me

    माझ्याविषयी थोडंसं...

    निर्मात्याने जशी या विश्वाची निर्मिती केली, तशीच त्याने माझीही निर्मिती केली. तेव्हा जास्त काही बोलून त्याच्या निर्मितीचा अपमान कशाला करायचा? तर, मी ओंकार! हे तुम्ही ज्याच्यावर वाचताय, ते बनवणं हा माझा कामधंदा! म्हणजे वेबसाईट डिझाईन करणे. अंदाजे शाळेतून बाहेर पडल्यावर “डिझाईन”चं भूत जे मानगुटीवर बसलं, ते आजतागायत तसंच आहे. कला तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल, या पु. लं. नी सांगितलेल्या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कला कुठलीही असो, संगीत, गायन, वादन, चित्र काढणे, सिनेमा…काहीही!

    सिनेमावरून आठवलं, दहावीत होतो तेव्हा “अपरिचित” नावाचा एक हिंदीमध्ये डब केलेला सिनेमा पाहिला होता. तो पाहून दाक्षिणात्य सिनेमाविषयी कुतूहल निर्माण झालं. पुढे त्या कुतूहलाची जागा वेडाने घेतली. मग आयुष्यात दाक्षिणात्य संगीताचा शिरकाव झाला! तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि मग कन्नडा. आजच्या या रिमिक्स, रिक्रीएटच्या जमान्यात आमच्यासारख्या संगीतप्रेमी पोरांना एकप्रकारे कानांना समाधान दिलं, ते या मंडळींनीच. हिंदी सिनेमा या देशाचं प्रतिनिधित्व करतो, या संकल्पनेच्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने अक्षरश: चिंधड्या उडवल्या. असो! मी थोडा सिनेमावेडा असल्यामुळे वहावत गेलो. मला काय हिंदीविषयी मनात अढी आहे, अशातला भाग नाही. माझ्या दृष्टीने कन्टेन्ट चांगलं असणं महत्वाचं, भाषा नाही.

    आजच्या भाषेत “मिलेनियल” अर्थात टिपिकल “ओल्ड स्कूल”. त्यामुळे कधी कधी काही गोष्टी पटत नाहीत, किंवा ‘आमच्या वेळी’ वगैरे कधीतरी चुकून बाहेर पडतं. तसा प्रयत्न करत असतो, पण होतं कधी कधी! जे सुचतं आणि जसं सुचतं, तसं लिहायचा प्रयत्न करत असतो – कुणालाही न दुखावता. काही क्षण विरंगुळा म्हणून काही नवीन वाचायचं ट्राय करायला आला असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. सगळ्या लिंक्स खुल्या आहेत, फक्त क्लिक करा आणि वाचा बिनधास्त! आवडलं, तर अभिप्राय कळवायला विसरु नका. एका कमेंटच्या अंतरावरच आहे, असं समजा!