समुद्रानंतर वेळ आली होती मरीना बीच आणि नेपियर ब्रिजची. तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार असलेले विजय आणि आर. माधवन यांच्या अनुक्रमे ‘थेरी’ आणि ‘विक्रम वेदा’ या चित्रपटांत तो दाखवलेला आहे. “मी पण तिथे जाऊन आलो आहे” हे सांगण्यासाठी आणि परत आपण इथे येऊ की नाही, या दोन्ही हेतूंमुळे मला नेपियर ब्रिज बघायचाच होता. त्याच्यासाठी मरीना बीच मागे टाकून, पुढे जाऊन, यू टर्न घेऊन परत यावं लागलं. चालत्या गाडीतून जसे फोटो आले तसे घेतले. आता हौशी माणसाने काढलेले फोटो ते! जितके ठीकठाक यायला पाहिजेत तितके आले.
मरीना बीचवर पोहोचलो तेव्हा थोडा थोडा अंधार पडत आला होता. मी तिथे थोडं फिरायचं टाळलंच. मेरी मंजिल तो कुछ और ही थी ना! मला बीचवर फिरून जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता. माणसाला शिजेपर्यंत दम धरवतो पण निवेपर्यंत धरवत नाही म्हणतात, ते हेच! मी अक्षरशः एक-एक मिनिट मोजत होतो. जवळपास अर्ध्या तासानंतर मी माझ्या इच्छित ठिकाणी पोहोचलेलो होतो. माझ्या सगळ्या चिंता मिटलेल्या आहेत, असं अचानक वाटलं. श्री. रजनीकांत यांचं घर हे कुठलंही पर्यटन स्थळ नव्हतं, कितीही झालं तरी ती कोणाची का असेना, खाजगी मालमत्ता होती. तिथल्या वॉचमनने “तुम्ही त्यांना भेटू शकत नाही, ते इथे नाहीत” असं सांगितलं. हे तर मी मनाशी धरून चाललोच होतो. पण त्यांच्या घरापर्यंत आपण जाऊन पोहोचलो, ती नेम प्लेट पाहूनच माझं समाधान झालेलं होतं. आपलं पुन्हा येणं होईल की नाही, म्हणून तिथे किमान डझनभर फोटो काढून घेतले. बस्स! ती १० मिनिटं कदाचित मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. “R-A-J-I-N-I-K-A-N-T-H” ही ११ अक्षरं लिहिलेली आणि थोडीशी सजावट केलेली ती नेम प्लेट बघतांना मला कुठला तरी खजिना सापडल्यासारखा आनंद झालेला होता.
मी हॉटेलवर आलो, पण मी त्या रात्री जेवलो नाही. तिथे जाऊन आल्यामुळे खरंच माझं पोट भरल्यासारखं वाटत होतं. जरी माझा प्रवास अजून पुढे राहिलेला होता, पण मला चेन्नई अजिबात सोडावंसं वाटत नव्हतं. पुढच्या प्रवासाचा कार्यक्रम आधीपासून ठरल्यामुळे नाईलाज होता. चेन्नई सोडत असलो तरी तमिळशी माझा संबंध पुढचे ४-५ दिवस येणारच होता. गाडी चेन्नई सोडून निघाली होती आणि मी परत एकदा मला किती तमिळ येतंय, हे बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांची नावं वाचत बसलो होतो….
(क्रमश:)