पुदुचेरी. भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक. भारतावर जरी ब्रिटिशांनी राज्य केलेलं असलं, तरी पुदुचेरीमध्ये जास्त करून फ्रेंचांचं वास्तव्य होतं. तशा खुणा किंवा बांधकामाची पद्धत अजूनही पॉन्डीचेरीमध्ये दिसून येते. २० सप्टेंबर, २००६ या दिवशी औपचारिकरित्या पॉन्डीचेरी हे नाव बदलून ते “पुदुचेरी” असं झालं. पुदुचेरी हा एक तमिळ शब्द असून त्याचा अर्थ “नवीन गाव” असा होतो. तमिळनाडू राज्यात हे असल्यामुळे इथली मुख्य भाषाही तमिळच आहे.
“इथून पोचायला जवळपास चार तास लागतील”, असं ड्रायवरने सांगितलं. गाडी एव्हाना हायवेला लागली होती. पाऊस कोणत्याही वेळी येऊ शकतो, अशी चिन्हं होती. चेन्नईच्या बाहेर निघून बराच वेळ झाला तरी रस्ते किंवा लोकवस्त्या अजूनही बऱ्यापैकी स्वच्छ दिसत होत्या. हायवेला समांतर असलेला ‘सर्व्हिस रोड’ हायवेइतका तर नाही, पण निश्चितच चांगल्या अवस्थेत होता. हैदराबादप्रमाणे मुद्दाम हॉर्नचा वापर दिसून येत नव्हता. कुठेही ट्राफिक जाम नसताना सुद्धा शहराच्या बाहेर पडण्यासाठी दीड तासांपेक्षाही जास्त वेळ लागला. रस्त्यात फ्रेश वाटण्यासाठी एक ‘टी ब्रेक’ आणि एक ‘नारळ पाणी ब्रेक’ घेऊन झाला होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची नावं वाचता वाचता झोप यायला लागली होती. कधी झोप लागली ते कळलंही नाही.

डोळा उघडला तो थेट पावसाच्या आवाजाने. निघालो तेव्हा पावसाचा फक्त अंदाज होता, पण हा पाऊस अंदाजाच्याही पलीकडे बरसत होता. पुदुचेरी यायला अजून किमान १०-१५ किमी अंतर कापायचं होतं. अशा पावसात आपण पोचू शकू की नाही, अशी मला शंका यायला लागली होती. त्याचदरम्यान, पुदुचेरीला तीन दिवस आधीच चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे हे पावसाळी वातावरण आणि असा पाऊस आहे, हे समजलं. चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर काय होतं वगैरे फक्त ऐकीव माहिती होती. कोण जाणे, पुदुचेरी शहरात पूरसदृश स्थिती असेल तर? आपण आपल्या हॉटेलपर्यंत पोचू शकलो नाही तर? पोचायचं सोडा, पण इतक्या जोर धरलेल्या पावसात ही चालत असलेलीच गाडी जर बंद पडली तर? आपण इथून परत फिरायला पाहिजे असं मी सुचवू पाहत होतो. कारण मला केवळ आमचीच गाडी शहराच्या दिशेने जाताना दिसत होती. मागे पाहिलं तर मागेही कुठली गाडी दिसत नव्हती. पण शहराच्या बाहेर म्हणजे आमच्या उलट दिशेने येणाऱ्या गाड्या किंवा बसेस दिसत होत्या. त्यातच पावसाने अजून जोर धरला आणि मला भीतीने पूर्णपणे घेरलं. आता आपलं काही खरं नाही, असे आणि अजून बरेच नकारात्मक विचार डोक्यात जमा झाले.
शहरात शिरलो तेव्हा ती देवाची कृपा असेल म्हणून किंवा माझं नशीब चांगलं म्हणून, किंवा दोन्हीही असेल म्हणून की काय, पाऊस थांबलेला होता. वाहतुकीची वर्दळ दिसून येत होती. रस्त्यावर लोक ये-जा करत होते. माझ्या जीवात जीव आला. रस्त्याने पाहिलेल्या पावसासारखा भयानक पाऊस मी याआधी कधीही पाहिलेला नव्हता. हॉटेल शोधत शोधत पोचलो तेव्हा भीतीमुळे भूक केव्हाच मरून गेलेली होती. रूमवर गेल्या गेल्या झोपावं म्हटलं, तर तेही नाही. वातावरण खूप दमट आणि निरुत्साही वाटत होतं. अशा स्थितीत आपण इथे दोन अडीच दिवस कसे काढायचे, हा आमच्या सगळ्यांपुढे प्रश्न होता. तशा परिस्थितीत संध्याकाळ झाली. अडीच पैकी अर्धा दिवस आम्ही पार केलेला होता.
दुसऱ्या दिवशी लक्ष वळवण्यासाठी फिरायला जायचं ठरलं. या वातावरणामुळे समुद्राकिनारा विसरावाच लागणार होता. हॉटेलवाल्याने सुद्धा ‘स्वत:च्या जोखीमीवर जाऊ शकता पण तिकडे जाऊ नका’ असा सल्ला दिला. नाश्ता करून दुसरीकडे कुठे जावं म्हटलं तर पुन्हा पाऊस चालू झाला. या वेळेस हा पाऊस आम्हाला बाहेर निघू द्यायला तयार नव्हता. हताश होऊन आम्ही हॉटेलवरच संध्याकाळपर्यंत आराम करत राहिलो. संध्याकाळी तुरळक पाऊस बघून थेट श्री अरविंद आश्रम (Sri Aurobindo Ashram) गाठलं. मी प्रवासाला निघतांना बऱ्याच जणांनी हे ठिकाण मिस करू नको म्हणून सांगितलं होतं. मग मात्र रात्री पर्यंत पावसाने अजिबात त्रास दिला नाही. म्हणजे आता अडीचपैकी दीड दिवसावर आम्ही विजय मिळवला होता. आता फक्त २४ तास उरले होते, जे निसर्गाला आमची परीक्षा पाहण्यासाठी भरपूर होते.

त्यानंतरची सकाळ सुरु झाली ती पावसानेच! तो पाऊस मात्र संध्याकाळीदेखील थांबायचं नाव घेईना. हा प्रवास आता अर्ध्यावर सोडावा लागला तर चालेल, पण आपण परत फिरून आपलं घर गाठलं पाहिजे, असं मी मनाशी जवळपास निश्चित केलं. हा पूर्ण दक्षिण भारताचा प्रवास, ज्याचं स्वप्न आपण गेल्या ८ वर्षांपासून पाहिलं, त्याचा शेवट असा झालेला मला नको होता. संध्याकाळी या विषयावर भरपूर खलबतं झाली. यानंतरच्या प्रवासातली एक सोडून बाकी सगळी ठिकाणे समुद्रकिनाऱ्यावरची होती. तिथेही असं वातावरण नसेलच, याची खात्री देता येत नव्हती. “गलत बंदे से पंगा ले लिया तूने!” असं मला कदाचित निसर्ग म्हणत असावा, असं वाटायला लागलं. खरंच पुढे जाऊन नैसर्गिक परिस्थितीसोबत पंगा घेऊन भलतंच धाडस करण्याची हिंमत होत नव्हती!
शेवटचा उपाय म्हणून नंतरच्या ठिकाणांचा त्या त्या दिवशीचा हवामानाचा अंदाज बघावा म्हणून मोबाईलवर नेट चालू केलं. माझ्यासाठी हा एक चमत्कार होता. पुढच्या सगळ्या ठिकाणी पुढचे ४-५ दिवस वातावरण स्वच्छ राहील, असा अंदाज होता. दीड पावणेदोन दिवसानंतर माझ्या चेहऱ्यावर पुसटशी हास्याची लकेर उमटली. हुरूप आला. घड्याळात वेळ पाहिली, तर रात्र झालेली होती. उद्या इथून निघायचा दिवस होता. आपल्या अंगात नवीन उर्जा आलीये, असं वाटायला लागलं. हा प्रवास अर्धवट सोडण्याची आता गरज नव्हती. जवळजवळ दोन दिवस चालू असलेले नकारात्मक विचार आता एकेक करून दूर व्हायला लागले. आपण याआधी जो प्रवास केला, त्याचा शीण भरून काढण्यासाठीच कदाचित हा पाऊस आला असेल आणि आपल्याला रूमवरच आराम करावा लागला असेल. झालं ते चांगल्यासाठीच झालं, या धारणेप्रमाणे मी कामाला लागलो. मला वाटलं दोन दिवस फुकट घालवले! काहीच केलं नाही. पण तसं नव्हतं. उलट पुढच्या वाटचालीसाठी आता उत्साह वाटत होता. इथे जास्त फोटो काढता आले नाही म्हणून काय झालं? पुढे बघून घेऊ. सामानाची आवराआवर होत आली होती. पुदुचेरीपासून रेल्वेची व्यवस्था नसल्यामुळे दुसऱ्या शहरात जायचं होतं. ठिकाण होतं- माझी स्वप्ननगरी- अर्थात चेन्नई!
(क्रमश:)