चित्रपट – तलपति
भाषा – तमिळ
दिग्दर्शक – मणी रत्नम्
कलाकार – रजनीकांत, मामूटी, शोभना, अरविंद स्वामी, अमरीश पुरी, श्रीविद्या, भानुप्रिया
संगीत – इलईराजा

आपल्या देशातल्या महाकाव्यांपैकी “महाभारत” हे एक आहे. यातलं कुठलंही पात्र घेतलं तरी त्याला विविध पैलू आहेत, छटा आहेत. प्रत्येकाला स्वत:चा असा एक दृष्टीकोन आहे. नातेसंबंध, मैत्री, कलह हेही या काव्याचे अनेक अंग आहेत. यातलं महत्वाचं अंग म्हणजे कर्ण आणि दुर्योधन यांच्यातली मैत्री. नाही नाही, महाभारत या विषयावर काहीही लिहिण्याची माझी योग्यता नाही. मणी रत्नम् यांनी या मैत्रीचा धागा पकडून “तलपति” बनवलाय, त्याविषयीची ही पोस्ट!

thalapathy-1

सिनेमा म्हणजे ९०% महाभारतातल्या प्रसंगांपासून प्रेरित आहे. एका आईने आपल्याच लहान मुलाचा केलेला त्याग, पुढे तोच मुलगा जिथे वाढला, मोठा झाला, त्याचं प्रश्न विचारणं, आपण कोण आहोत, आपल्याला कोणी आणि का असं सोडून दिलं, याविषयीचा मनात असलेला राग, पण त्याचबरोबर भेटलेला असा मित्र जो चूक असो किंवा बरोबर कायम आपल्याच बाजूने उभा राहणं, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.

thalapathy-2

सिनेमाच्या सुरुवातीलाच एक लहान मुलगी एका लहान बाळाला मालगाडीमध्ये सोडून देते आणि ते लहान मूल झोपडपट्टीतल्या लोकांना सापडतं. लोक त्याला सांभाळायचा निर्णय घेतात आणि त्याला तो पूर्ण वस्तीचाच मुलगा असल्याप्रमाणे वाढवतात. सूर्या, म्हणजे ते सापडलेलं मूल आता मोठं झालेलं आहे (रजनीकांत), ज्याला अन्यायाविषयी चीड आहे, कुठेही अन्याय झालेला त्याला सहन होत नाही. वस्तीत राहात असलेल्यापैकी कोणीही आपलं नाही मग आपण कोण आहोत, कुठून आलो, इथे कसे आलो, याची उत्तरं त्याला मिळत नसल्यामुळे त्याची घुसमट होत राहते. तुझे आई-वडील कोण, या प्रश्नाला त्याला उत्तर देता येत नाही. त्यामुळे आपली आई कोण हे माहीत नसतानाही तिच्याविषयी त्याच्या मनात राग आहे.

thalapathy-3

एक दिवस वस्तीत होत असलेल्या भांडणामधून सूर्या रामण्णाची हत्या करतो. रामण्णा हा स्थानिक गुंड देवराजचा (मामूटी) चमचा. सूर्याला याविषयी काहीही माहीत नाही. त्याच्या या करण्यामागे असलेलं खरं कारण देवराजला कळतं आणि तो सूर्याला जामीनावर तुरुंगातून बाहेर काढतो. देवराज आणि सूर्या यांचे विचार मिळतेजुळते असल्यामुळे आणि दोघांनाही समाजावर थोड्या फार प्रमाणात राग असल्यामुळे त्यांच्यात मैत्री होते. ही मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत जाते आणि दोघेही वस्तीत होत असलेल्या अन्यायाला विरोध करतात.

जरी त्यांची पद्धत ही गुन्हेगाराप्रमाणे असली तरी वस्तीत दोघांनाही मान आहे. पण गुन्हेगारी जगतात असलेल्या बाकीच्या लोकांना, विशेषकरून कालीवर्धनला (अमरीश पुरी) हे पसंत नाही. तो दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून पाहतो, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याच वेळी शहरात आलेला नवा जिल्हाधिकारी अर्जुन (अरविंद स्वामी) याच्यासमोर शहरात होणाऱ्या हिंसाचाराला रोखायचं आव्हान आहे. तोही दोघांना समज देऊन पाहतो, कारण कितीही झालं तरी सूर्या आणि देवराज कायद्याच्या नजरेत गुन्हेगार असतात.

thalapathy-4

अर्जुनची डॉक्टर असलेली आई वस्तीत एक वैद्यकीय शिबीर भरवते, ज्यात तिला एका लहान मुलीजवळ पिवळी शाल सापडते. याच ठिकाणी सिनेमाच्या सुरुवातीला लहान बाळाला गाडीत सोडणारी मुलगी म्हणजे अर्जुनची आई आहे, म्हणजेच सूर्या आणि अर्जुन हे एकमेकांचे भाऊ आहेत, याचा उलगडा होतो. परंतु, दोघांनाही हे माहीत नाही. बरेच प्रयत्न करत कल्याणी (अर्जुनची आई) सूर्याला भेटून त्याला सगळी हकीकत सांगते. आपल्या जन्माविषयी कळल्यावर आणि आपल्या रस्त्यात अडथळा असलेला जिल्हाधिकारी आपलाच भाऊ आहे, हे कळल्यानंतर सूर्या ‘आपण अर्जुनला काहीही होऊ देणार नाही’ असं वचन आईला देतो.

या भेटीनंतर मात्र सूर्याच्या वागण्यात झालेला बदल देवराज हेरतो आणि त्याला त्याचं कारण विचारतो. सूर्याने त्याला सगळं सांगितल्यानंतर लहानपणापासून अनाथ असल्यासारखं राहिलेल्या आपल्या मित्राला त्याचं कुटुंब परत मिळालं, या गोष्टीने देवराज सुखावतो आणि आत्मसमर्पण करून गुन्हेगारी सोडायचं ठरवतो. परंतु, जुन्या वादातून कालीवर्धन हे सगळं व्हायच्या आधीच देवराजची हत्या करतो आणि याचा सूड म्हणून सूर्याकडून कालीवर्धनची हत्या होते. कुठलाही सबळ पुरावा नसल्यामुळे सूर्या सगळ्या प्रकारातून सहीसलामत सुटतो आणि सरतेशेवटी अर्जुनला देखील सगळ्या गोष्टी कळतात. आपली बदली झाल्यानंतर अर्जुन शहर सोडून जायला निघतो आणि कल्याणी सूर्यासोबत राहण्याचा निर्णय घेते.

thalapathy-5

सिनेमाची सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे रजनीकांत आणि मामूटी यांची जोडी. रजनीकांत हे आपल्या स्टाईलसाठी ओळखले जातात, परंतु या सिनेमात त्यांच्या भूमिकेला एक भावनिक पैलू आहे. दु:खी होणारा, डोळ्यात अश्रू येणारा रजनीकांत सहसा बघायला मिळत नाही. मामूटी म्हणजे मल्याळम सिनेमातला मेगास्टार! आपण मेगास्टार का आहोत, हे त्यांनी आपल्या अभिनयाने दाखवून दिलं आहे. सहकलाकारांची साथ अतिशय उत्तम! इलईराजा यांच्या पार्श्वसंगीतात जान आहे! दाक्षिणात्य सिनेमे म्हणजे निव्वळ मारामारी आणि स्टंट, असं मानणाऱ्या वर्गाच्या मानसिकतेला छेद देणारा म्हणून नक्कीच या सिनेमाकडे बघता येईल. मणी रत्नम् यांनी निवडलेला एकेक कलाकार त्याच्या त्याच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट वाटतो.

का पाहावा – रजनीकांत आणि मामूटी यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीसाठी!

का पाहू नये – गंभीर विषय आवडत नसतील तर!