चित्रपट – युवारत्ना
भाषा – कन्नडा
दिग्दर्शक – संतोष आनंदराम
कलाकार – पुनीत राजकुमार, प्रकाश राज, सायेशा, साई कुमार, अविनाश, अच्युत कुमार
संगीत – एस. थमन

याआधी एक पोस्ट लिहितांनाच म्हटलो होतो, कुठल्याही भाषेमध्ये कॉलेज लाईफ वर आधारित ढीगभर सिनेमे सापडतील. कॉलेज ही अशी एक जागा आहे, जी सगळ्यांच्याच मनात एक विशेष स्थान ठेवून असते. तिथल्या कडू-गोड आठवणी, मजामस्ती आणि अजून बरंच काही, ती काही वर्षे कदाचित प्रत्येकाचीच फार स्पेशल असतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु, कॉलेज फक्त मजा करण्यासाठीच नसून तिथे अभ्यासाबरोबर आपण जीवनमूल्येही नकळत शिकतो. ही मूल्ये म्हणजे कुठला अभ्यासक्रम नसतो, त्याचे कुठलेच असे राखीव गुण मिळत नाहीत. परंतु, जो ही मूल्ये पाळण्यात यशस्वी होतो, तो पुढे आयुष्यातही यशस्वी राहतो.

राष्ट्रकूट युनिवर्सिटी (आर. के. युनिवर्सिटी) ही एक सरकारी शिक्षणसंस्था आहे. त्याचे सर्वेसर्वा असलेले गरुदेव देशमुख (प्रकाश राज) हे एक आदर्शवादी शिक्षक आहेत. शिक्षकी पेशात त्यांना मान आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करुन मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. परंतु, एके दिवशी याच कॉलेजमधली राज्यात पहिली आलेली समीरा आत्महत्या करते आणि कॉलेजमध्ये अनाकलनीय घटनांचा क्रम सुरु होतो. हुशार आणि अभ्यासात रस घेणारे विद्यार्थी अचानक नशेच्या आहारी जाऊ लागतात, त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि लौकिकार्थाने कॉलेजच्या निकालावरही होतो.

खरं तर कॉलेजमध्ये नशेचे पदार्थ पुरवणारी एक टोळी सक्रिय झालेली असते. त्याच दरम्यान मंगळूरवरुन अर्जुन (पुनीत राजकुमार) नावाचा विद्यार्थी कॉलेजमध्ये दाखल होतो. कॉलेजमध्ये टुकारपणा करणाऱ्या लोकांपैकी एकाला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटतात. त्याला अर्जुनविषयी सगळं कळूनही तो काहीच करू शकत नाही, कारण कुणाला सांगशील तर तुला मारून टाकीन, अशी धमकी अर्जुनने त्याला दिलेली असते.

मुळात हे नशेचे पदार्थ पुरवणारे लोक म्हणजे एंटनी जोसेफचे लोक असतात. जोसेफ हा खाजगी कॉलेजचे जाळे पसरवलेला व्यक्ती आहे ज्याला हे सरकारी कॉलेज बंद पाडायचे आहे, जेणे करुन जास्तीत जास्त लोक खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्याला त्याचा आर्थिक फायदा करून घेता येईल. यात त्याच्यासोबत आर. के. युनिवर्सिटीचे उपप्राचार्य जयपाल (अविनाश) आणि राज्याचे शिक्षणमंत्री राघव रेड्डी (साई कुमार) हेही सामील असतात. या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले गुरुदेव देशमुख हे त्यांच्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणायचा प्रयत्न करतात, पण त्यात त्यांना यश येत नाही. सगळ्या गोष्टी निस्तरत असतानाच फायनल ईयरमधल्या अर्जुनने कॉलेजमध्ये घातलेल्या गोंधळाची बातमी देशमुखांकडे जाते. त्याच्या फॉर्मवर असलेल्या फोटोवरून तो अर्जुन नसून युवराज आहे, असा देशमुख सर खुलासा करतात. काही वर्षापूर्वी त्यांनीच त्याला त्याच्या रागीट स्वभावामुळे आणि त्याने एका प्राध्यापकावर हात उचलल्यामुळे युनिवर्सिटीमधून काढून टाकलेलं असतं.

युवराज हा गुरुदेव सरांना आदर्श मानणारा आणि तेवढाच रागीट विद्यार्थी! अभ्यासात आणि खेळातही हुशार असला तरीही त्याच्या या स्वभावामुळे देशमुख सर त्याला नेहमीच दूर ठेवतात. त्याने कॉलेजमध्ये घातलेल्या गोंधळाचा जाब विचारला असता युवराज हा एक प्राध्यापक आहे आणि तो अर्जुन बनून या युनिवार्सिटीमध्ये होणाऱ्या घटनांचा छडा लावायला आलेला आहे, याचा उलगडा होतो. कॉलेजला यायच्या आधीच हे कारस्थान जयपाल सर आणि राघव रेड्डी यांचं आहे, हे सगळं युवराज पुराव्यानिशी देशमुख सरांसमोर ठेवतो. तसेच काही वर्षांपूर्वी एक प्राध्यापकाने विद्यार्थिनीसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्याने त्यांच्यावर हात उचलला होता, असं गोविंद (अच्युत कुमार) देशमुख सरांना सांगतो.

युवराजने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे जयपालची हकालपट्टी होते. पण इथूनच रेड्डी, जोसेफ आणि जयपालच्या कारवायांना जोर येतो. काहीही करून आर. के. युनिवर्सिटीचा निकाल खराब यावा, जेणेकरून ती संस्था बंद पडेल, असा तिघांचा कट असतो. या सगळ्यांना रोखणं, ही जबाबदारी युवराज, त्याच कॉलेजमधून पास होऊन निघालेला इन्स्पेक्टर आझाद, जिल्हाधिकारी झालेला समर्थ भागवत आणि गुरुदेव सर लीलया पेलतात आणि आर. के. युनिवर्सिटी बंद होण्यापासून तिला वाचवतात.

एक टिपिकल कॉलेजपट न बनवता दिग्दर्शक संतोष आनंदराम यांनी गुरु-शिष्य नात्यावर प्रकाश टाकला आहे. प्रकाश राज आणि पुनीत राजकुमार हे दोघेही या भूमिकेत परफेक्ट वाटतात. पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते असलेले प्रकाश राज यांनी आपण त्या पुरस्काराचे मानकरी का आहोत, हे आपल्या तगड्या, सहज आणि सुंदर अभिनयाने दाखवून दिलं आहे. सायेशाच्या भूमिकेला तसा जास्त वाव नाही. केवळ हिरोची हिरोईन पाहिजे म्हणून तिचा वावर दिसतो. अच्युत कुमारच्या लायब्रेरियन गोविंद या भूमिकेचेही कौतुक व्हायला हवे. साई कुमार यांनी अनेक तेलुगू सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेता किंवा चरित्र अभिनेता म्हणून भूमिका केल्या आहेत. कन्नडा सिनेमामध्ये त्यांना खलनायक म्हणून बघणे, हे ‘चेंज’ म्हणून चांगलं आहे.

संगीताच्या बाबतीत बोलायचं झालं, तर विजय प्रकाशच्या आवाजातलं “पाठशाला” हे गाणं शांत, संथ आणि तितकंच अर्थपूर्ण आहे!

कुठलेही शिक्षण हे जर फक्त पदवीसाठी दिले जात असेल तर ते शिक्षण नसून व्यापार आहे. पण तेच जर का ज्ञानासाठी शिकवले जात असेल, तर ती सेवा आहे. काहीही झालं तरी शिक्षण हा व्यवसाय नाही, ती सेवा आहे. कितीही पदव्या घेतल्या पण अंगी जीवनमूल्ये नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही. आपण राहात असलेल्या समाजासाठी जर आपण काही करू शकलो तरच त्या शिक्षणाचा उपयोग आहे, असा एकंदर संदेश सिनेमातून देण्यात आला आहे.

का पाहावा – पुनीत राजकुमार, प्रकाश राज आणि अच्युत कुमार या त्रिकुटासाठी, तसेच गुरु-शिष्याची जुगलबंदी पाहण्यासाठी.

का पाहू नये – कॉलेजमधले सिनेमे म्हणजे दोस्ती आणि प्रेमकथा असा भ्रमनिरास नको असेल तर!

कुठे पाहता येईल – अमेझॉन प्राईम (Amazon Prime) वरती कन्नडा आणि हिंदी या दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

4 Responses

    1. आपल्या प्रतिक्रिया हुरूप वाढवतात आणि असेच लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित करतात. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *