जरी अजून संध्याकाळ झाली नव्हती, तरी आपण काय असंच झोपून राहायचं का, असं वाटलं आणि मी तयार होऊन परत बाहेर जायला निघालो. कंटाळा आपल्या जागी होता आणि इतक्या दूर येऊन काही बघितलंच नाही तर त्याचा उपयोग काय, हा विचार आपल्या जागी होता. जिथे जिथे जायचं होतं, त्यापैकी फक्त एकच ठिकाण जवळ होतं.
पहिली मजल थेट वट्टकोट्टई किल्ला! किल्ल्यात जास्त काही बघण्यासारखं नाही. त्रावणकोर राजांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला आहे. या किल्ल्यावरून समुद्र फारच सुंदर दिसतो. काही काळ ब्रिटीश, तर काही काळ डचांनी याचा उपयोग केला. किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर इंग्रजीमध्ये ‘वट्टकोट्टई’ लिहिण्यात आलेलं आहे.
काही इतिहासकारांनुसार, हा किल्ला राजा मार्तंड वर्मा याच्या ताब्यात असतांना समुद्रीमार्गाने डचांनी प्रधान सेनापती डेलनॉय याच्या नेतृत्वात या किल्ल्यावर आक्रमण केलं. परंतु, मार्तंड वर्माने याचा सामना करत अतिशय ताकदीने त्यांना हुसकावून लावलं. तो प्रतिकार इतका भयंकर होता की, डच सैन्याचा अतिशय लाजिरवाणा पराभव झाला.
किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा हौद आणि बाजूने मोठमोठ्या रुंदीचे रस्ते आहेत. डचांच्या राज्यकाळात या रस्त्यांचा उपयोग सैन्याच्या परेडसाठी करत. मध्यभागी असलेला हौद हत्तींसाठी होता. इतिहासकारांच्या मते, मदुराईचे राजे राहिलेल्या पांड्य राजांनी सुद्धा इथे काही काळ वास्तव्य केलं. जुनं बांधकाम खरोखरच बघायला छान वाटतं. परंतु, ते इतकंही जुनं नाही की, पडायच्या बेतात असेल. याचं कारण म्हणजे, पुरातत्व विभागाने व्यवस्थित केलेली किल्ल्याची जपणूक.
कन्याकुमारी पासून १२ किमी अंतरावर एक गाव आहे. त्याचं नाव आहे सुचिन्द्रम्. मुख्यत: थानुमलायन (हनुमान) या देवाला हे मंदिर समर्पित आहे. तसेच हिंदू धर्मात ब्रम्हांडाचे रचयिता मानले गेलेले ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचीही मंदिरे आहेत. शिवाय नवव्या शतकातील शिलालेख इथे सापडलेले असून त्यावरून याच्या प्राचीनतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. इथे असलेली हनुमानाची ६ मीटर उंचीची मूर्ती लक्ष वेधून घेते. तसं या ठिकाणी राजे महाराजे यांच्या काळातल्याही खुणा आहेत, पण मी पाहिलेलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे एका ठिकाणी सात खांब असे आहेत, ज्यांच्यावर हाताने मारून पाहिल्यास सा, रे, ग, म, प, ध, नि असे सात सूर ऐकायला येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सातही खांब दगडाचे बनवलेले आहेत!
सुचिन्द्रम् पासून परत कन्याकुमारीच्या रस्त्यावर येत असतांना वाटेत ‘नॅशनल पार्क’ आहे, जिथे अतिशय शांत वातावरण असून इथून लवकर जाण्याची इच्छा होतच नाही. एक फेरी मारल्यानंतर कंटाळा येईल इतक्या मोठ्या आवारात हे पसरलेलं आहे. अतिशय स्वच्छ आणि सुरेख पद्धतीने देखभाल केलेल्या या ठिकाणाचं कौतुक करावं तितकं थोडंच!
हा सगळा फेरफटका मारून परत हॉटेलला आलो तेव्हा अंधार पडलेला होता. त्या अंधारात समोर विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लुवर पुतळा हे दोन्हीही विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले होते. सकाळी सूर्योदय पाहताना ते दृश्य जितकं सुंदर दिसत होतं, तेवढंच सुंदर आताचं दृश्य होतं. मी पुन्हा फोटो काढून घेतले.
रात्र तशी झालेलीच होती. पुढच्या प्रवासाची तयारी करायची अजून राहिलेली होती. वेळ हळूहळू करत निघून चाललेला होता. त्यामुळे तो वाया घालणे म्हणजे स्वत:चे नुकसान करून घेणे अशी स्थिती होती. दिवसभराचा शीण असल्याने झोप तर येत होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कन्याकुमारी सोडायचं असल्यामुळे तयारी करून ठेवणं आवश्यक होतं. वाटलं, पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला कधी येता येईल?
(क्रमशः)