इतक्या दिवस प्रवास केल्याचा थोडासा शरीरावर परिणाम जाणवत होता. मागचे १३-१४ दिवस सतत प्रवास करत होतो. एक शेवटचा टप्पा फक्त तेवढा राहिलेला होता. तो पार करुन परत घरीच! कन्याकुमारी पासून तिरुवनंतपुरमपर्यंत सगळं अंतर रस्त्याने जायचं होतं. भौगोलिकदृष्ट्या तमिळनाडूची हद्द पार करुन आम्ही केरळमध्ये शिरणार होतो. कन्याकुमारी ते तिरुवनंतपुरम हे अंतर सुमारे १०४ किमी आहे. परंतु, हे पूर्ण करायला जवळपास ४ तासांचा वेळ लागतो. याला कारण म्हणजे रस्त्याची रुंदी! आपण जातो ती एक लेन आणि समोरून येणारी एक लेन, यामुळे ओव्हरटेक हा प्रकार टाळावा लागतो, त्यामुळे हा कालावधी आपोआपच वाढतो.
तिरुवनंतपुरमला जायच्या रस्त्यावरच पद्मनाभपुरम या ठिकाणी पद्मनाभपुरम महाल आहे, कन्याकुमारी शहरापासून जवळपास ४० किलोमीटरच्या अंतरावर! भारतातील हा सर्वात जुना महाल असावा, असा काही इतिहासकारांचा अंदाज आहे. एकेकाळी हे ठिकाण म्हणजे त्रावणकोर राजांची राजधानी होती. या ठिकाणाची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे नकाशाच्या अनुषंगाने हा महाल जरी तमिळनाडूमध्ये असला तरी याचं व्यवस्थापन आणि बाकी सगळी जबाबदारी ही केरळच्या राज्य सरकारची आहे.
दुपारी पोचल्यानंतर आणि फ्रेश होऊन जेवण केल्यानंतर थेट पद्मनाभस्वामी मंदिर गाठायचं होतं! भारतातल्या अनेक भव्य मंदिरांपैकी एक! हे मंदिर नेमकं कधी बांधल्या गेलं, याविषयीची निश्चित आणि ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु, इ. स. १७३३ मध्ये त्रावणकोरचा राजा मार्तण्ड वर्मा याने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. शिवाय, भगवान विष्णूंची प्रतिमा सर्वात आधी इथेच मिळाली, अशी इथली मान्यता आहे. या मंदिरातली मूर्ती ही भगवान विष्णूंच्या शेषनागावर विश्राम करत असलेल्या मुद्रेत आहे. विष्णूंच्या या विश्राम अवस्थेला इथे “पद्मनाभ” म्हणतात आणि म्हणूनच हे मंदीर “पद्मनाभस्वामी” या नावाने प्रसिद्ध आहे.
मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिरात असलेल्या “गोपुरम्” प्रमाणे इथे देखील गोपुरम् आहेत. याची स्थापत्यशैली ही द्रविड संस्कृतीचं दर्शन घडवते. दक्षिण भारतातील वास्तुकलेचं सर्वात भव्य आणि सुंदर उदाहरण म्हणजे इथले गोपुरम्! इ.स. १५६६ मध्ये पांड्य राजांच्या काळात या गोपुरमचे निर्माणकार्य झाले असावे, असा अंदाज आहे. या गोपुरमची उंची अंदाजे १०० फूट असून त्यात सात मजले आहेत. मंदिराच्या जवळच एक सरोवर आहे, त्याला ‘पद्मतीर्थ कुलम्’ म्हणतात.
मंदिरात दिवसभर धूप-दीप म्हणजेच उदबत्ती/धूप आणि दिवा सतत चालू राहील याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथल्या वातावरणात गेल्या गेल्या एक वेगळ्याच प्रकारचे प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण जाणवते. इथे प्रवेश करताना पुरुषांनी धोतर किंवा लुंगी, तर महिलांनी साडी नेसून प्रवेश करावा, असा इथला नियम आहे.
तिरुपती मंदिराप्रमाणेच हे मंदिरही भव्य आणि संपन्न आहे. मंदिरातली मूर्ती इतकी भव्य आहे की, तिला बघण्यासाठी तीन दरवाजांतून बघावे लागते. इथल्या दर्शनाच्या वेळा मंदिराने ठरवून दिलेल्या आहेत तसेच मंदिर प्रशासन त्या बाबतीत बरेच कडक आहे, असा एक स्वानुभव आहे.
बाकी केरळमध्ये फिरत असताना बहुतांश घरांमध्ये केळीची झाडे दिसतात. इथल्या जेवणामध्ये केळीच्या पानाचे अनन्यसाधारण महत्व आहे, हे सर्वश्रुतच आहे. “स्वादिष्ट” किंवा “रुचकर” ही इथल्या जेवणाची विशेषता आहे. मग तो पदार्थ कुठला का असेना! इडली, मेदूवडा (आपल्याकडे याला मेंदूवडा म्हटले जाते जे अतिशय चुकीचे आहे), चटणी, सांबार, डोसा, उत्तप्पा, भात आणि इथल्या भागाची “स्पेशालिटी” असलेला ‘पुट्टू’ हा पदार्थ! खाण्याचे शौकीन असलेल्या खवय्यांनी एकदा तरी केरळमध्ये जाऊन बघावे, असं माझं वैयक्तिक मत आहे.
प्रवासाचा पंधरावा दिवस उजाडला. काही वेळातच परतीचा प्रवास सुरु होणार होता. हॉटेलवरुन तिरुवनंतपुरम विमानतळाकडे जाताना केरळ राज्याने रस्ते या बाबतीत किती प्रगती केली आहे, हे दिसून येते. शिवाय, तिरुवनंतपुरमसह केरळमध्ये एकूण चार आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत आणि २०१८ मध्ये, चार आंतरराष्ट्रीय विमानतळे असणारे भारतातले पहिले राज्य ठरले आहे.
संपूर्ण प्रवास शब्दांत लिहिणं थोडंसं अवघड होतं. खरं तर ते पंधरा दिवस म्हणजे स्वर्गाचा घेतलेला सुखद अनुभव होता. प्रवासाने शरीर थकलेलं असूनही घरी जाऊ नये, असं वाटत होतं. विमानतळावरुन विमान उडालं, तशी जाणीव झाली – “जागा झालो, स्वप्न भंगले, स्वगृही जाणे, नशिबी आले”.