वर्ष २०१४ असेल बहुतेक. दक्षिणेकडचे सिनेमे हिंदीत डब करून टी.व्ही. वर बघायचा नाद उच्च कोटीपर्यंत पोचलेला. काहीतरी “रियल डॉन रिटर्न्स” नावाचा सिनेमा पाहिला तुमचा! मग नेटवर सर्च करुन जरा माहिती घेतली. अजून एखादी झलक पाहायला म्हणून तुमचे अजून १-२ सिनेमे पाहिले. तसं आमची फॉलोइंग तमिळ सिनेमाकडे आणि आमच्या तलईवाकडे जास्त, म्हणूनच ‘तलपति’ पाहिला. आमच्या हीरोला टक्कर देणारा अजून एक हिरो? तोही केरळमधून? मल्याळम सिनेमामधून? मग हळूहळू तुमच्याकडे फॉलोइंग वळवली. हे सगळं करत असताना तुम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारलीय, हे कळल्यावर बोलतीच बंद! ती भूमिका करणारा माणूस सामान्य असूच शकत नाही, याचा पुरावा youtube ने देऊन टाकला. जितकं लांब तुमचं नाव, त्याहून दूरवर पसरलेली तुमची कीर्ती! मोहम्मद कुट्टी अर्थात आमचे लाडके मामूटी, तुम्ही सिनेसृष्टीत ५० वर्षं पूर्ण केलीत, हे खरंच वाटत नाही.

भारतीय सिनेमा जर एखाद्या खुर्चीप्रमाणे असेल, तर त्याचे चारही पाय म्हणजे चार लोक आहेत, असं मी मानतो. यांच्यापैकी एकही नसेल तर त्याला काही अर्थ नाही, असं मी म्हणीन! एक कमल हासन, ज्यांनी अभिनयातली ‘टेकनिकलिटी’ दाखवून दिली, सिनेमा क्षेत्रात बरेच नवनवीन प्रयोग केले. दुसरे मोहनलाल, ज्यांनी एकाच माणूस किती वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स करू शकतो, हे दाखवून देऊन ‘अष्टपैलू’ ही उपमा प्रत्यक्षात उतरवली. तिसरे तलईवा, अर्थात रजनीकांत ज्यांनी ‘मास हिरो’ नावाची एक नवीन संकल्पना आणून, स्टाईल म्हणजे हिरो आणि हिरो म्हणजे स्टाईल, असं समीकरण बनवलं आणि चौथे अर्थातच तुम्ही, मामूटी! ‘एव्हरग्रीन’ हा प्रकार काय असतो, असं जर कोणी विचारलं तर कदाचित मी तुमचा फोटो त्याला दाखवीन.

तेव्हाच्या ‘तलपति’ पासून आत्ताच्या पोकिरी राजा, पेरंबू, मास्टरपीस, मदुर राजा, भास्कर द रास्कल, यात्रा, शायलॉक, वन वगैरे सिनेमे पाहून तुम्हाला चिरतरुण ही उपमा द्यावीशी वाटते. ५० वर्षं पूर्ण करणे हा निश्चितच मोठा टप्पा आहे. जवळपास तीन पिढ्यांचं मनोरंजन करु शकेल इतका! ४०० पेक्षा जास्त सिनेमे, ६ भाषा (मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी आणि इंग्रजी), ३ राष्ट्रीय पुरस्कार, ७ राज्यस्तरीय पुरस्कार, ११ चित्रपट समीक्षक पुरस्कार (केरळ राज्य) आणि याच्यावरचा मानाचा तुरा म्हणजे पद्मश्री पुरस्कार! बापरे, एवढं लिहितानाही दम लागला! पण तुम्ही मात्र इतके वर्षं काम करुनही थकलेले दिसत नाही. श्री. मामूटी, हा प्रदीर्घ प्रवास इथवर केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन! परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो आणि तुम्ही असेच उत्तमोत्तम सिनेमे करुन आमच्यासारख्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत राहो, हेच त्या देणाऱ्याकडे मागणं, हीच सदिच्छा आणि याच माझ्यासारख्या चाह्त्याकडून तुम्हाला शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *