शीर्षक थोडं गडबड वाटतंय? सहाजिक आहे. आपल्या देशाचा दक्षिण भाग (आपल्या भाषेत साऊथ) जो मी माझ्या नजरेतून पाहिला, त्यावरून मला खरोखरच एका वेगळ्या जगात असल्याचा भास झाला. एका लोकप्रिय डायलॉगनुसार, “किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है” हे माझ्या बाबतीत खरं ठरायला किमान ७ वर्षं जावी लागली. असो. हा केवळ एक विनोदाचा भाग!
आपल्या देशात वर्षभरात जितके सिनेमे बनतात, त्यात दाक्षिणात्य चित्रपटांचा महत्वाचा वाटा आहे, यात शंका नाही. मी स्वत: मराठी असलो तरी या सिनेमाचं पहिल्यापासूनच आकर्षण वाटायचं. एक मिनिट- तुम्ही विचार करताय तसं मी हिंदीमध्ये डब केलेल्या दाक्षिणात्य सिनेमाचं म्हणत नाहीये, हे आधी स्पष्ट करतो. सिनेमा म्हणजे आयुष्य नाही हे मी जाणतो. पण त्या सिनेमांमध्ये दाखवतात तशी गावं आपल्याला बघायला मिळतील का, तिथली भाषा, तिथलं राहणीमान, तिथली खाद्यसंस्कृती (हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा), हे जवळून बघता आलं तर ते किती भारी असेल, असं वाटायचं. २०११ मध्ये बंगळुरूला जाऊन आल्यापासून ‘आपण एकदा फक्त आणि फक्त दक्षिण भारत बघण्यासाठीच यायचं’ हे मी ठरवलं होतं. या वर्षी ती संधी मिळाली आणि ती खरंच स्वप्न पूर्ण करणारी ठरली.
तर, दक्षिणेकडच्या चार राज्यांत जाऊन आपण फिरून यावं असं ठरलं. कुठलंही राज्य पूर्ण फिरून येणं अर्थातच अशक्य होतं. पूर्वीच्या आंध्र प्रदेशमध्ये आणि आत्ताच्या तेलंगाणामध्ये स्थित हैदराबादपासून सुरु झालेला हा प्रवास आपल्याला एक कधीही न विसरता येणारा आणि कल्पनेच्या पलीकडचा अनुभव देणार आहे, याची मला खात्री होती….