चित्रपट – विक्रम वेदा
भाषा – तमिळ
दिग्दर्शक – पुष्कर-गायत्री
कलाकार – आर. माधवन, विजय सेतुपती, श्रद्धा श्रीनाथ, कतीर, वरलक्ष्मी सरतकुमार
संगीत – सॅम सी. एस.
दशकामध्ये एखादा सिनेमा असा येतो, जो पाहिल्यानंतर तोंडातून एकाच शब्द निघतो – “व्वा!” गोष्टी सांगत जाणारा, रहस्य तयार करून अलगद ती उलगडणारा, सगळ्या गोष्टी सुरु करून सिनेमाच्या शेवटात बरोब्बर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून येऊन संपवणारा, लहानपणीच्या “वेताळ पंचविशी”च्या कथेला आधुनिक रूप देऊन ते समोर आणलं तर कसं वाटेल, अगदी तसाच – विक्रम वेदा!
कथा अशा काही पद्धतीने लिहिलेली आहे की, यातला नायक कोण आणि खलनायक कोण याचा निर्णय हा बघणाऱ्याने घ्यायचा. इन्स्पेक्टर विक्रम (आर. माधवन) एक अतिशय आक्रमक, कडक शिस्तीचा आणि कोणालाही न घाबरणारा एनकाउंटर स्पेशालिस्ट! त्याच्याच तोडीचा वेदा (विजय सेतुपती), ज्याच्यावर १६ खून केल्याचा आरोप आहे परंतु कुठल्याही पोलिसाच्या हाती तो लागलेला नाही. वेदाच्या एनकाउंटरचे आदेश विक्रमला मिळालेले आहेत, त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर दुसरं कुठलंही ध्येय नाही. एके दिवशी वेदाच्याच एनकाउंटरची तयारी करत असताना वेदा अचानक पोलिस स्टेशनमध्ये हजर होतो आणि आत्मसमर्पण करतो. वेदा जरी पोलिसांच्या हाती लागलेला असला तरी याच्या असं करण्यामागे काहीतरी कारण आहे, हे विक्रमला माहीत आहे. त्याच्या याच प्रश्नांच्या उत्तरांसाठी वेदा विक्रमला गोष्टी सांगायला सुरुवात करतो आणि शेवटी एक प्रश्न विचारून त्याच्या तावडीतून निसटून जातो.
लहानपणी ऐकलेल्या ‘विक्रम-वेताळ’ मधल्या गोष्टींची पद्धत सिनेमात प्रभावीपणे वापरली आहे. ऐकलेल्या गोष्टींपेक्षा पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवावा असं म्हणतात. पण प्रत्येकवेळी ज्या गोष्टी पाहतो त्या खऱ्या असतातच असं नाही. नेमका याच गोष्टीवर सिनेमात प्रकाश टाकलेला आहे. जशा जशा गोष्टी उलगडत जातात, तसा विक्रमचा चांगलं आणि वाईट याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. इतके गुन्हे करूनही वेदाचा शांतपणा आणि आपल्याच बायकोने वकील म्हणून वेदाची केस घेणं, ती गोष्ट न पटल्यामुळे विक्रमची होणारी घालमेल, माधवन आणि विजय सेतुपती यांनी आपापल्या भूमिका अतिशय जीव ओतून केल्या आहेत, असंच म्हणावं लागेल. इतक्या की, त्या दोघांना समोर ठेवूनच पटकथा लिहिली गेली असावी असं वाटतं.
थ्री इडियट्समध्ये कॉलेजकुमार म्हणून वावरणारा माधवन हाच होता का, असा प्रश्न पडेल इतका बदल आणि मेहनत त्याने घेतलेली दिसून येते. विजय सेतुपतीच्या भूमिकेला अनेक छटा बघायला मिळतात. त्याची स्तुती करायला तर शब्द कमी पडतील. मी तर फॅन झालो रे बाबा तुझा! सहकलाकारांमध्ये विक्रमच्या बायकोची भूमिका करणारी श्रद्धा श्रीनाथ लक्षात राहते. कथा सशक्त असल्यामुळे सिनेमात पात्रांचा भडिमार बघायला मिळत नाही. ‘पुढे काय होणार’ हा प्रश्न सारखा पडत राहतो आणि बघणारा ते उत्तर शोधण्यासाठी शेवटपर्यंत खिळून राहतो. हेच पुष्कर-गायत्रीच्या दिग्दर्शनाचं यश आहे.
कथेबरोबरच संवादही तितकेच छाप पाडणारे आणि लक्षात राहण्यासारखे आहेत. संगीताच्या बाबतीत आर. माधवन आणि श्रद्धा श्रीनाथवर चित्रित आणि अनिरुद्ध रविचंदरच्या आवाजातलं “यान्जी” हे गाणं कर्णमधुर वाटतं. रॉक संगीताचा वापर करून बनवलेलं “कारपू वेल्लई” हेही गाणं कमी नाही. पार्श्वसंगीतावरही मेहनत घेतलेली दिसून येते.
का पहावा – आर. माधवन आणि विजय सेतुपती यांच्या कसदार आणि तोडीस तोड असलेल्या अभिनय जुगलबंदीसाठी!
का पाहू नये – रहस्य असल्यामुळे कथा खूप लक्ष देऊन बघावी लागते. ज्यांना सिनेमा पाहताना डोकं लावायला आवडत नाही, अशा लोकांना कदाचित हा सिनेमा आवडणार नाही.