ठरल्यानुसार जाण्याचं पहिलं ठिकाण होतं – रामोजी फिल्म सिटी. आपल्यापैकी कोणालाही हे नाव नवीन नाही किंवा या ठिकाणाविषयी कोणाला माहीत नाही, असा माणूस क्वचितच सापडेल. हॉटेलपासून निघून नामपल्ली रेल्वे स्टेशन आणि सुलतान बाजार मार्गे जाऊन फिल्म सिटीपर्यंतचं हे अंतर कापायला सुमारे दीड तास लागला.

हैदराबाद आदल्या दिवशी रात्री मला सुंदर दिसलं होतं, तसंच दुसऱ्या दिवशी सकाळीही दिसलं. रस्त्याने जात असतांना लागलेले लहान-मोठे मार्केट्स, याचं निरीक्षण करण्यावर माझा जास्त भर होता. हे शहर अक्षरशः झपाट्याने वाढतंय याची ग्वाही देण्यासाठी काही ठिकाणी उड्डाणपूल तर काही ठिकाणी मेट्रो रेल्वेचं काम सुरु असलेलं दिसत होतं. ते सुरु असतांना रोजच्या वाहतुकीला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली दिसत होती. दीड तासाच्या प्रवासानंतर शेवटी पोहोचलोच! रामोजी फिल्म सिटी! केवळ भारतातलाच नाही, कदाचित जगातला सगळ्यात मोठा, सुमारे २००० एकर परिसरात पसरलेला फिल्म स्टुडिओ. गेल्या गेल्याच असा स्टुडिओ आपल्या देशात आहे, याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. आत शिरताच एकामागून एक बसेसची रांग तुमचं स्वागत करते. जी तुम्हाला आत घेऊन जाते कारण त्याच्या गेटपासून प्रत्यक्ष फिल्म सिटीमध्ये जाण्यासाठी किमान १५-२० मिनिटे लागतात.

motyanche-shahar-ani-film-city-1
एका अविस्मरणीय अनुभवाकडे जाणारा रस्ता

१९९६ मध्ये चेरुकुरी रामोजी राव यांनी स्थापन केलेल्या या स्टुडिओमध्ये सुमारे २५ सिनेमांचं शूटिंग एकाच वेळी सुरु राहील, इतकी अद्ययावत सुविधा आहे. सिनेव्यवसायाच्या भाषेत प्री-प्रोडक्शन पासून पोस्ट-प्रोडक्शन पर्यंत जे जे काही लागेल ते सगळंच! जवळजवळ ५०० लहान-मोठे सेट लोकेशन्स ज्यात उद्द्याने, अंदाजे ५० स्टुडिओ फ्लोअर, आउटडोर लोकेशन्स, सेट तयार करण्याच्या जागा एवढंच नाही तर ऑडीओ प्रोडक्शन आणि फिल्म प्रोसेसिंग व्यवस्थेचाही समावेश आहे.

मला वाटतंय हे वर्णन कदाचित खूप मोठं होईल, परंतु त्याला इलाज नाही. कारण या बाबतीत लिहाव तितकं कमीच! तिथे पाहिलेल्या सगळ्या सेटमध्ये मला बाहुबली सेटचं विशेष आकर्षण होतं. बाहुबलीने एक सिनेमा म्हणून लोकांवर काय जादू केलीये, हे मी सांगायची गरज नाही.

एवढ्या विस्तीर्ण भागाची स्वच्छता ही अतिशय स्तुत्य बाब होती. फिरण्यासाठीचे बनवलेले रस्ते हे रुंद, स्वच्छ आणि गुळगुळीत होते. कुठल्याही ठिकाणी फोटो काढण्यासाठी मज्जाव नसल्यामुळे मी मनसोक्त फोटो काढत फिरत होतो.

motyanche-shahar-ani-film-city-2
डाव्या बाजूला कुठल्याही कॉम्प्लेक्ससाठी वापरता येईल असा तयार केलेला सेट, मागे मध्यभागी दिसणारी ताजमहलची केलेली प्रतिकृती, तर उजवीकडे पारंपारिक बंगाली घरं दाखवण्यासाठीचा सेट.

इथे फिरायचं म्हणजे केवळ बसमधून फिरणे नाही. बसमध्ये असलेला गाईड तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी (क्वचित मल्याळम सुद्धा) भाषेतून एकेक ठिकाणाविषयी चालत्या बसमधून सांगत राहतो. तुमचं काम एवढंच की, तुम्ही खिडकीतून ती ठिकाणे पाहा आणि पाहिजे तसे फोटो काढा. पण याचा अर्थ फक्त बसमध्येच बसून राहायचं असं नाही बरं का! काही ठिकाणे अशी ठरलेली आहेत जी बघण्यासाठी भरपूर वेळ दिला जातो. मी तिथे काढलेले काही निवडक फोटो मी एका गैलरीमध्ये ठेवलेले आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता.

इन डोअर सेट्सचा विचार केल्यास रोज टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांचे सेट्स, देवदेवतांच्या मालिकेत बघायला मिळणारे दरबार आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर समोरच हैदराबाद रेल्वे स्टेशन! फिल्म सिटीत रेल्वे? हे खरंखुरं रेल्वे स्टेशन नसून कृत्रिमरीत्या तयार केला गेलेला रेल्वे प्लेटफॉर्म आहे. रेल्वेच्या डब्याला कधी खालून ट्रकची चाकं पाहिली होतीत? तशी रेल्वे कदाचित तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. ती फक्त इथेच आहे. तिथून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला तुरुंगाची सफर करायला मिळेल. तसं तुरुंग ही काय बघण्याची जागा नाही, पण या तुरुंगात एकीकडून जाऊन दुसरीकडून सहज बाहेर निघता येईल.

motyanche-shahar-ani-film-city-3
या तुरुंगातून कुठल्याही जामीनाशिवाय तुमची सुटका अगदी आरामात होऊ शकते

समोरच जाऊन थोड्या उजव्या बाजूला लगेच एक हॉस्पिटल! नाही, तिथे एकही डॉक्टर नाही. मुळात त्या इमारतीच्या आत काहीच नाही. त्यामुळे बाहेरून फक्त नाव बघा, बाकी काही मिळणार नाही. कदाचित ही पहिली जागा अशी असावी जिथे एक मोठा दवाखाना आणि विमानतळ समोरासमोर आहेत.

motyanche-shahar-ani-film-city-4

शाहरुख खानचा “रा-वन” आठवतोय? अहो तेच विमानतळ जिथे “जी-वन” ची मदत करण्यासाठी ‘चिट्टी’ धावून येतो. हेच तर आहे ते! बिनधास्तपणे फिरा या विमानतळावर कोणतीच सुरक्षाव्यवस्था नाही.

सेट्सचं म्हणाल तर आता फक्त प्रतीक्षा आहे ती बाहुबलीच्या सेटची. ही पोस्ट लांबू नये म्हणून मी थोडंसं पुढे ढकलतोय कारण त्याच्याविषयी लिहावं तेवढं कमीच आहे.

(क्रमश:)