कधी कधी एखादी अशी बातमी ऐकायला मिळते, जी ऐकून विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. सोशल मिडियावर उगाच स्क्रोल करता करता एखादी पोस्ट दिसावी आणि बोटं तिथेच थांबवीत, असंच काहीसं माझ्यासोबत झालं. के. के. नावाने सुप्रसिद्ध असलेले गायक आपल्यातून निघून गेले. खरं सांगू? मला तर त्यांचं वय किती, हेही माहीत नव्हतं. कायम प्रसन्न चेहरा, लाईमलाईटपासून नेहमी दूर, कधी कोणावर कसले आरोप लावले नाहीत, की कधी कसल्या वक्तव्याने वाद निर्माण केले नाहीत. गायकाचं काम आहे गाणं म्हणायचं, ही एक गोष्ट तंतोतंत पाळली.

९० च्या दशकात ‘माचीस’ मधल्या “छोड आये हम वो गलिया” पासून या आवाजाने कितीतरी लोकांना वेड लावलं. २००१ ते २०१० हे दशक तर अक्षरश: के. के. च्या नावावर होतं, असं म्हटल्यास ते चुकीचं होणार नाही. मला आठवतं, आमच्या शहरात रेडीओ मिरची नव्याने सुरु झालं होतं. त्याच्यावर के. के. ची आधीपासून माहीत असलेली गाणी ऐकली, काही नव्याने माहीत झाली. फक्त आवाज ऐकून तो कोणाचा आहे, हे ओळखण्याचा काळ होता तो! कधी “क्या मुझे प्यार है” ऐकून लोक वेगळ्याच कल्पनेत हरवले, कधी कॉलेजच्या शेवटच्या दिवशी “यारो दोस्ती बडी ही हसीन है” ऐकून एकमेकांच्या गळ्यात पडून रडले, तर कधी “तडप तडप के इस दिल से” किंवा “सच कह रहा है दिवाना” वगैरे ऐकून लोक…..असो!

२००५-०६ च्या नंतर मला वाटतं इमरान हाशमी आणि के. के. हे एक वेगळंच समीकरण तयार झालं. “जरा सी दिल में दे जगह तू”, “जो ख्वाबो खयालो में”, “दिल इबादत”….असं करत करत ही यादी वाढत गेली. केवळ इमरान हाशमी नव्हे तर इतर कितीतर हिरोंचा के. के. आवाज म्हणून लोकांना भेटला. त्याचा आवाज ही ऐकण्याची नाही, तर ईयरफोन लावून डोळे मिटून अनुभवण्याची गोष्ट आहे.

आज जरीही तो आपल्यात नसला, तरी त्याचा आवाज कायम आपल्यासोबात राहील, हे नक्की. कधीही कुणाची कॉपी न करणारा, वादविवादापासून दूर राहणारा, सेलिब्रिटी म्हणून न मिरवणारा आणि फक्त आपल्या सुरेल आवाजाने लोकांवर मोहिनी घालणारा के. के. कायम आमच्या सारख्यांच्या स्मरणात राहील, हे नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *