स्थळ- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पोचल्या पोचल्याच हैदराबाद शहर म्हणजे काय आहे, याचा अंदाज आला. दख्खनमधील उर्दू साहित्यिक शहर असलेलं आणि दाक्षिणात्य चित्रपटनिर्मितीचं असलेलं हैदराबाद हे केंद्र. तिथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे सुमारे आठ वाजले होते. मुंबईप्रमाणेच हे शहरही रात्री झोपत नसेल, असं वाटत होतं. माझ्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी एक तास लागणार होता. मी आपला उगाच रस्त्याच्या दोन्हीही बाजूने काय काय आहे, हे बघत चाललो होतो.
ज्या रस्त्यावरून मी जात होतो, तो सगळा भाग वर्णन करण्यासारखाच वाटत होता. रस्ते, दुभाजक, पथदिवे यांपैकी कुठल्याही बाबतीत नाव ठेवायला जागा नव्हती. दोन्ही बाजूला एका उड्डाणपुलाच्या उंचीपेक्षा थोडे जास्त उंच असलेले जाहिरातींचे फलक लक्ष वेधून घेत होते. कुठे कपड्यांच्या, कुठे ज्वेलरी तर कुठे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पिक्चरचे भले मोठे पोस्टर्स.
मेन रोड वरून जात असतांना ज्यांना ज्यांना बरंच अंतर सरळच जायचं आहे, अशांसाठी उड्डाणपूल होते. ज्यांना मध्येच वळायचं असेल, ती ट्राफिक पुलाच्या खालून चालू होती. कुठेही वाहतुकीत गोंधळ, पुढे जाण्याची घाई किंवा हॉर्नचा मुद्दाम वापर आढळत नव्हता. एका स्मार्ट सिटीमध्ये ज्या ज्या गोष्टी असायला हव्यात, त्या सगळ्या बघायला मिळत होत्या.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहता, भारत इ. स. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेच्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. हैदराबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगणा हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले. (स्रोत: wikipedia)
इथल्या बहुसंख्य लोकांची भाषा तेलुगू असली, तरी इथे उद्योगांच्या विकासामुळे आणि इतर भागातील लोक राहायला आले असल्यामुळे शहराला बहुभाषिक स्वरूप आले आहे, असे वाटते. दैनंदिन व्यवहारात प्रामुख्याने तेलुगू, उर्दू, इंग्रजी आणि हिंदीचा वापर होत असतानाच बऱ्याच भागात ‘हैदराबादी हिंदी’ बोलणारे लोक आहेत, ही भाषा म्हणजे तेलुगू आणि उर्दूचा हिंदीवर पडलेला प्रभाव आहे. असो. एकेकाळी या शहराची ओळख ‘मोत्यांचे शहर’ होती, किंबहुना आजही आहे.
एकंदरीत या शहराचं वातावरण बघून आपण आपल्या दक्षिण भारत भ्रमणाची सुरुवात अगदी योग्य ठिकाणाहून केलेली आहे, याची खात्री झाली. दुसऱ्या दिवशी पासून या शहरात फिरायचं आहे, यासाठी मी सकाळची वाट बघत होतो.
(क्रमश:)