या जगात जर कुठलं ठिकाण मला प्रिय असेल तर ते फक्त आणि फक्त चेन्नई! कारणं तशी खूप आहेत, पण त्यातलं अधोरेखित करण्यासारखं कारण म्हणजे माझे दोन्हीही आवडते अभिनेते याच शहराने दिलेले आहेत. एक आहेत शिवाजीराव गायकवाड अर्थात सुपरस्टार रजनीकांत आणि दुसरे म्हणजे अभिनयात आपला वेगळं ठसा उमटवणारे कमल हासन! तिरुपतीपासून चेन्नई सुमारे १५० ते १६० किलोमीटर. जाण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला तर हरकत नाही, पण मला चेन्नईला जाणाऱ्या रस्त्यावरच्या कुठल्याच गोष्टी चुकवायच्या नव्हत्या! तसं हायवे असल्यामुळे दोन्ही बाजूंनी जास्त काही खास बघण्यासारखं नव्हतं, पण गाडी जसंजसं अंतर कापत होती, तसंतसं मला आता ‘स्वर्ग दोन बोटं’ उरल्यासारखी जाणीव होत होती. ढोबळमानाने पाहायला गेल्यास सीमेच्या जितकं अलीकडे तिरुपती तितकं पलीकडे चेन्नई!
कुठल्याही दोन राज्यांच्या सीमेवर असते, तसं इथल्या चेकपोस्टवर सुद्धा औपचारिक विचारणा झाली. सगळं झाल्यावर त्या जाऊ द्यायचा इशारा करणाऱ्या माणसाचे मला गाडीतून उतरून हात मिळवून आभार मानावेसे वाटले. (पण मी तसं केलं नाही) इथून दिसणाऱ्या प्रत्येक बोर्डवर तमिळ भाषा असणार होती. मला तमिळ भाषेविषयी आकर्षण असल्यामुळे आणि थोडी तमिळ अक्षरांची ओळख असल्यामुळे मी उगाच ठिकाणांचे नाव असलेले बोर्ड वाचत सुटलो होतो. तमिळनाडूमध्ये शिरताच आपण वेगळ्याच वातावरणात चाललो आहोत, असा भास होत होता. माझी ८ वर्षांपासून चेन्नईला जाण्याची इच्छा पूर्ण होत होती. माझ्यासाठी ती निश्चितच खूप मोठी बाब होती. रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी निसर्गसौंदर्याची कुठलीही कमतरता नव्हती. चालत्या गाडीतून काढता येतील तितके फोटो मी काढत होतो.
तमिळनाडूची राजधानी असलेलं हे शहर, दक्षिण भारतातलं सगळ्यात मोठं सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र मानलं जातं. २०१५ मध्ये केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगात सर्वात जास्त वेळा भेट दिल्या गेलेल्या शहरांमध्ये चेन्नईचा ४३ वा नंबर लागतो. बीबीसीने सुद्धा चेन्नईचा “जास्त काळासाठी राहण्यायोग्य आणि जास्त वेळा भेट देण्यायोग्य” म्हणून उल्लेख केलेला आहे. (अधिकृत माहितीसाठी हे वाचा)
पोहोचलो तेव्हा बहुतेक दुपारचे १२ वाजले होते. मी चेन्नई फिरायला इतका आतुर होतो की, हॉटेलवर फक्त सामान टाकून देऊन लगेच निघण्याची माझी तयारी होती. आपण आत्ताच ३-४ तासांचा प्रवास करून आलोय वगैरे काहीही वाटत नव्हतं. हॉटेलच्या रूममधून पारंपारिक पद्धतीची तिथली दिसणारी घरं, माझ्या आधीच ओसंडून वाहणाऱ्या आनंदात भर टाकण्यासाठी पुरेशी होती. का कोण जाणे, पण चेन्नईला पोहोचल्यापासून दक्षिण भारतात येण्याचं सार्थक झालं, असं वाटत होतं. कदाचित वाचून हसू येईल, पण माझ्या दृष्टीने ते तसंच होतं. चेन्नई म्हटलं की आधी डोळ्यासमोर येतो मरीना बीच. त्याच्या थोडं पुढे गेलं की नेपियर ब्रिज. यापैकी नेपियर ब्रिज मी बऱ्याच तमिळ सिनेमांमध्ये पाहिलेला असल्यामुळे मला आधी तो बघायचा होता. मरीना बीच काय, त्याच रस्त्यावरून परत येतांना दिसतो. या दोन्हीही ठिकाणांपेक्षा मला आणखी एका ठिकाणी जायचं होतं, ज्यासाठी मी खरं तर दक्षिण भारत सफरीवर आलो होतो, ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांचं घर. खरंच सांगतो, तिथे जाऊन त्यांची भेट झालीच पाहिजे, हा माझा अट्टाहास नव्हता. ते किती व्यस्त असतात, हे तर सगळ्या जगाला ठाऊक आहेच. त्या घरापर्यंत जाऊन आलो, तरी माझ्यासाठी ते “सोने पे सुहागा” होतं. अडचण ही होती की, ती खाजगी मालमत्ता असल्यामुळे, तिथपर्यंत कोणी जाऊ देईल की नाही, हा प्रश्न होता. त्या कॉलनीमध्ये असलेल्या प्रत्येक वळणावर किमान २ किंवा ३ पोलिस होते. त्यापैकी कोणी अडवून जास्त प्रश्न विचारले तर? किंवा पुढे जाऊच दिलं नाही तर? प्रश्न विचारले तर चिंता नव्हती कारण मी कुठलं चुकीचं काम करत नव्हतो, पण भाषेचा सगळ्यात मोठा अडथळा होता.
आपल्याकडे लक्ष्मी या देवतेला जसं महत्व आहे, तितकंच, किंबहुना त्याहून जास्त महत्व दक्षिणेत पाहायला मिळतं. मी पाहिलेलं एक मंदिर ज्याला अष्टलक्ष्मी म्हणून ओळखतात- दोन मजले असलेलं आणि समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असलेलं हे मंदिर. मंदिर, त्याच्यामागे रस्ता आणि लगेच समुद्र. त्या किनाऱ्यावर फक्त उभं राहायचं. जितक्या वेळा लाट पायाशी येईल, तशी पायाखालची वाळू थोडी थोडी सरकत जाईल. तेव्हा जे वाटतं, ते शब्दांत नाही सांगता यायचं!
(क्रमश:)