चित्रपट – वन
भाषा – मल्याळम
दिग्दर्शक – संतोष विश्वनाथ
कलाकार – मामूटी, मुरली गोपी, सिद्दीक, जोजू जॉर्ज, मॅथ्यू थॉमस, गायत्री अरुण, सलीम कुमार
संगीत – गोपी सुंदर

सिनेमाचा वापर हा कधी मनोरंजन म्हणून, कधी प्रबोधन म्हणून, कधी महान व्यक्तींच्या आयुष्यातील कथा, कधी गुन्हेगारी जगतातील कथा किंवा अशा अनेक प्रकारच्या कथा दाखवण्यासाठी होतो. काही सिनेमे अगदी लोकांच्या मनातल्या भावना घेऊन बनतात. सामान्य लोकांना जे वाटतं की, असं व्हावं, तेच त्यात दाखवलेलं असतं. एस. शंकर यांनी अनिल कपूरसोबत “नायक” बनवला, त्यातही अशीच काहीशी गोष्ट होती. आधी एक दिवस मुख्यमंत्री बनून आणि नंतर निवडून येऊन अनिल कपूर लोकांच्या हिताचे निर्णय कुठल्याही अर्थकारणाशिवाय आणि राजकीय दबावाशिवाय घेऊन लोकप्रिय होतो.

‘मुख्यमंत्री’ या विषयाला धरुनच ‘वन’ सिनेमाची गोष्ट आहे. सनल (मॅथ्यू थॉमस), त्याची बहीण सीना (गायत्री अरुण) आणि वडील राजप्पन् (सलीम कुमार) हे एक निम-मध्यमवर्गीय कुटुंब आहे. एके दिवशी हॉटेलमधील पार्सल पोचवण्यासाठी राजप्पनला पाठवले जाते. पोचलेल्या अपार्टमेंटमध्ये वीज नसल्यामुळे आणि घर बरेच वरच्या मजल्यावर असल्यामुळे पायऱ्या चढायची वेळ येते. तब्येतीच्या कारणामुळे राजप्पनला वर चढून जाण्यात अडचण वाटते. परंतु, अडून बसलेल्या ग्राहाकामुळे आणि नोकरी गमवायची नाही म्हणून त्यांना जावं लागतं. याचा परिणाम म्हणजे त्यांना घाम येऊन हृदयविकाराचा झटका येतो आणि दवाखान्यात दाखल करायची वेळ येते. सीनाला या त्या अडलेल्या ग्राहकाची चीड येते परंतु ती काहीही करु शकत नाही. भरीस भर म्हणजे ज्या दवाखान्यात दाखल करायचं, त्याच दवाखान्यात मुख्यमंत्री (मामूटी) आलेले असल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव सनल आणि त्याच्या बहिणीला बऱ्याच अडचणी येतात.

कसंतरी करुन आपल्या वडिलांना इलाज मिळाला, परंतु सरकारी यंत्रणा आणि त्यांचे प्रोटोकॉल आपल्या गैरसोयीला जबाबदार आहेत, ही चीड सनलच्या मनात असते. ती व्यक्त करण्यासाठी तो सोशल मिडियाचा आधार घेऊन सगळ्या प्रसंगाविषयी पोस्ट करतो. ही पोस्ट मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षाला आपसूकच एक मुद्दा मिळतो. जरी सनलचा राजकारणाशी संबंध नसतो, तरीही मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्ष या पोस्टचा वापर करायचं ठरवतो. आपल्या मुलाने मुख्यमंत्र्यांविषयी असं काही पोस्ट केलंय हे राजप्पनला समजल्यावर आपल्या मुलाच्या काळजीपोटी ते सनलला शहर सोडून जायला सांगतात, जेणेकरुन मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते किंवा पक्षाचे सदस्य त्याला शोधून त्रास देऊ नये.

नेमकं शहर सोडायला बसमध्ये बसतानाच पोलीस सनलला घेऊन जाऊन मुख्यमंत्र्यांपुढे हजर करतात. आपल्याला आता ‘परिणाम’ भोगावे लागतील असं सनलला वाटत असतानाच त्याचा गैरसमज दूर होतो. मुख्यमंत्री रीतसर विचारपूस करुन त्याच्या अडचणी जाणून घेतात. शिवाय, आपल्यामुळे सनलच्या कुटुंबाला झालेल्या त्रासाविषयी जाहीर माफीही मागतात. यातूनच मुख्यमंत्री हे केवळ राजकारणी नसून एक चांगले व्यक्ती आहेत, याची कल्पना सनलला येते.

या घटनेतूनच मुख्यमंत्री आणि सनल यांच्यात मैत्री होते. सनलच्या बहिणीला खोट्या आरोपात पोलिसांनी पकडल्यानंतर मुख्यमंत्री स्वत: तिथे जाऊन तिला सोडवतात आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देतात. मुख्यमंत्री हे “राईट टू रिकॉल” या विधेयकासाठी प्रयत्नशील असतात. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास जनतेला लोकप्रतिनिधीचे काम न पटल्यास त्याला खुर्चीवरुन खाली खेचायचा अधिकार मिळणार असतो. अर्थातच बाकीचे राजकारणी याच्या विरोधात असतात. या विधेयाकाविषयी राज्यातल्या लोकांचं काय मत आहे, जाणून घेण्यासाठी सनल आणि त्याच्यासारख्या अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एक सर्वेक्षण करायला सांगतात.

सर्वेक्षण करुनही आणि लोक आग्रही असले तरीही सभागृहात विधेयकाच्या विरोधात मतदान झाल्यामुळे त्याला काही अर्थ उरत नाही. वास्तविक, नेत्यांनी निवडून आल्यानंतर या कायद्याच्या भीतीने का होईना पण चांगली कामे करावी ज्यामुळे जनता त्यांना खाली खेचणार नाही, ते आपली जागा पक्की करण्यासाठी अजून चांगली कामे करतील, असा मुख्यमंत्र्यांचा हेतू असतो. पण भ्रष्ट नेत्यांना हा त्यांच्या भ्रष्टाचारात सगळ्यात मोठा अडथळा असल्याने ते कडाडून याचा विरोध करतात.

अखेरीस या विधेयकामागचा हेतू समजावून मुख्यमंत्री सभात्याग करत आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर करतात. काही वर्षानंतर, जेव्हा राजप्पनचा नातू (सनलचा मुलगा) त्यांना “राईट टू रिकॉल” म्हणजे काय हे विचारतो, तेव्हा ते मुख्यमंत्र्यांविषयी सगळी गोष्ट नाव न घेता सांगतात. त्यावर नातू ते कोण होते हे विचारतो. त्यांच्या उत्तरातून तेव्हा आणि आता असलेले मुख्यमंत्री एकच आहेत आणि त्या दिवशी त्यांनी सभात्याग केल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले होते, याचा उलगडा होतो.

संथपणे न भरकटता पुढे जाणारी गोष्ट, ही या सिनेमाची खासियत! मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत मामूटी शोभून दिसतात. सामान्य लोकांच्या आयुष्यात असा नेता जो त्यांच्या अडचणी सोडवतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, मला वाटतं लोकांना अशा प्रकारचा एक नेता हवा असतो. दुर्दैवाने कधी तसं होताना दिसत नाही. हा सिनेमा म्हणजे काही वेळासाठी का होईना, लोकांच्या भावना पडद्यावर त्यांना सत्यात उतरताना बघता येतील, असा आहे. मामूटीशिवाय सलीम कुमार यांची भूमिका देखील दमदार आहे.

सिनेमातली काही दृश्ये कल्पकतेने चित्री केली आहेत. मुख्यमंत्री सीनाला सोडवायला पोलीस स्टेशनमध्ये येतात, ते एक आणि मुख्यमंत्री एका साधारण रिक्षात बसून विद्यापीठात जातात, त्यादरम्यान रिक्षावाल्याला मागे मुख्यमंत्री बसलेत, याची कल्पना नसते. त्यांचा होणारा संवाद म्हणजे एक सामान्य माणूस आणि नेता, असा दाखवला आहे. पूर्ण सिनेमात केवळ एकाच गाणे आहे. गाण्यापेक्षा गोपी सुंदर यांनी दिलेल्या पार्श्वसंगीतात दम आहे. मामूटी यांनी साकारलेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिरेखेला साजेसे आहे. थोडक्यात नेता कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे हा सिनेमा आहे. दोन-अडीच तासांपुरता का होईना, आपल्या स्वप्नातला नेता पडद्यावर पाहायला मिळतो.

का पाहावा – मामूटी, सलीम कुमार आणि जोजू जॉर्ज यांच्या अभिनयासाठी!

का पाहू नये – मारामारीवाले सिनेमे आवडत असतील तर!

कुठे पाहता येईल – नेटफ्लिक्स (Netflix) वरती मल्याळम भाषेत उपलब्ध आहे, तर ज्यांना भाषेची अडचण आहे त्यांच्यासाठी हिंदीमध्ये डब केलेला सिनेमा युट्यूबवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *