हसू आलं? तुम्हाला फक्त हसू आलंय, मी बाहुबलीच्या सेट्स वर गेलो तेव्हा अंगावर शहारे आले. या सगळ्याच मंडळींनी जे काही काम करून ठेवलंय ना, ते किती ग्रेट आहे, हे तिथे आपण जातो तेव्हाच समजतं. लोक फक्त राजमौली, प्रभास किंवा अजून इतरांना श्रेय देतात. त्यांची मेहनत तर आहेच, पण ज्यांनी हे छोटंसं साम्राज्य उभं केलंय, त्यांना १०० पैकी २०० मार्क!

या सेट्स विषयी मुद्दाम एक वेगळी पोस्ट लिहायचं कारण हे की, हा सेट इतका विस्तृत आहे, की एखाद्याला फिरून किंवा फोटो काढून काढून कंटाळा येईल. एका ऐकीव माहितीनुसार हा सेट साडेसात एकरमध्ये बनवला होता म्हणे! असेलही. या वर्षीच्या १ नोव्हेंबरपासून हा सेट लोकांना बघण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच हा सिनेमा म्हणजे काय हे सांगायला नको.
आत शिरायच्या जागी आणि सेटवरच्या प्रत्येक ठिकाणी स्पीकर्स लावलेले असून त्या ठिकाणी चित्रित झालेल्या प्रसंगाची ऑडीओ क्लिप चालू राहते. कधी हिंदीत, तर कधी तेलुगूमधून! गेल्या गेल्या समोर आहे तो एक उंच चौथरा आणि त्याला भरपूर पायऱ्या. दुसऱ्या भागात दाखवलेला भल्लालदेवाचा राज्याभिषेक होतो, तीच ही जागा. या सेटला बनवून २ वर्षं झालेली असली तरी बघून तसं वाटत नाही. ठिकठिकाणी ठेवलेल्या कचरापेट्या, किंवा लोकांना सेटवरच्या काही भागांत जाण्यासाठी केलेला मज्जाव- उदाहरणार्थ, चौथऱ्याच्या पायऱ्या. त्या फायबरच्या बनवलेल्या आहेत हा भाग वेगळा, परंतु लोकांना त्यावर चढण्यासाठी मनाई केलेली आहे, शिवाय “PLEASE DO NO TOUCH” चे फलक आहेतच.

थोडंसं पुढे जाऊन डावीकडे बघा तो स्तंभ! “माना की हमारा आत्मबल घायल है”…काही आठवलं? देवसेनाला बांधून ठेवलेली हीच तर ती जागा आहे. ते बघा ते त्याच्या बाजूला खाली उतरून जायचं तुरुंग. आत जाऊन येऊ शकता, तिथे कुलूपही नाही आणि कडी सुद्धा!

त्याच्या पलीकडे ती महादेवाची पिंड बघा! शेवटचा फाईट सीन आठवतच असेल, हो, तीच ती पिंड. त्या पिंडीकडे तोंड करून उभे असाल आणि उजव्या बाजूला पाहाल तर ते मोठं झाड दिसेल. झाड तर खरंखुरं आहे आणि त्याचा पारही! “खिला दो मामा”…आता पुढे सांगायची गरज नसावी. त्या पारावर बसाल तर तुम्ही सिंहासनाच्या उजव्या बाजूला येता. हो तोच मघाशीचा चौथरा. त्या चौथऱ्याला समोरून ६ अश्वप्रतिमा आहेत. विशेष म्हणजे या सहाही घोड्यांचे सहा वेगवेगळे हावभाव दिसतात. बनवणाऱ्याची कमालच आहे. (थोडं जवळ जाऊन बघाल तर दिसेल ते.)

आता थोडं त्या चौथऱ्याच्या मागे जाऊ. हाच तो माहिष्मतीचा दरबार. “औरत पर हाथ डालनेवाले की उंगलीया नाही काटते. काटते है उसका गला….” तीच जागा आहे ही. पण इथेही वर चढून जाता येणार नाही. गेलात तरी तुम्हाला कोणीतरी हटकणारच. खूपच भव्य आहे सेट, अगदी फिरून कंटाळा येईल इतका!

आता आला सेटच्या बाहेर जायचा रस्ता! जाता जाता सुद्धा २ गोष्टी लक्ष वेधून घेतात. एक म्हणजे ते एकाच वेळी असंख्य बाण मारायचं यंत्र! यंत्र म्हणू की अजून काय म्हणू? मला शब्द आठवत नाहीये. पण गोष्ट बघण्यासारखी आहे. पहिल्या भागातल्या ‘कालकेय’ सोबत झालेल्या युद्धात याचा वापर झालाय ही गोष्ट पटकन लक्षात येईल.

दुसरी गोष्ट जरा मोठी आहे. म्हणजे सगळा सेट तर मोठाच आहे, पण तुम्ही याच्या समोर उभं राहून बघा मग कळेल. तो आहे भल्लालदेवाचा पुतळा! चेहरा, धड आणि पाय या अशा जवळजवळ ३ ते ४ भागांत या पुतळ्याचे तुकडे केलेले आहेत. एका तुकड्याला पूर्ण बघायचं म्हटलं तरी मान वर करून पाहावं लागेल.

बस तसंच चालत रहा तुम्ही आता बाहेर पडलेले आहात. तुम्हाला घ्यायला बस उभीच आहे. परतत असतांना रस्त्याच्या डाव्या बाजूने मोठमोठे शेड्स आहेत. सिनेमामध्ये वापरल्या गेलेल्या तलवारी, ढाली, भाले या आणि अशा इतर शूटिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या दिसून येतात. त्या मात्र तिथे जाऊन बघता येत नाहीत. एक मात्र नक्की की, तिथून परत येत असतांना “पैसा वसूल” झाल्यासारखं नक्कीच वाटतं! मला तर वाटलं!
(क्रमश:)