पुदुचेरीमधून बाहेर पडलेलो असलो तरी गोष्ट इथे संपत नव्हती. चेन्नईमध्ये सुद्धा पाऊस सुरु असल्याच्या बातम्या इंटरनेटवरून मिळत होत्या. पुदुचेरी सोडलं की, विषय संपला असं वाटलं. पण सुमारे १५० किमीच्या अंतरामध्ये पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. कारच्या समोर सगळं पांढरट दिसत होतं, गाडी नेहमीपेक्षा हळू चालवावी लागत होती.
पुदुचेरीपासून रेल्वेप्रवास करण्याची सोय नसल्यामुळे थोडं मागे फिरून- म्हणजे चेन्नईला येऊन पुढचा प्रवास करायचा होता. रेल्वेची निर्धारित वेळ जरी संध्याकाळची असली तरी आम्ही सकाळीच पुदुचेरीमधून निघालो होतो. अजून थांबलो आणि या पावसाने निघू दिलं नाही तर काय, ही चिंता होती. जितकं वेळ १५० किमी कापायला लागावा त्यापेक्षा थोड्याशा उशिराने का होईना, चेन्नई एग्मोर स्टेशनपर्यंत पोहोचलोच. नुकताच पाऊस पडून गेलेला होता, पण पोचलो तेव्हा सगळीकडे ऊन पडलेलं होतं. सूर्य डोक्यावर आलेला होता. म्हणजे जवळजवळ आम्हाला अर्धा दिवस रेल्वेची वाट बघावी लागणार होती. ठरलेली वेळ होती संध्याकाळी ७:१५ वाजता.
चेन्नई हे तसं खूप मोठं म्हणजे विस्तारलेलं शहर आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. इथली रेल्वे सेवा ही दोन मुख्य स्टेशन्स पासून चालते. एक आहे चेन्नई सेन्ट्रल आणि दुसरं, जिथे मी थांबलेलो होतो ते- चेन्नई एग्मोर. दोन्हीही स्टेशन्सची बांधणी ब्रिटीश राजवटीत झालेली आहे. चेन्नई सेन्ट्रलची १८७३, तर चेन्नई एग्मोरची १९०६. दोन्ही ठिकाणांमधला फरक असा की, सेन्ट्रलवरून भारतातल्या सगळ्या मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वे निघतात. तर एग्मोरवरून चेन्नईच्या दक्षिणेकडे असलेल्या शहरांकडे रेल्वे जातात. सेन्ट्रल हे त्याच्या आधुनिक सुविधांसाठी ओळखलं जातं, तर एग्मोर स्टेशनची इमारत ही शहरातल्या प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. दोन्हीही ठिकाणी ब्रिटीशकालीन स्थापत्याचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो.
एग्मोर स्टेशन तसं भरपूर मोठं होतं. एकूण प्लॅटफॉर्म्स किती ते नाही माहीत, पण माझ्या माहितीनुसार १२ प्लॅटफॉर्म्सचा वापर होतो. खूप वेळ वाट पाहायची असल्यामुळे काहीतरी खाणे-पिणे, पायी फेरफटका मारून येणे आणि सामानाकडे लक्ष ठेवणे या गोष्टी सोडून अजून काय करणार? सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे आवाज भरपूर. मोबाईलवर गाणे ऐकून ऐकून किती वेळ ऐकणार? संध्याकाळी ६ वाजेपर्यंतचा तो वेळ आम्ही कसा घालवला, हे आता मलाही आठवत नाहीये. ६ वाजता एकदाची घोषणा झाली आणि मी कसल्यातरी गोष्टीवर विजय मिळवल्याचा मला आनंद झाला. चेन्नई एग्मोर स्टेशनच्या त्या तिसऱ्या प्लॅटफॉर्मवरून नवव्या प्लॅटफॉर्मवर जाताना बऱ्यापैकी दमछाक झाली. ठरलेल्या वेळेनुसार बरोब्बर ७:१५ ला गाडी हलली. हा प्रवास थोडासा दूरचा असल्यामुळे पूर्ण रात्र प्रवासात जाणार होती. सकाळी पोहोचेल तेव्हा बघू. आता मला फक्त झोप पाहिजे होती. पुढचा मुक्काम होता, हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक महत्वाचं ठिकाण- चेन्नईपासून जवळपास ६०० किमी दूर- रामेश्वरम्!
(क्रमश:)