Close Menu
विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवासविचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास

    आजच सबस्क्राईब करा!

    नव्याने पोस्ट केलेले ब्लॉग वाचण्यासाठी.

    Facebook X (Twitter) Instagram
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    Facebook X (Twitter) Instagram
    विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवासविचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास
    • प्रवासवर्णन
    • चित्रपट
    • प्रासंगिक
    • कथा
    • व्यंगचित्रे
    • मनोगत
    विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवासविचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास
    Home » सिल्वर स्क्रीन – कथा पडद्यामागची…(भाग – १)
    कथा

    सिल्वर स्क्रीन – कथा पडद्यामागची…(भाग – १)

    ओंकारBy ओंकारOctober 25, 2023Updated:October 30, 2026No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    (ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातली नावे, ठिकाणे, संदर्भ देखील काल्पनिक आहेत. कुठल्याही धर्म, पंथ वा समुदायाच्या भावना दुखावण्याचा याद्वारे हेतू नाही. यातल्या कुठल्याही गोष्टीचा वास्तविक आयुष्याशी आलेला संबंध हा केवळ योगायोग समजावा. यात मांडली गेलेली मते ही लिहिणाऱ्याची वैयक्तिक मते आहेत.)

    सूर्य उगवायची वेळ झालेली होती. मी माझ्या अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी आकाशाचा तांबूस रंग बघू शकत होतो. माझ्या कुजबूज कानावर पडत होती, पण एकाकडेही बघण्याचे अंगात त्राण उरलेले नव्हते. एका बाजूने पाण्याचा आवाज ऐकू येत होता, तर दुसऱ्या बाजूने लोकांची कुजबूज ऐकू येत होती. एकेक मिनिट जात होता, तशी कुजबूज वाढत चालली होती. मी हिम्मत करून डोळे पूर्णतः उघडले आणि कसाबसा उठून बसलो. एव्हाना माझ्याभोवती बऱ्यापैकी गर्दी जमली होती. मी सभोवार नजर फिरवली आणि आपण मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरती आहोत, याची माझी खात्री झाली. गर्दीतल्या कुणीतरी पाण्याची बाटली माझ्यापुढे केली. तहान तर लागली होती, पण बाटली तोंडाच्या जवळ नेताच वाक्य कानावर पडलं – “पोलिसांना कळवायला पाहिजे”.

    मी हातातली बाटली परत करत, लंगडत लंगडत पळायला सुरुवात केली. मरीन ड्राईव्ह म्हणजे इथून चर्चगेट किंवा सीएसएमटी स्टेशन जवळ असणार. मला काहीही करुन जे स्टेशन जवळ पडेल ते गाठायचं होतं. मी त्या विचित्र पद्धतीने पळत असताना काल रात्री काय झालं होतं, हे आठवायचा प्रयत्न करु लागलो. आठ-दहा माणसं असावीत कदाचित, मी फक्त पळतोय आणि ते सगळे माझ्या मागे हातात काही ना काही घेऊन पळताहेत, इथपर्यंत तर आठवलं. माझा वेग कमी पडला आणि त्यांच्यातल्या एकानं मागून कॉलर मागून पकडून मला खाली पाडलं. मी पडलो तोच मला सगळ्यांनी घेरलं आणि अर्वाच्य शिव्या देत मारायला सुरुवात केली. मी माझे दोन्हीही हात कानाभोवती गुंडाळून घेऊन स्वत:ला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो, मध्येच त्या घोळक्यातून निघून पुन्हा पळून जायचा प्रयत्न करत होतो. माझ्या चौथ्या प्रयत्नात मला यश आलं आणि मी पुन्हा पळू लागलो. त्या लोकांनी परत माझा पाठलाग सुरु केला. माझ्या शरीराच्या काही भागांतून रक्त येत होतं. पण त्या त्रासापेक्षा मी त्यांच्या हाती आणखी एकदा लागणं, हे जास्त त्रासदायक असणार होतं. अर्धी रात्र असल्यामुळे रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. मी रस्ता ओलांडून एका कमी गतीच्या बसच्या मागच्या शिडीला पकडून चढलो. बसनं वेग घेतल्यामुळे थोडासा फायदा मिळाला आणि मी त्या लोकांच्या तावडीतून सुटलो…..

    …पण हा काय माझा शेवट नाही. हे सगळं सुरु झालं अंदाजे १५-२० वर्षांपूर्वी! “फिल्ममेकिंग” या विषयाने मला लहानपणापासूनच झपाटलेलं होतं, अगदी शाळेत असल्यापासून! त्याच नादात मी अनेकदा वेशभूषा स्पर्धेत भाग घ्यायचो. मग शाळेत कधी कुठला कार्यक्रम असला की, मला बोलावलं जायचं. कुठल्यातरी हिरोची नक्कल करायची, त्याला टाळ्या पडणार, मग थोडंसं कौतुक होणार, हे ठरलेलं असायचं. “अंगातले सुप्त गुण” ओळखणारे वगैरे शिक्षक तेव्हा माझ्या शाळेत नव्हते. मी कधीच अभ्यास आणि परीक्षा यांच्याखाली स्वत:ला दबू दिलं नाही की त्याचं टेन्शन घेतलं नाही. मी हुशार नसलो तरी “ढ” विद्यार्थीही नव्हतो. माझ्या वयाची मुलं जेव्हा खेळायला जायची, तेव्हा मी मात्र चोरुन सिनेमे बघायचो. पुढे कॉलेजला गेलो आणि पक्कं ठरवलं की एक फिल्म बनवायची. मग विषय कुठला निवडायचा, यात मी पदवीची तिन्ही वर्षं खर्च केली. फिल्ममेकिंग नाहीच जमलं, तर पदवीचा उपयोग करुन कुठेतरी नोकरी करता येईल असा “बॅकअप प्लॅन” सुद्धा तयार होता. मी माझी फिल्म बनवायची इच्छा घरात जाहीर केली आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे त्याला विरोध झाला. आरडाओरडा, वादविवाद, भांडण आणि एक दिवस उपाशी राहणं, हे सगळं झालं. कदाचित माझ्या घरच्यांना आधीच भविष्य दिसलं असेल. ते शेवटपर्यंत मला विरोध करत राहिले आणि मी त्यांना! आज जखमा अंगावर घेऊन “आई गं” तोंडून निघताना आई आठवत होती आणि थोडक्यात जीव वाचल्यानंतर ते संकट बघून “बाप रे” म्हणताना बापही आठवत होता. मी त्यांचा द्वेष करत होतो असं नाही, पण मी माझ्या वेडाच्या मागे होतो आणि मी आयुष्यात असं काहीतरी करावं ज्याने मला ‘स्थिर इन्कम’ येईल असं माझ्या घरच्यांना वाटायचं. झाकीर खान म्हणतो तसं – ‘काही आई-वडील तुमच्या पसंतीचं तुम्हाला यासाठी करु देत नाहीत, कारण त्यांना तुम्हाला गरीब बघायचं नसतं’.

    मी धापा टाकत चर्चगेट स्टेशनवर पोचलो. समोर कुठलीतरी लोकल ट्रेन उभी होती. ती कुठे जातेय, याची घोषणा कदाचित होत असावी. माझे कान बधीर झाले होते. स्टेशनवर होत असलेल्या कुठलीही गोष्ट मला स्पष्ट ऐकू येत नव्हती. कदाचित काल रात्रीचे लोक अजूनही माझा पाठलाग करत असतील अशी शंका सारखी मनात येत होती. मी कण्हत कण्हत एका डब्यात चढलो. काही सेकंदातच लोकलने सरकायला सुरुवात केली, तसा माझा जीव भांड्यात पडला. ही लोकल आता जिथे घेऊन जाईल तिथे मला चालणार होतं. सकाळची वेळ असल्याने हवेत अजूनही थोडासा गारवा होता (तसं मुंबईत हे दुर्मिळच म्हणायचं). ती हवा चेहऱ्यावर घेता घेता डोळा कधी लागला, हे समजलंच नाही…

    …आता माझे डोळे पूर्णपणे उघडले. मी व्यवस्थित उठून बसलो. इतक्या वर्षांची मेहनत करुन मुंबईपर्यंत पोचून मला माझं स्वप्न साकार करायचं होतं. माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण करणारं शहर, आज माझ्याच जीवावर उठलेलं होतं. इतक्या वर्षांचा केलेला अभ्यास, रिसर्च, लोकांना केलेल्या विनंत्या, भेटीगाठी, ओळखी….कशाचाही आता उपयोग नव्हता. आत्ता या क्षणी फक्त जीव महत्वाचा होता. मी आजूबाजूला पाहिलं – छोटे छोटे हिरवळ अंथरलेले डोंगर दिसत होते. कदाचित मी मुंबईपासून बराच दूर आलो होतो. मी सभोवार नजर फिरवली – लोकल ट्रेनमध्ये बोर्ड असतात आता पुढे कुठलं स्टेशन येणार ते! मी बसलेल्या मागच्या बाजूला एक बोर्ड दिसला – पुढील स्टेशन > कसारा. म्हणजे मी जवळजवळ नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आलो होतो. स्टेशन येताच मी उतरलो आणि कुठेतरी संपर्क करण्यासाठी ‘जुगाड’ शोधू लागलो. माझा फोन तर कालच्या झटापटीत केव्हाच पडला होता. कोण जाणे आत्तापर्यंत तो कोणाच्यातरी हाती लागलाही असेल, कदाचित एखादा चोर – त्याने घेऊन त्याचं काय करायचं ते केलंही असेल. मी प्लॅटफॉर्मवर फिरता फिरता एका वयस्कर गृहस्थांना धडकलो.

    “सॉरी…” मी हळूच बोलून गेलो. काकांनी डोक्यापासून पायापर्यंत मला न्याहाळलं. माझा वेष तसा गबाळाच झालेला होता.

    “काका मला तुमचा फोन देता का? मला फक्त एक फोन करायचा आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त दोन मिनिटं…”

    काकांनी त्यांचा फोन अनलॉक करुन माझ्या हातात दिला. मी अगदी चपळाईने नंबर डायल केला, बहुतेक काकांच्या फोनमध्ये “ट्रू कॉलर” असावं, स्क्रीनवरती नाव दिसलं – सुजय माळेकर. मला तो कॉल कधी कनेक्ट होतोय, असं झालं होतं. मी ज्या ट्रेनमधून उतरलो, ती कदाचित परत सीएसएमटी स्टेशनच्या दिशेने निघाली होती. वेग घेत घेत लोकल निघून गेली आणि फोनची रिंग वाजू लागली. आता फक्त तिकडच्या बाजूने फोन उचलला जाण्याचा उशीर होता. मी काकांकडे पाहात कसंतरी चेहऱ्यावर हास्य आणायचा प्रयत्न करत होतो, पण काकांच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात बदललेले नव्हते.

    “हॅलो, अरे फोन उचलायला किती वेळ? ऐक…..माझा फोन हरवलाय….हो हो मी ठीक आहे, सध्या कसारा स्टेशनवर. तू येऊ शकतोस का इथे? हा ठीके….प्लॅटफॉर्म नंबर २ वर…नाही मी बाहेर नाही येत. माझ्याकडे एक तर फोन नाहीये….मी दुसर्याच्या फोनवरुन बोलतोय. मी या प्लॅटफॉर्मवरच थांबलोय तू होईल तितकं लवकर ये….”

    “धन्यवाद काका.” मी काकांना फोन परत केला. ते त्याचा फोन खिशात ठेवत हातानेच ओके असा इशारा करत निघून गेले. मी आसपास बसायची जागा बघून तिथे बसलो. दुसरी एक लोकल प्लॅटफॉर्मच्या दिशेने येत असताना दिसत होती…

    (क्रमशः)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    ओंकार
    • Facebook
    • X (Twitter)
    • Instagram
    • LinkedIn

    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    आज काय नवीन?

    विकासाचे “उड्डाण”

    November 7, 2023

    पूर्वेकडील अथेन्स – मदुराई

    December 25, 2018

    माहिष्मती साम्राज्यम्

    December 16, 2018

    दोन रुपयांची ‘भेट’

    March 17, 2024

    आजच सबस्क्राईब करा!

    नव्याने पोस्ट केलेले ब्लॉग वाचण्यासाठी.

    विचारविश्व….आणि अनुभवांचा प्रवास
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    © 2026 सर्व हक्क प्रकाशकाधीन.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.