातल्या त्यांच्या पहिल्या दृश्यासाठी, जिथे त्यांची कविता म्हणत एन्ट्री होते, त्यासाठी मणी रत्नम् यांनी प्रकाश राज यांना ६ तासापर्यंत रिटेक घ्यायला लावले होते.

का पाहावा – प्रकाश राज, मोहनलाल आणि नासर यांच्या कसदार अभिनयासाठी, मणी रत्नम् यांच्या परफेक्ट दिग्दर्शनासाठी!

का पाहू नये – या सिनेमासाठी तर असं काहीच कारण नाही. उलट हा सिनेमा जर चुकवला तर एका मास्टरपीसला मुकले जाण्याची शक्यता आहे.

कुठे पाहता येईल – अमेझॉन प्राईम (Amazon Prime) वरती मूळ तमिळ भाषेत उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *