(हा कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातली नावे, ठिकाणे, संदर्भ देखील काल्पनिक आहेत. कुठल्याही धर्म, पंथ वा समुदायाच्या भावना दुखावण्याचा याद्वारे हेतू नाही. यातल्या कुठल्याही गोष्टीचा वास्तविक आयुष्याशी आलेला संबंध हा केवळ योगायोग समजावा. यात मांडली गेलेली मते ही लिहिणाऱ्याची वैयक्तिक मते आहेत.)
सूर्य उगवायची वेळ झालेली होती. मी माझ्या अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी आकाशाचा तांबूस रंग बघू शकत होतो. माझ्या शरीरावर नेमक्या किती आणि कुठे जखमा झालेल्या आहेत, हे मलाही माहीत नव्हतं. ट्रक आपल्या गतीने अंतर कापत होता. त्याच्या मागच्या भागात ठेवलेल्या सामानामध्ये मी नेमका कुठल्या कोपऱ्यात आहे, याचीही मला काही कल्पना नव्हती. मी डोळे मिटून काल रात्री काय झालं होतं, हे आठवायचा प्रयत्न करु लागलो. आठ-दहा माणसं असावीत कदाचित, मी फक्त पळतोय आणि ते सगळे माझ्या मागे हातात काही ना काही घेऊन पळताहेत, इथपर्यंत तर आठवलं. माझा वेग कमी पडला आणि त्यांच्यातल्या एकानं मागून कॉलर मागून पकडून मला खाली पाडलं. मी पडलो तोच मला सगळ्यांनी घेरलं आणि अर्वाच्य शिव्या देत मारायला सुरुवात केली. मी माझे दोन्हीही हात कानाभोवती गुंडाळून घेऊन स्वत:ला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो, मध्येच त्या घोळक्यातून निघून पुन्हा पळून जायचा प्रयत्न करत होतो. माझ्या चौथ्या प्रयत्नात मला यश आलं आणि मी पुन्हा पळू लागलो. त्या लोकांनी परत माझा पाठलाग सुरु केला. माझ्या शरीराच्या काही भागांतून रक्त येत होतं. पण त्या त्रासापेक्षा मी त्यांच्या हाती आणखी एकदा लागणं, हे जास्त त्रासदायक असणार होतं. अर्धी रात्र असल्यामुळे रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. मी रस्ता ओलांडून एका उभ्या असलेल्या ट्रकमध्ये चढलो. आता मला त्या लोकांची काहीच चाहूल जाणवत नव्हती. माझं शरीर इतकं क्षीण झालं होतं की, मी त्या ट्रकमध्ये असलेल्या सामानात लपून बसलो….
…आता माझे डोळे पूर्णपणे उघडले. मी सगळी शक्ती एकवटून उठून बसलो. आजूबाजूला फक्त मोठमोठे खोके ठेवलेले होते. हा ट्रक कुठे चाललाय, याची मला कसलीही कल्पना नव्हती. इतक्या वर्षांची मेहनत करुन मुंबईपर्यंत पोचून मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं. माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण करणारं शहर, आज माझ्याच जीवावर उठलेलं होतं. इतक्या वर्षांचा केलेला अभ्यास, रिसर्च, लोकांना केलेल्या विनंत्या, भेटीगाठी, ओळखी….कशाचाही आता उपयोग नव्हता. आत्ता या क्षणी फक्त जीव महत्वाचा होता.
बहुतेक मी मुंबईपासून बराच दूर आलेलो होतो. सूर्य वर येऊन सुद्धा हवेत अजूनही गारवा होता. त्या थंड हवेमुळे अंगावरच्या जखमा अधूनमधून डोकं वर काढत होत्या. मी कण्हू शकेल इतका आवाज देखील तोंडातून निघत नव्हता, ओठ घसा कोरडे पडलेले, अशाच अवस्थेत मी होतो तसाच पुन्हा पडून राहिलो.
पण हा काय माझा शेवट नाही. हे सगळं सुरु झालं अंदाजे १० वर्षांपूर्वी! “फिल्ममेकिंग” या विषयाने मला लहानपणापासूनच झपाटलेलं होतं, अगदी शाळेत असल्यापासून! त्याच नादात मी अनेकदा वेशभूषा स्पर्धेत भाग घेऊ लागलो. मग शाळेत कधी कुठला कार्यक्रम असला की, मला बोलावलं जायचं. कुठल्यातरी हिरोची नक्कल करायची, त्याला टाळ्या पडणार, मग थोडंसं कौतुक होणार, हे ठरलेलं असायचं. “अंगातले सुप्त गुण” ओळखणारे वगैरे शिक्षक तेव्हा माझ्या शाळेत नव्हते. मी कधीच अभ्यास आणि परीक्षा यांच्याखाली स्वत:ला दबू दिलं नाही की त्याचं टेन्शन घेतलं नाही. मी हुशार नसलो तरी “ढ” विद्यार्थीही नव्हतो. माझ्या वयाची मुलं जेव्हा खेळायला जायची, तेव्हा मी मात्र चोरुन सिनेमे बघायचो. पुढे कॉलेजला गेलो आणि पक्कं ठरवलं की एक फिल्म बनवायची. मग विषय कुठला निवडायचा, यात मी पदवीची तिन्ही वर्षं खर्च केली. फिल्ममेकिंग नाहीच जमलं, तर पदवीचा उपयोग करुन कुठेतरी नोकरी करता येईल असा “बॅकअप प्लॅन” सुद्धा तयार होता. मी माझी फिल्म बनवायची इच्छा घरात जाहीर केली आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे त्याला विरोध झाला. आरडाओरडा, वादविवाद, भांडण आणि एक दिवस उपाशी राहणं, हे सगळं झालं. कदाचित माझ्या घरच्यांना आधीच भविष्य दिसलं असेल. ते शेवटपर्यंत मला विरोध करत राहिले आणि मी त्यांना! आज जखमा अंगावर घेऊन “आई गं” तोंडून निघताना आई आठवत होती आणि थोडक्यात जीव वाचल्यानंतर ते संकट बघून “बाप रे” म्हणताना बापही आठवत होता.
(क्रमश:)