सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी, २०१२ ते २०१३ च्या सुमारास बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आला आणि सोबतच WhatsApp चा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. या वापरासोबतच इकडून तिकडून जुन्या मित्रांचे नंबर मिळवून ग्रुप बनवण्याचा “ट्रेन्ड” उदयाला आला. त्याच्यानंतर एखाद-दोन वर्षांनंतर चित्र बदललं आणि मित्रांचा एक वेगळाच चेहरा बाहेर दिसायला लागला. मी जे लिहितोय, हा एक वैयक्तिक अनुभव आहे. मी आशा करतो की, हा अनुभव माझ्यापर्यंतच राहून इतर कुणाला येऊ नये.
एके वेळी ३० ते ४० लोकांचा असलेला ग्रुप आता किती लोकांवर आला असेल याची कल्पना नाही. सगळ्यांप्रमाणे मीसुद्धा अनेक ग्रुप जॉईन केले आणि नंतर सोडून दिले. त्याला कारणच तसं होतं. जात/ धार्मिकता/ धार्मिक रंग/ इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या चुका/ राजकीय पक्ष/ संघटना/ नेते/ मंत्री/ उद्योगपतींचे घोटाळे/ नेत्यांचे घोटाळे/ नेत्यांचे चमचे असलेले नट-नट्या/ स्वत:ला खरं सिद्ध करण्याचा अट्टाहास, हे आणि असं सगळं पाहिलं की, प्रश्न पडतो – हे सगळे तेच मित्र आहेत का ज्यांच्या डब्यातलं जेवण आपण हक्काने खाल्लंय? हे तेच मित्र आहेत का ज्यांच्यासोबत रोज खाण्याची “वाटावाटी” करायचो? हे तेच मित्र आहेत का ज्यांच्याशी खेळतांना कितीही भांडलो तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा तितक्याच तन्मयतेने खेळलो? छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असो, या मंडळींच्या आचार-विचारांवरुन आम्ही कधीच आपापसांत वाद घातला नाही. ऐतिहासिक व्यक्तिमत्वे असोत, त्यांची जयंती पुण्यतिथी यावरुन कधी लांबलचक संभाषणे चालली नाहीत. हल्ली तर लोक एकमेकांचा वाढदिवस कमी आणि जयंती/ पुण्यतिथी निमित्त अभिवादन जास्त करतात. त्याला प्रतिसाद दिला नाही, की त्रागा होतो. लगेच यावरुन जातींचे गट पडतात आणि आपापसांत भांडण सुरु होतं.
स्वत:च्या विचारांशी विचार जुळणारा कोणी असेल तर ठीक, आणि जर विचार नाही जुळले तर त्याला थेट धर्मद्रोही/ देशद्रोही ठरवून त्याला शिवीगाळ केली जाते. देश सोडून निघून जा वगैरे ‘आदेश’ दिले जातात. “ग्रुपवरती अशा काही गोष्टी करु नका” म्हटलं की, त्याला अस्मिता वगैरेचा हवाला देऊन भावनिक आवाहन केलं जातं. क्वचितप्रसंगी भांडण सोडवणाऱ्याला “तू कसला मर्द” वगैरे टोमणे देऊन त्याला ग्रुप मधून काढून टाकतात किंवा मग ग्रुप सोडायला भाग पाडतात. जिथे मोठ्या मुश्किलीने सगळ्यांचे नंबर जमवून ग्रुप बनवला, तो यासाठी का, असा प्रश्न पडतो. हे सगळं कधी होतं आपल्यात? या गोष्टी तर कधी कोणी शिकवल्या नव्हत्या, मग या कुठून आल्या? आधी भरपूर दंगामस्ती केली, पण त्यातली आता ‘मस्ती’ जाऊन आपापसात ‘दंगा’ तेवढा उरला. मित्र तर हरवलेच, सोबत मैत्रीही!
सगळ्यांचेच विचार इतके संकुचित झालेत, की आता ती शाळेची बस लहान होत होत नॅनो कारइतकी छोटी झालीय, ज्यात फक्त ठराविक लोकांनाच जागा आहे, सगळ्यांना नाही.