मंदिर जरी देशाच्या दक्षिण भागात असलं, तरी देशभरातून लोक इथे येत असल्यामुळे याला देशाचं श्रद्धास्थान म्हटल्यास वावगे ठरू नये. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात असलेलं हे ठिकाण, जिथे कुणालाही किमान एकदा तरी यावंसं वाटतं. लाखो लोक दर्शन घेण्यासाठी येतात, तर हजारो लोक सेवेकरी होण्यासाठी. तुमची मनस्थिती कशी जरी असली तरी या ठिकाणी आल्यावर थोडंसं शांत वाटतं हे नक्की. कारण नेमकं काय ते सांगता येणार नाही, पण बहुतेक इथल्या अध्यात्मिक वातावरणामुळे हे सगळं आहे, असं तिथली मोठी माणसं सांगतात.

शहर छोटं असलं तरी ते व्यवस्थित आहे. विमानतळापासून जवळच असलेल्या पद्मावती मंदिरापासूनच हे लक्षात येतं. धार्मिक ठिकाण असल्यामुळे इथे मंदिरांची संख्या जास्त आहे. पण अगदी टिपिकल दाक्षिणात्य लोक, त्यांचं राहणीमान, तिथली घरं, हे सगळं पाहण्यासारखं आहे.

एक सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे शहरातल्या जवळपास सगळ्याच मंदिरांमध्ये मोबाईलची मनाई केलेली आहे. देव, प्रार्थना किंवा अध्यात्माशी संबंधित गोष्टींवर लक्ष केंद्रित व्हावं म्हणूनही असेल कदाचित! देव कसा किंवा कुठे आहे, हे मला माहीत नाही. देव कुठली हरवलेली वस्तूही नाही की ज्याला शोधायला कुठे जावं लागेल. पण ती तिथली मंदीरं आहेत ना, तिथे गेल्यावर तुमच्या डोक्यात चालू असलेले सगळे विचारचक्र थांबून एक प्रकारची शांतता मिळाल्यासारखं वाटतं. अर्थात हा माझा स्वत:चा वैयक्तिक अनुभव आहे.

लौकिकार्थाने, फोन किंवा कॅमेरा यांची मनाई असल्यामुळे तिरुपतीमध्ये जास्त फोटो काढता आले नाहीत. पण त्याची काहीच खंत वाटत नाही. गर्दीमुळे दर्शनासाठी लागलेला वेळ, त्याचंही काही नाही. नाहीतरी देव सहजासहजी भेटत नाही म्हणतातच की!

deshache-shraddhasthan-tirupati-1
वलयांकित भाग बराचसा गरुडाच्या चोचीसारखा भासतो.

मंदिरातून खाली उतरत असतांना (मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर आहे) एक डोंगर असा आहे, ज्याचा आकार कुठल्याही एका बाजूने पाहिल्यास गरुडासारखा दिसतो. विशेष म्हणजे हा आकार कुणी दिलेला नसून नैसर्गिकरीत्या ऊन, पाऊस आणि वारा यांच्यामुळे तसा झालेला आहे. बालाजी म्हणजे विष्णू ही देवता आणि त्यांच्याजवळ त्यांचं वाहन गरुड, असं स्थानिक लोक मानतात.

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्टवर सुरक्षा तपासणी झाली, की तिथून वरती माथ्यावर असलेल्या मंदिरापर्यंत जायला कमीत कमी २८ मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागायला हवा, असं मला समजलं. तुम्हाला २८ च्या वर कितीही मिनिटं लागू द्या, चालेल. पण त्यापेक्षा कमी वेळ नको. जर तसं झालं, तर सरळ दंड भरा. शिवाय दंड झाल्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर नोंदवून घेऊन ती गाडी ३ दिवस मंदिराच्या आवारात आणता येणार नाही. कारणं दोन- एक म्हणजे सगळं रस्ता म्हणजे एक घाट आहे आणि दुसरं म्हणजे जोरात गाड्या चालवल्यामुळे अपघातासारख्या घटना होऊ नयेत. पण शिस्त लावणारेही हवेत आणि शिस्त पाळणारेही हवेत. असो!

मंदिरांची आणखी एक विशेषता म्हणजे कुठल्याही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विजेचे दिवे लावलेले आढळून येत नाहीत. जो काही उजेड दिसतो तो समया किंवा दिव्यांचा असेल तेवढाच! परंतु त्या उजेडात मूर्ती व्यवस्थित दिसेल याची दक्षता घेतलेली दिसून येते. मंदिरांचं बांधकाम तर अगदी जुन्या किंवा प्राचीन धाटणीचंच आहे.

माथ्यावर असलेल्या मंदिरापासून परत येण्यासाठीचा रस्ता वेगळा आहे. म्हणजे इथेही वाहतुकीच्या प्रश्नावर मात झालेली दिसून येते. कोणाचाही कोणाला त्रास नको.

deshache-shraddhasthan-tirupati-2

परत येत असतांनाची दुसरी गोष्ट म्हणजे, दिवंगत अभिनेते, उत्तम राजकारणी, उत्कृष्ट वक्ते, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, पद्मश्री स्व. एन. टी. रामा राव अर्थात एनटीआर यांचा पुतळा! तिथल्या जनतेसाठी श्री. एनटीआर हे देवस्थानी आहेत. मी स्वत: त्यांचा आदर करत असल्यामुळे त्यांच्या पुतळ्याबरोबर फोटो काढणं मला योग्य वाटलं नाही. पण फक्त त्या पुतळ्याचा मात्र मी एक आठवण म्हणून फोटो घेतला.

तिरुपतीचाही मुक्काम संपत आलेला होता. तिथून ज्या ठिकाणी मी जाणार होतो, त्यासाठी मी इतका उत्सुक होतो की, ते शब्दांत सांगता येणार नाही. त्या दिवसाची मी जवळजवळ ८ वर्षं वाट पाहिली होती. भारतातल्या चार महत्त्वाच्या शहरांपैकी एक, आपल्या भाषेत मेट्रो सिटी- चेन्नई! केवळ साडेतीन अक्षरं, हे लिहित असतांनाही अंगावर शहारा आलाच! का ते कळेलच…..

(क्रमश:)