चित्रपट – अन्बे सिवम
भाषा – तमिळ
दिग्दर्शक – सुंदर सी.
कलाकार – कमल हासन, आर. माधवन, किरण राठोड, नासर
संगीत – विद्यासागर

मानवी मन, त्याच्यात चालणारे विचार, कुठलाही धर्म मानणारी कुठलीही व्यक्ती, त्याच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आस्तिक-नास्तिकच्या संकल्पना, परोपकाराच्या व्यक्तिपरत्वे बदलत जाणाऱ्या व्याख्या हे सगळं या जगाचा, किंबहुना मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण या सगळ्यासोबतच एक गोष्ट आहे, जी या सगळ्यांच्या वर आहे, ती म्हणजे माणुसकी. एक हलका फुलका प्रसंग सांगत, कुठलाही बडेजाव न करता जे काय सांगायचं ते नेमकं आणि सहज सांगणारा हा एक वेगळाच सिनेमा – अन्बे सिवम्!

भुवनेश्वरपासून चेन्नईला जाणाऱ्या विमानासाठी अनेक प्रवासी वाट बघत आहेत, ज्यात जाहिराती बनवणारा दिग्दर्शक अन्बरसू (आर. माधवन) आणि नल्लसिवम् (कमल हासन) यांचाही समावेश आहे. अन्बरसू हा विमानतळावर असलेल्या टी. व्ही. वर आपली जाहिरात दाखवणार आहेत त्याची वाट बघत आहे. अधीरता वाढत चाललेली! ती वाट बघत असतानाच त्याला चेहऱ्यावर जखमा असलेला  नल्लसिवम् दिसतो, ज्याची देहबोली थोडी संशयास्पद वाटते, शिवाय त्याला एका पायाने नीट चालता येत नाही. या संशयाच्या आधारे अन्बरसू विमानतळावर तैनात असलेल्या पोलिसांना याची माहिती देतो. नल्लसिवम् हा आपल्याच विमानातला एक प्रवासी आहे आणि आपल्यासारखीच विमानाची वाट बघतोय, याची कल्पना त्याला नसते.

तसं पाहता दोघांचंही चेन्नईला पोहोचणं आवश्यक आहे. कारण अन्बरसू लग्न करणार असल्यामुळे त्याला वेळेत पोचायची घाई, तर नल्लसिवम् नुकताच कोर्टातून एक खटला जिंकून आलं आहे ज्याद्वारे त्याला ३२ लाखांचा चेक मिळालेला आहे, तो त्याला चेन्नईमध्ये असलेल्या त्याच्या कामगार मित्रांच्या गटापर्यंत पोचवायचा आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि खराब हवामानामुळे दोघांचंही विमान रद्द होतं आणि नाईलाजाने भुवनेश्वरला थांबायची वेळ येते. दुर्दैवाने अन्बरसूचं सगळं सामान चोरी जातं ज्यात पैसे ठेवलेले असतात. खिशात एकच क्रेडीट कार्ड आहे, जे कुठलाही छोटा लॉजवाला, रिक्षावाला किंवा दुकानदार घेऊ शकत नाही. नेमका याच वेळेला नल्लसिवम् त्याच्या मदतीला धावून येतो. कुठलाही पर्याय नसल्यामुळे अन्बरसू त्याच्यासोबत राहायला तयार होतो, परंतु नल्लसिवम् आणि त्याच्या सवयींमुळे तो वैतागलेला असतो.

विमानाचा मार्ग बंद झाल्यामुळे दोघेही कोरोमंडल एक्स्प्रेसने चेन्नईला जायचं ठरवतात. याच प्रवासादरम्यान नल्लसिवम् त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो….

काही वर्षांपूर्वी सामान्य आयुष्य जगणारा नल्लसिवम् हा एक समाजसेवा करणारा, कामगारांच्या हक्कासाठी लढणारा आणि पथनाट्य करून जनजागृती करणारा एक तरुण असतो. त्याची लढाई मुख्यत: कांतासामीशी (नासर) असते. कांतासामी एक उद्योगपती असून त्याला त्याच्या कामगारांची अजिबात चिंता नसते. शिवाय कामगारांच्या पगारवाढीला त्याने केराची टोपली दाखवलेली असते. या अन्यायाला वाचा फोडायचं काम नल्लसिवम् त्याच्या अनेक पथनाट्यामधून करतो. ज्यामुळे सहाजिकच तो कांतासामीच्या नजरेत येतो आणि त्याच्यासाठी डोकेदुखी बनतो. त्याचदरम्यान त्याची भेट बालासरस्वतीसोबत (किरण राठोड) होते आणि ओळख वाढत जाऊन त्याचं रुपांतर प्रेमात होतं. सरस्वती ही कांतासामीची मुलगी आहे, याची कल्पना तेव्हा नल्लसिवमला नसते. कळल्यावर, ते आपल्याला कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत, या धर्तीवर दोघेही केरळला पळून जायचं ठरवतात. एका ठिकाणाहून नल्लसिवम् निघेल, तर दुसऱ्या थांब्यावरून सरस्वती बसमध्ये बसेल, अशी त्यांची योजना असते. परंतु मध्येच बसचा अपघात होऊन त्यात नल्लसिवम् गंभीर जखमी होतो. त्याच्या चेहऱ्यावर जखमा झालेल्या असतात, शिवाय त्याच्या चालण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.

नेमकी हीच संधी साधून कांतासामी, नल्लसिवम् आणि सरस्वती दोघांनाही एकेक थाप मारतो. नल्लसिवमला सांगितलं जातं की, सरस्वती लग्न करुन परदेशात निघून गेली आहे. इकडे सरस्वतीला सांगितलेलं असतं की, बस अपघातात नल्लसिवम् गेला. हेतू हा की, तिने पुन्हा त्याची चौकशी करु नये. दुखण्यातून सावरल्यानंतर नल्लसिवम् आपलं समाजकार्य आणि कामगारांच्या हक्काची लढाई सुरुच ठेवतो.

प्रवासादरम्यान आयुष्य वगैरे गोष्टींवर नल्लसिवम् भाष्य करतो ज्यामुळे अन्बरसूचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. दोघांमध्ये चांगली मैत्री होते आणि अन्बरसू, नल्लसिवमला चेन्नईला पोचल्यावर आपल्या लग्नात यायचं आमंत्रण देतो. लग्नात पोचताच त्याला धक्का बसतो कारण नवरी दुसरी तिसरी कुणी नसून सरस्वती असते. नल्लसिवम् या लग्नात उपस्थित आहे, याची कल्पना तिला नसते. पण हा मात्र लग्नात तमाशा करायला आला आहे, असा कांतासामीचा समाज होऊन तो नल्लसिवमला तुला काय पाहिजे म्हणून विचारतो. काम साधायची हीच संधी बघून नल्लसिवम् त्याच्याकडून काही कागदपात्रांवर सह्या घेतो, ज्यात त्याने कामगारांचा पगार वाढवण्याला सहमती दर्शवलेली असते. आपल्या मुलीचं लग्न पार पडावं आणि आपल्या “इमेज”ला तडा जाऊ नये, या गोष्टींखातर कांतासामी मुकाट्याने सही करुन मोकळा होतो. परंतु, नल्लसिवम् सोबत त्याची शत्रुत्वाची भावना कायम राहते.

निघून गेल्यानंतर, कांतासामी आपल्या एका माणसाला, नल्लसिवमला मारुन टाकून त्याच्याकडून ती कागदपत्रे घेऊन यायचा हुकूम देतो. हा माणूस जरी वाईट काम करत असला, तरी त्याला आपण हे चुकीचं करत आहोत याची जाण असते. आपण वाईट लोकांच्या संगतीत राहिलो, त्यामुळेच देवाने माझी मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली अशी त्याची समजूत असते. नल्लसिवमला मारायला त्याचं मन धजावत नाही. सुवर्णमध्य म्हणून तो नल्लसिवमला त्याच्या मालकापासून (कांतासामी) दूर राहायची विनंती करतो आणि नेहमीकरता शहर सोडून जायला सांगतो, जेणेकरुन नल्लसिवम् मेला, असं कांतासामी समजत राहील आणि खून करण्याचं पाप त्याच्या माथी येणार नाही. नल्लसिवम् या गोष्टीसाठी तयार होऊन फक्त स्मितहास्य करत निघून जातो.

आपल्या अभिनयाने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कमल हासन यांनी स्वत: या सिनेमाची कथा लिहिली होती. माधवन आणि कमल हासन आपापल्या भूमिकेत अगदी चपखल बसतात. सिनेमामध्ये जास्त कलाकार नसल्यामुळे फोकस गोष्टीवरच राहतो. गाण्यांचाही अनावश्यक भडिमार दिसून येत नाही. एक वेगळी कल्पना, वेगळी गोष्ट, वेगळ्या धाटणीचा सिनेमा म्हणून याच्याकडे बघायला हरकत नाही.

कमल हासन यांनी अभिनयक्षेत्राबरोबरच सिनेसृष्टीत अनेक प्रयोग केले. या सिनेमात त्यांनी एक कॅमेरावर्कमध्ये एक प्रयोग केला जो याआधी कधीही सिनेमात बघायला मिळाला नव्हता. ते म्हणजे सिनेमात एक दृश्य आहे, ज्यात कमल हासन डोळ्यांच्या डॉक्टरकडे डोळे तपासायला गेलेला आहे. डॉक्टर वेगवेगळे लेन्सेस घेऊन त्याचा नेमका नंबर कोणता हे बघत आहेत. बोर्डकडे बघत असताना त्याच कोनात कॅमेराचा आहे ज्यात एका लेन्समध्ये अंधुक आणि दुसरी लेन्स लावली तर स्पष्ट दिसेल, असा एक सीन आहे. आलटून पालटून अंधुक आणि स्पष्ट दिसणाऱ्या लेन्स एकाच कॅमेऱ्यामध्ये (तेही कुठला कट न घेता), हा प्रकार तेव्हा नवीन आणि अद्भुत होता.

का पाहावा – मानवी जीवन, मानवी भावना वगैरे वैचारिक सिनेमे आवडत असतील तर. शिवाय कमल हासन आणि माधवन यांना एकत्र पहायचा योग!

का पाहू नये – मसाला सिनेमे आवडत असतील तर.

कुठे पाहता येईल – नेटफ्लिक्स (Netflix) वरती तमिळ भाषेत उपलब्ध आहे. ज्यांना भाषेची अडचण आहे त्यांच्यासाठी हिंदीमध्ये डब केलेला सिनेमा युट्यूबवर उपलब्ध आहे.

4 Responses

    1. धन्यवाद प्रफुल! अशाच आपल्या प्रतिक्रिया उत्तरोत्तर कळवाव्या.

    1. धन्यवाद विकास, आपल्या अशाच प्रतिक्रिया नेहमी मिळत राहो आणि लिहिण्याची प्रेरणा देत राहो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *